Goan Varta News Ad

कला, संस्कृतीत आत्मनिर्भरता रुजवा

कव्हर स्टोरी

Story: सुहासिनी प्रभुगावकर ९८८१० ९९२६० |
31st January 2021, 05:25 Hrs
कला, संस्कृतीत आत्मनिर्भरता रुजवा

गोमंतकीय अभिनेत्री वर्षा उसगावकर बदलत्या सिने, नाट्य, टीव्ही, कला संस्कृतीत पंचवीस वर्षांहून अधिक काळ घट्ट पाय रोवून उभी आहे. गोव्याला अभिमान वाटावा अशी तिची कामगिरी. कारण कोणत्याही क्षेत्रात तेही एका महिलेला टिकणे हे सोपे नसते. वादळ- वाऱ्याचा सामना करीत गोव्यातून महाराष्ट्राच्या महासागरात तिला पोहायला शिकवणारी दामू केंकरे यांच्यासारखी जुनी जाणती मंडळी होती. तिच्या अभिनयाचा पाया पणजीतील पीपल्स हायस्कूल, धेंपो वाणिज्य महाविद्यालयातील स्नेहसंमेलनादी कार्यक्रम, कला अकादमीच्या नाट्य स्पर्धाच नव्हेत तर महालक्ष्मी मंदिरात होणाऱ्या नाटकांतून घातला गेला. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी, कोकणी सिनेमा, टीव्ही मालिकांतून वर्षाच्या अभिनयाचे विविध पैलू उलगडले गेले. अजूनही नवख्या अभिनेत्रीना मागे टाकण्याची जिद्द तिच्यात आहे. वास्तवात इफ्फीत तिचा गौरव गेल्यावर्षी व्हायला हवा होता, किमान ५२ व्या इफ्फीत तो व्हावा, गोव्याच्या स्वाभिमानाचा, अभिनय कौशल्याचा सुगंध इफ्फीतील मंचावर दरवळावा अशी अपेक्षा आहे. गोव्याने हाक मारली त्यावेळी वर्षा उसगावकर राज्यात आवर्जून येते. कारण गोवा तिची मातृभूमी आहे. आज वेळ आली आहे, राज्याच्या कला आणि संस्कृतीची परंपरा जपून नवे वळण घेण्याची. याकामी वर्षा सल्ला देऊ शकेल का सरकारला?

गेली कित्येक वर्षे शिमगोत्सव व कार्निव्हल उत्सवावर सरकार प्रचंड निधी उधळत आहे, परंपरेला शहरांतील रस्त्यावर आणून लाखोंच्या समुदायापुढे ठेवत आहे. (काही वर्षांपूर्वी गावातील काही तरुणांनी धालो, फुगड्या आदी पारंपरिक लोककला रस्त्यावर आणायच्या विरोधात मत-मतांतरे व्यक्त केली होती.) कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर निर्बंध असताना लाखोंच्या गर्दीतील कार्निव्हल, शिगमोत्सव करायला पर्यटन खाते यंदाही सज्ज झाले आहे. कोणी दिली परवानगी? केंद्र सरकारने नियंत्रणे उठवलीत का? काही राज्यांनी तर फेब्रुवारी संपेपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. कार्निव्हल, शिमगोत्सव चित्ररथ सारख्या गर्दी खेचणाऱ्या स्पर्धा महामारीला आमंत्रण देणाऱ्या असल्यामुळे त्या शहरात होऊच नयेत, असे मला वाटते. त्या करायच्या असतील आणि सरकारला पैसा लोककलाकारांपर्यंत पोचवायचा असेल तर तो गावातील कार्निव्हल, शिमगोत्सवाला प्रोत्साहन देऊन पोचवा. तसे पाहिल्यास कार्निव्हल, शिमगोत्सवाची कला, संस्कृती गावच्या मातीत शोभते. तेथेच ती फुलली. तिचा विकासही तेथे व्हावा. ती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचायला हवी. मंदिरांचे मंच, मैदाने त्यासाठी वापरता येणार नाहीत का? छोट्या स्पर्धांतून जिंकलेल्या निवडक चित्ररथांची स्पर्धा राजधानीत खुल्या मैदानावर घ्या, हजारोंना आस्वादही घेऊ द्या, रस्ते अडवून आणि वाहनांची कोंडी करून कार्निव्हल, शिमगोत्सवाचे आयोजन यापुढे होऊच नये, परंतु दोन्ही महोत्सवांतील कलाकारांना सर्व तऱ्हेचे पाठबळ मिळायलाच हवे, ते छोट्या कार्यक्रमांतून. छोट्या, सुरक्षित इफ्फीला निरोप देताना पुन्हा आम्हाला लवकर गोव्यात यायचेय, असे सांगणारे अनेक प्रतिनिधी भेटले. का? मोकळा श्वास घेण्यासाठी, ढकलाढकलीविना पायी फिरण्यासाठी. 

