Goan Varta News Ad

विनोदी थरारपट

रुपेरी पडदा

Story: विद्या नाईक होर्णेकर |
24th January 2021, 12:32 Hrs
विनोदी थरारपट

‘कॉमेडी विथ क्राईम’ हा विषय हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्या चित्रपटांमध्ये अनेकदा हाताळला आहे. अशा बहुतांश चित्रपटांमध्ये विनोद तर असतोच, शिवाय गुन्हेगारी विश्वाचा एक वेगळा चेहराही प्रेक्षकांना दाखवला जातो. या चित्रपटांमध्ये तथाकथित प्रस्थापित कलाकार असोत वा नसोत, ते चित्रपट व्यावसायिक असोत वा समांतर असोत, त्याची मांडणी प्रेक्षकांना इतकी भावते की, वर्षानुवर्षे त्याचे गारुड प्रेक्षकांवर कायम राहते. मग तो चित्रपट ‘जाने भी दो यारो’ असो की, ‘फुकरे’. 

गुन्ह्यांवर बेतलेले जे अनेक विनोदी हिंदी चित्रपट आजतागायत प्रदर्शित झाले आहेत, त्यात एका चित्रपटाचा उल्लेख आज प्रामुख्याने करावासा वाटतो; तो चित्रपट म्हणजे ‘बुढ्ढा मिल गया’. या चित्रपटात विनोदासोबत थरारपटाचा अनुभवही प्रेक्षकांना घेता आला आहे. खरे तर या चित्रपटात तथाकथित प्रस्थापितांचा समावेश नाही. परंतु, तरीही हा चित्रपट सत्तरच्या दशकातील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला आहे. यंदा या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. कदाचित आजच्या पिढीला हा चित्रपट आठवत नसेल, किंवा माहीतही नसेल, पण ‘रात कली एक ख्वाबमें आयी...’ हे गाणे ऐकले नसेल असा सिनेरसिक मिळणे कठीण. या गीताने हिंदी चित्रपट गीतांमध्ये इतिहास तर घडवलाच आहे, शिवाय पिढ्यानपिढ्या त्याचे गारुड सिनेरसिकांवर कायम आहे. या गाण्याचा उल्लेख न होता, ‘अंताक्षरी’चा खेळ रंगणे आजही केवळ अशक्यच वाटते. 

या चित्रपटाचे कथानक कुठल्याही हिंदी मसालापटास शोभेल असेच आहे. दोन सुशिक्षित बेरोजगार. कामधंदा मिळवण्याचे सगळे प्रयत्न अपुरे पडल्यानंतर एका श्रीमंत म्हाताऱ्याविषयीची बातमी वृत्तपत्रात वाचतात व मग त्याला ताब्यात घेऊन त्याची संपत्ती मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना नकळत गुन्हेगारी जगताच्या संपर्कात येतात. तिथून मग जो ‘चुहा-बिल्ली’चा खेळ सुरु होतो त्याचा परिपाक म्हणजे ‘बुढ्ढा मिल गया’. १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केले आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी अधिक काही बोलायची आवश्यकता नसावी. कारण हृषिकेश मुखर्जी सदैव हलके- फुलके विषय हाताळताना जीवनाचे सार प्रेक्षकांसमोर उलगडण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळेच प्रचलित आहेत. विनाकारण फाफटपसारा न करता अगदी थोडक्यात, पण तितक्याच मनोरंजकपणे एखादा विषय प्रेक्षकांच्या हृदयाला कसा स्पर्श करेल याचा विडाच जणू त्यांनी उचलला होता. त्यामुळे त्यांचे चित्रपट मग तो ‘गुड्डी’ असो वा ‘बुढ्ढा मिल गया’ प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात सहज यशस्वी होतात.

