Goan Varta News Ad

धर्म म्हणजे काय?

जगरहाटी

Story: शेफाली वैद्य |
31st January 2021, 05:28 Hrs
धर्म म्हणजे काय?

मध्यप्रदेशमधला जीव भाजून टाकणारा रखरखीत उन्हाळा. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मी भोपाळला एका परिषदेसाठी गेले होते. त्यातूनच वेळ काढून मला जवळची काही जुनी मंदिरे बघायची होती. इतक्या कहर उन्हाळ्याची सवय नव्हती खरंतर, त्यात दोन-तीन दिवस सततचा प्रवास, जागरण यामुळे अंगात जरा कणकणही होती, पण ही गुर्जर प्रतिहार राजांनी बांधलेली मंदिरे मला फारा वर्षांपासून खुणावत होती. गाडीही ठरवलेली होती म्हणून क्रोसिनची एक गोळी खाऊन पहाटेच निघाले. 

आधी विदिशेचा हेलिओडोरस या ग्रीक कृष्णभक्ताने उभा केलेला गरुडस्तंभ बघितला. तिथून जवळच असलेलं बीजमंडळचं भव्य मंदिर बघितलं. धर्मांध क्रूरकर्मा औरंगझेबाची वक्रदृष्टी पडून त्याने उध्वस्त केलेलं हे विजयादेवीचं मंदिर. त्या मंदिराची शिखरं पाडून त्यावर घुमट चढवून त्याला आलमगीर मस्जिद असं नाव देण्याचा पराक्रमही औरंगझेबाने केलेला होता. सध्या ही वास्तू अशीच पडून आहे. इतस्ततः विखुरलेल्या भग्न मूर्ती, मंदिराचे खांब, कलशाचे तुकडे वगैरे बघून संताप येतो आणि आपण याबाबतीत काहीही करू शकत नाही हे जाणवून मन कष्टी होतं. 

तशीच पुढे गेले. तिथून जवळजवळ ७० किमीवर अजून एका गावाजवळ जुन्या मंदिरांचा समूह होता ही माहिती एएसआयच्या वेबसाईटवरून कळली होती. एव्हाना अकरा वाजले होते. वर सूर्य तळपत होता आणि कातडी भाजून काढणारा कोरडा उकाडा एसी गाडीतसुद्धा जाणवत होता. सकाळी साडेसहा वाजता गोळी खाऊन बाहेर पडले होते, तिचाही प्रभाव आता उतरत होता. विलक्षण थकवा जाणवत होता. सारखी तहानही लागत होती. आजारी असताना बाहेर काही खायचं नाही म्हणून पाणी आणि काही फळं बरोबर घेऊन बाहेर पडले होते. पण, खावंसं वाटत नव्हतं. फक्त पाच-दहा मिनिटांनी पाणी पीत पीत मागच्या सीटवर मलूल झोपून होते मी. 

सारथी चांगला होता. माझी एकूण अवस्था बघून त्याने विचारलंही, ‘भोपाळ वापस चलें?’. पण इतक्या प्रयासानंतर घडवून आणलेला हा प्रवास अर्ध्यावर सोडायला मी तयार नव्हते. शिवाय परत इतक्या अनवट ठिकाणी इतक्या दूर कोण येणार हा विचार होताच. त्यामुळे मी ठरवलं की काही झालं तरी ट्रिप पूर्ण करायची. हवं तर दुसऱ्या दिवशी भोपाळला आराम करू. 

दरमजल करत करत आम्ही त्या दुसऱ्या गावात पोचलो. ग्यारासपुर नावाच्या गावाजवळच एक पाच मैलांच्या परिसरात ही सर्व पुरातन मंदिरे होती. एकेकाळी या भागात गुर्जर प्रतिहार राजांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी बांधवून घेतलेली ही मंदिरे. नागर शैलीत बांधलेली. अतिशय देखणी, पण पुढे मुसलमानी आक्रमकांचे घणाचे घाव, काळाचे तडाखे आणि आता सर्वसामान्य हिंदू जनतेची इतिहासाबद्दलची अनास्था, यामुळे आता अगदीच दुरावस्थेत असलेली ही मंदिरे. मध्यप्रदेशच्या तसल्या त्या उन्हात, अंगात तापामुळे त्राण नसतानाही केवळ ईच्छाशक्तीच्या जोरावर मी ती सर्व मंदिरे बघितली. कदाचित माझ्या त्या वेळच्या विकल मनःस्थितीचाही परिणाम असेल, पण प्रत्येक मंदिर बघताना मी अक्षरशः रडले. एकेकाळी वैभव शिखरावर असलेली ही मंदिरे आजकाल भटक्या गाई- गुरांचे रवंथ करण्याचे ठिकाण म्हणून उरली आहेत हे बघून खूप खिन्न वाटत होतं मला. 

आता फक्त एक शेवटचं मंदिर राहिलं होतं. ते रस्त्यापासून चांगलं दोनेक किमी दूर होतं, त्यामुळे गाडी जाण्याचा प्रश्नच नव्हता. आता मी अगदीच थकले होते. बरोबर घेतलेल्या बाटलीत पाणीही अगदी थोडकं राहिलं होतं. उन्ह तर रणरणत होतं. हे शेवटचं मंदिर बघायला जावं की नाही हा प्रश्न होता. परत स्वतःला समजावलं की आता यानंतर थेट भोपाळला हॉटेलमध्येच जायचंय, गाडीत आराम करू आणि पायात पेटके आलेले असतानाही तशीच नेटाने निघाले. 

मंदिरापर्यंतचा रस्ता म्हणजे शेताच्या बांधावरची खडबडीत पायवाट होती. वाटेत दगड, धोंडे, काटेरी झुडपं, काय नी काय. वस्तीही नव्हती. फक्त एकच घर दिसलं मला वाटेत. छोटंसं, मातीचं घर, शेजारी गोठा, बाहेर सारवलेलं अंगण, एक उभी ठेवलेली खाट, बाहेर एक मोठं कडूनिंबाचं झाड आणि त्याच्या गर्द सावलीत झोपलेलं एक वासरू आणि एक कुत्रा. दुपारच्या अभ्रकी उन्हातून पाय ओढत चाललेल्या मला त्या क्षणी त्या वासराचा विलक्षण हेवा वाटला. 

शेवटी एकदाची मंदिरापर्यंत पोचले. एकेकाळी मंदिर विलक्षण सुंदर दिसत असावं, आता मात्र कुठल्याही क्षणी कोसळेल अशा स्थितीत होतं. मी त्या संपूर्ण परिसरात एकटीच होते. मंदिराची ती परिस्थिती पाहून सकाळपासूनचा शारीरिक आणि मानसिक थकवा, अगतिक संताप, खिन्नता सर्व तिथे उफाळून वर आलं. त्या मंदिराच्या पायरीवर बसून गुढघ्यात मान घालून मी हमसून हमसून रडले. किती वेळ तशी बसून होते कोण जाणे, पण एका क्षणी जाणवलं की आपल्याला गाडीजवळ चालत परत जायचंय आणि हातापायात आता अगदीच त्राण उरलेलं नाही. रडून रडून विलक्षण तहान लागली होती. बरोबरच्या बाटलीतलं उरलेलं पाणी घटाघट पिऊन टाकलं आणि तशीच अंगातली सर्व शक्ती एकवटून पाय ओढत गाडीकडे परत निघाले. (पूर्वार्ध)

(लेखिका साहित्यिक आहेत.)