पानगळ.....

अनुभूती

Story: सागर मच्छिंद्र डवरी, ९६३७०७१४६४ |
24th January 2021, 12:31 pm
पानगळ.....

थंडीचे दिवस सुरू झाले.... हेमंत ऋतू संपला आणि शीशिर ऋतू सुरू झाला. हा ऋतू वातावरणात बरेच बदल घडवून आणतो. निसर्गात होणारे बदल ऋतुबदलाची चाहूल करून देतात. हेमंत ऋतूच्या पूर्वार्धात सुरू झालेली पानगळ अजून शिशिर ऋतूत सुरूच असते. अंगणातल्या आंब्याची पानगळ सुरूच होती. पानांनी अंगण भरून जात होते. बरेच दिवस पानगळ सुरू होती. रोज पाने पडत होती. पण, त्यासोबत नवी पाने त्या गळून गेलेल्या पानांची जागा घेत होती. नव्या पानांनी झाड पुन्हा बाळसे धरत होते. पुन्हा एकदा पोपटी रंगाची पाने हळूहळू हिरवीगार होऊन झाड अगदी पूर्वीसारखं दिसायला लागलं. अजून डौलदार झालं. पानगळीने जुनी पाने नव्या पानांना आपली जागा देऊन ओघळून गेलीत आणि नव्या पानांचा प्रवास सुरू झाला. 

या पानगळीसारखंच आपलं आयुष्य..! नवी पिढी जसंजशी मोठी व्हायला लागते तसंतशी आधीची पिढी म्हातारपणाकडे झुकायला लागते. या पिढीचे आयुष्य जाते मुलांना मोठं करण्यात, घर संसार, नोकरी- कामधंदा, नाती- गोती असं सगळं सांभाळण्यात. आयुष्याची धावपळ सुरूच. यासोबतच ही नवी पिढी अगदी जोमाने वाढत असते. त्यांच्या आशाआकांक्षांना बळ मिळत असते.

आयुष्यात पानगळीचा काळ फार महत्त्वाचा असतो. फार भावनिक काळ, मन गलबलून जाते. एवढा मोठा काळ या झाडाच्या सानिध्यात सग्या-सोयऱ्यांच्या सानिध्यात गेलेला असतो की तिथून जावसं वाटत नाही. आपली नाती, आयुष्यभर जोडलेले संबंध, मनाला भुरळ घालणारे हे जग कुणाला सोडावेसे वाटेल? तरीही इथून जाणं हे क्रमप्राप्त असतं. जिथं येणं, तिथं जाणं हे आलंच. जिथे जन्म तिथे मृत्यू निश्चित. आता फक्त नावानेच अमर होता येते. शरीरासह अमर राहणे ही फक्त कल्पना आहे.

हा आयुष्याचा शेवटचा काळ! आयुष्याच्या शेवटी एक रम्य संध्याकाळ असावी, असं प्रत्येकाला वाटतं. यावेळी सगळे हिशेब मनाच्या पटलावर आपोआप उमटायला लागतात. कधी एखाद्या गोड आठवणीने सुरकुतल्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटून जाते तर कधी वाईट गोष्टीची आठवण मनाला चटका लावून जाते. अजूनही मन गहिवरून येतं. केलेल्या चुकांची जाहीर माफी मागावी वाटते. पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगावे..! आयुष्यात राहिलेल्या उनाडक्याही मनसोक्तपणे कराव्याशा वाटतात. 

जशी ही पानगळ जवळ येते तशी समाधानाची भावनाही मनात भरुन उरते तर कुठं हुरहूरही वाढलेली दिसते. हे जग एक मायाजाल आहे. ते तुम्हाला इथच अडकवून ठेवतं. ज्याच्या इच्छा पूर्ण झाल्या तो समाधानाने ही पानगळ स्वीकारतो. पण, तरीही काही असतात जे अर्धवट इच्छांनी या पानगळीच्या उंबरठयावर येऊन पोहचतात आणि तसेच तिच्या स्वाधीन होतात, अनंतात विलीन होतात. कारण त्यानंतरचे आयुष्य कुणालाच माहीत नसते. असतात फक्त कल्पनांच्या असंख्य झालरी.

पानगळ.... सर्वांच्याच नशिबात असते असं नाही. काहींचा हा प्रवास आयुष्याच्या मध्येच कुठेतरी थांबतो... संपून जातो. येणारी काही वादळं झाड हलवून सोडतात, फांद्या पिरगळून टाकतात, पाने ओरबडून काढतात... नाहीतर एखादी कीड पाने कुरतडून टाकते. मग त्यांना पानगळीपर्यंत पोहचणे अवघड होऊन जाते. अशा सर्वांच्या वाट्याला येतंय ते अर्धवट, अपुरं आयुष्य..! त्यांच्याही नकळत त्यांचं आयुष्य अनपेक्षितपणे संपून जाते. अनपेक्षित एक्झिट होते. अशा वेळी नवे जुने सगळेच थोडे दुखावतात, पण काही दिवस गेले की पुन्हा सर्वांचे प्रवास पूर्ववत होतात. पुन्हा एकदा वाटचाल, पानगळीच्या दिशेनं.

पानगळ.... आयुष्याचा सुखद शेवट व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा..! नव्यानी विसरू नये आपण अशा ठिकाणी उभे आहोत की, ती जागा आपल्या आधीच्या पिढीने आयुष्य खर्ची घालून तयार केलीय. नव्या पिढीचे जगणे सुखकर व्हावे म्हणून!


नव्या दमाची, नव्या श्वासाची, 

पालवी फुटू लागली!

ऋतू बदलले आणिक, 

ही पानगळ सुरू झाली...!

पानगळ सुरू झाली, 

पिवळे पान सुटले.!

सुटलेल्या देठाजागी, 

नवे अंकुर फुटले..!

झाडानेही कात टाकली, 

पिकल्या पानांचा खाली सडा.!

नवचैतन्य नव्या जन्माचे, 

आरंभला नवा धडा..!


(लेखक सहाय्यक प्राध्यापक आहेत.)