कलाकार कोण आहेत, वा व्यावसायिक चित्रपटांमध्ये त्यांचे यश किती नोंदवले गेले आहे, या तुलनेत आपल्या भूमिकेसाठी ते किती योग्य आहेत, यावर नेहमीच हृषिकेश मुखर्जी यांनी भर दिला आहे. त्यामुळे चेहरा जुना असो वा नवा हृषिदांच्या चित्रपटांमध्ये तो प्रेक्षकांच्या लक्षात राहिला तो त्याच्या भूमिकेमुळे. ‘बुढ्ढा मिल गया’ चित्रपटातही अगदी तसेच झाले आहे. या चित्रपटात नायकाच्या रुपात नवीन निश्चल आहे. त्याकाळी नवीन निश्चिलची चलती नव्हती तर त्याच्या बहुतांश भूमिका या सहाय्यक कलाकाराच्याच होत्या. अतिशय उमदे व्यक्तिमत्त्व लाभलेले नवीन निश्चल हे नायकापेक्षा सहनायकाच्या भूमिकेतच अधिक रुळले असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरता कामा नये. कारण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत गाजलेले चित्रपट म्हणजे ‘व्हिक्टोरिया नं. २०३, धूंद, देशप्रेमी’ आणि ‘हंसते जख्म’. पैकी ‘व्हिक्टोरिया नं. २०३’ च्या यशाचे श्रेय अशोक कुमार व प्राणला जाते, तर ‘धुंद’चे श्रेय डॅनी व संजय खानला जाते. ‘देशप्रेमी’वर अमिताभ बच्चनची मक्तेदारी होती. अगदी छोटा पडद्याही ‘देख भाई देख’च्या रुपात त्यांनी गाजवला तो शेखर सुमनसोबत. त्यातल्या त्यात ‘हँसते जख्म’ हा चित्रपट नायक म्हणून त्यांच्या वाट्यास येतो व त्यानंतर ‘बुढ्ढा मिल गया’ या चित्रपटाची धुराच त्यांच्या खांद्यावर होती. 

नायक म्हणून त्यांचा अस्विकार कुणी केला नाही, पण नायक म्हणून त्यांना मान्यताही मिळाली नाही. त्यामुळे नंतरच्या काळात ते विशेष रंगले ते सहनायकाच्या भूमिकेत. ‘बुढ्ढा मिल गया’ या चित्रपटात देवेन वर्मा व ओमप्रकाश यांच्यासोबत त्यांनी योग्य समन्वय साधला आहे. त्यांना अर्चना, सोनिया साहनी, अरुणा ईराणी, असित सेन व ललिता पवार यांची उत्तम साथही लाभली आहे. या चित्रपटाची निर्मिती एल. बी. ठाकूर यांनी केली आहे. गीतकार मजरुह सुल्तानपूरी, तर संगीत राहुल देव बर्मन यांचे आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या यशात गाण्यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘रातकली एक ख्वाबमें आयी...आयो कहाँसे घनश्याम...,’ आणि ‘भली भलीसी एक सुरत...’ ही गाणी कमाल असून, पन्नास वर्षांचा कालावधी उलटूनही या गीतांची जादू सिनेरसिकांवर कायम आहे, केवळ संगीतच नव्हे पन्नाशी गाठत असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास समर्थ आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरता कामा नये. आजकालच्या अश्लिलतेचा कळस गाठणाङऱ्या व केवळ यमक जुळवण्यासाठी शब्दांचा ओढून ताणून वापर करत भडक संगीतावर त्याला हिट व सुपरहिटची पावती देणाऱ्या चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट नक्कीच उजवा असून, खरे तर आता अशाच हलक्या फुलक्या चित्रपटांची गरज सिनेरसिकांना आहे. काही ठिकाणी अतिशयोक्तीचा कळस गाठलेला, पण तरीही संस्मरणीय चित्रपटांमध्ये दाखल असलेला ‘बुढ्ढा मिल गया’ काही औरच..

(लेखिका नामवंत समीक्षक आहेत.)