आत्मनिर्भरता फक्त कृषी, उद्योग, व्यवसायाला नव्हे तर कला व संस्कृती क्षेत्रातही गोव्यात येऊ शकते. गोवा जशी लोह, मॅंगनिजाच्या मातीची खाण आहे, तशीच कला आणि संस्कृतीचीही अस्सल सोनसळी खाण आहे. मात्र कार्निव्हल, शिमगोत्सवातून बाजारी स्वरुपात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ती आजवर वापरली गेली. तसे यापुढे होऊ नये यासाठी काळजी घेण्याचा विचार यापुढे होणार का? 

गोव्याच्या लोककला व लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक विनायक खेडेकर यांना यंदा पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांचे अभिनंदन. श्री. खेडेकर यांनी कला अकादमीच्या मंचावरून कला गावागावांत पोचवली, संगीत नाट्याला वेगळा आयाम देण्याचे प्रयत्न केले, पुस्तकरुपात लोककला गुंफली. गोव्यावर त्यांचे ऋण आहेत, त्यांनी कलेला अजरामर करून ठेवले. त्यासाठी त्यांना कला आणि संस्कृतीत रस, आस्था असलेले माजी मुख्यमंत्री, आमदार प्रतापसिंह राणे यांच्यासारख्यांचे बळ मिळाले. आज त्यांचा वारसा पुढे नेणारे शेकडो असतील, पण रस्ते, पायवाटा तुडवत फिरून कला, संस्कृती शोधणारे खेडेकर त्यांत किती असतील? त्यासाठी आता गावातच जावे लागेल. कला व संस्कृती गांवातच मोठी करून ग्रामीण मंचावरच तिला नवा साजही द्यावा लागेल. 

शहरात नाट्य, कला, संगिताचे व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून देण्यातही मोलाचा वाटा श्री. राणे यांचाच आहे. कला व संस्कृतीतून विचारमंथनापर्यंत जनतेला नेण्याचे काम माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले. स्वतंत्र कला आणि संस्कृती खाते स्थापन करूनच नव्हे तर कलाकार, सृजनांसाठी अनेक योजना यशस्वीरीत्या अंमलात आणण्याचे त्यांचे काम सदैव आठवणीत राहण्यासारखेच. आज त्या योजनांवर पुन्हा बदलाचा हात फिरवून त्या नव्या पिढीसाठी उपयुक्त बनवण्याचे आव्हान विद्यमान सरकारपुढे आहे. किंबहुना कला व संस्कृती कौशल्य विकासाचा एक भाग बनवून कलेला पैलू पाडणे, तिला देश- विदेशी मंच दाखवणे, वाहवा मिळवणे आणि त्यातून भविष्यातील दुसरी वर्षा, गानकोकिळा लता, पं. अभिषेकी घडविण्याची किमया सरकारला साधावी लागेल. 

