Goan Varta News Ad

पाळोळेत सिलिंडरचा स्फोट

जीवित हानी नाही; मात्र साहित्य खाक

|
22nd February 2021, 11:48 Hrs
पाळोळेत सिलिंडरचा स्फोट

फोटो : सिलिंडरच्या स्फोटामुळे उठलेले आगीचे लोळ.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
काणकोण : पाळोणे-काणकोण येथील एका रेस्टॉरंटला सोमवारी सायं. ७.३० च्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत स्टोअर रूम व स्वयंपाकघर भस्मसात झाले.
स्फोट इतका मोठा होता की, आगीच्या ज्वाळा माडाच्या उंचीपर्यंत गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. सदर रेस्टॉरंटमध्ये अनेक सिलिंडर होते. त्यांतील आठ टाक्या बाहेर काढण्यात यश आले. मात्र उर्वरित किती सिलिंडरांचा स्फोट झाला, हे समजू शकलेले नाही. आगीचे वृत्त कळताच स्थानिक तरुण जीवाची पर्वा न करता मदतकार्यात सहभागी झाले. सोबत अग्निशामक दलाचे जवानही होतेच. रेती व पाण्याचा मारा करून रात्री ९.४५ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवता आले. स्फोटामुळे नक्की किती हानी झाली, याचा अंदाज येऊ शकलेला नाही. तथापि परिसरातील साहित्य आगीत खाक झाले. आमदार इजिदोर फर्नांडिस, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, दिवाकर पागी, संजू पागी घटनास्थळी उपस्थित होते. या प्रकारात नजीकच्या तीन झोपड्या भस्मसात झाल्या. सिलिंडरना आग कशी लागली, याचा शोध सुरू आहे.