आजच्या तरुणाईला नृत्य, गायन, वादनाचे मोठे व्यासपीठ खुणावते आहे. त्यांना भरारी घ्यायची आहे. अशा अवस्थेत त्यांचे पंख छाटायचे की भरारी मारण्यासाठी भरीव विद्यानिधी, शिष्यवृत्तीची पेरणी करायची हा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. सत्तरी, सांगे, पेडणे, काणकोण, फोंडा हे तालुके म्हणजे कला आणि संस्कृतीचे आगरच. सासष्टीलाही आगळ्यावेगळ्या कलेची चव आहे, संस्कृतीही भिन्न तरीही अनोखी. किती मोहरे दिले या तालुक्यांनी गोव्याला? असंख्य. त्यांना त्यासाठी गोव्याबाहेर काल जावे लागले, आजही जावे लागते. अशावेळी कला, संस्कृतीचे उच्च दर्जाचे व्यावसायिक शिक्षण देणारे विद्यापीठ सत्तरी तालुक्यात आणणे सरकारला शक्य असेल तर प्राधान्यक्रम त्याला द्यावा. आयआयटी नव्हे तर कला, नाट्य, संगीत शिक्षणाबरोबरच फिल्मसिटी, स्टुडिओज उभारण्यास प्राधान्य मिळायला हवे. दरवर्षी फक्त घोषणा होतात. नंतर सारेकाही कागदावरच राहते. आजवर बाॅलिवूड गोव्याला मदत करेल या आशेने सरकार पाहात आले, परंतु सिने तंत्रज्ञान, चित्रीकरणाचे धडे देणारी व्यासपीठे स्थापन करण्यासाठी द. भारतातील शाहजी करूण यांच्यासारख्या निर्मात्यांना सल्लागार म्हणून राज्य सरकारने का पाचारण करू नये? श्री. करुण यांनी केरळ चित्रपट महोत्सवाची रोवलेली पताका उंच गेली आहे, गोव्यात इफ्फीसाठी सातत्याने तेही राबले आहेत, बडेजाव न दाखवता आपली मयुरपंखी निर्मिती इफ्फीचा कायमचा भाग बनून त्यांनी ठेवली आहे. त्या मयुरपंखांना वेगवेगळ्या रंगारुपात इफ्फीतील सजावटीद्वारे पुढे नेण्यासाठी गोमंतकीय कारागीर सरसावत असतील तर त्यांचा यथोचित गौरवच नव्हे तर त्यांच्या कारागिरीला कायमस्वरुपी शैक्षणिक संस्थांतून विद्यार्थ्यांपर्यंत न्यायला हवे. हजारो हातांना काम त्याद्वारे मिळेल, ग्रामीण विकास साधण्याचे उपक्रम त्यातून साकार करता येतील आणि आपला छोटासा गोवा कला व संस्कृतीला आत्मनिर्भर बनवण्याचे, प्रगतीचे मार्ग देशाला दाखवू शकेल. 

संगीत, नृत्य, नाट्य, सिनेमा, वादन या कलांबरोबरीने कशिदाकाम, धातूकामाच्या परंपरेचा ऐतिहासिक वारसा जपायचा असेल, शिगमोत्सव, कार्निव्हलचे अस्सल पारंपरिक अस्तित्व टिकायला हवे तर त्याला ग्रामीण मंचासारखे दुसरे योग्य व्यासपीठ नाही. 

जत्रा, काले, प्रत्येकाच्या दारात येणारे देव, कळस, मेळ, तरंगां, भजन, आरती ही गोव्याच्या थोर, आगळ्या संस्कृतीची रुपे. त्यातील काही यंदा इफ्फीच्या उद्घाटनातही दिसली, किती रसिकांसमोर? अवघ्या दोनशे ते तिनशे. परंतु, वाहवा झाली, लाखो लोकांकडून. देशातच नव्हे, विदेशांतही घोडेमोडणी दिसली. ही आभासी व्यासपीठाची कमाल! तेच माध्यम कार्निव्हल, शिमगोत्सवावेळी वापरावे. गावागांवातील कार्निव्हल, शिमगोत्सवाची वैशिष्ट्ये आभासी व्यासपीठाद्वारे जगात पोचवण्याचे काम करण्यासाठी ‘रोड शो’ ची गरज नाही, विदेश दौऱ्यांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडाही होणार नाही. लोकांच्या करांतून गोळा केलेला पैसाही वाचेल आणि कला, संस्कृतीचे कायमचे जतन, संवर्धन करण्यासाठी तो खर्च करता येईल. कलाकारही आत्मनिर्भर होतील, प्रगतीची नवी शिखरे गाठतील. आपला गोवाही संपन्न, सुजलाम होईल. 

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत.)