Goan Varta News Ad

पोलिसांच्या बदल्यांचे सत्र!

अवघ्या काही तासांत फेरबदलही

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd January 2021, 12:48 Hrs
पोलिसांच्या बदल्यांचे सत्र!

पणजी : पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणात बदली सत्रास सुरुवात झाली असून, त्यात घोळ असल्याचे समोर येत आहे. गुरुवारी रात्री एका निरीक्षकाची हणजूण पोलिस स्थानकातून गोवा राखीव दलात करण्यात आली होती, परंतु शुक्रवारी मात्र तो निरीक्षक बदलीच्या प्रतीक्षेत असल्याचे नमूद करून शिवोली किनारी पोलिस स्थानकावर बदली करण्यात आली आहे. या घोळामुळे पोलिस खात्यात शुक्रवारी जोरदार चर्चा सुरू होती.
पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांच्या मंजुरीनुसार, मुख्यालयाचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी गुरुवारी एक आदेश जारी केला होता. या आदेशात हणजूण पोलिस स्थानकात सेवा बजावत असलेले आणि हल्लीच बढती मिळालेले निरीक्षक विद्धेश पिळगावकर यांची गोवा राखीव दलात बदली झाल्याचे तर प्रशल नाईक देसाई यांच्याकडे रायबंदर येथील सायबर विभागाचा तात्पुरता ताबा देण्यात आल्याचे नमूद केले होते. मात्र, पिळगावकर यांच्यासंदर्भातील गुरुवारचा आदेश शुक्रवारी सकाळी वाल्सन यांनीच रद्द करून नवीन आदेश जारी केला.
दरम्यान, वाहतूक पोलिस मुख्यालयाच्या नोटीस विभागात सेवा बजावत असलेले पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांची बदली बिनतारी संदेश विभागात करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त महिला पोलिस उपनिरीक्षक सुषमा भालेराव यांची दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकात, पोलिस उपनिरीक्षक अरुण राणे यांची मडगाव वाहतूक विभागात, श्रीकांत पाटील यांची फोंडा वाहतूक विभागात तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश कासकर यांची सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे वेगवेगळे आदेश पोलिस स्थापना मंडळाचा शिफारीनुसार मुख्यालयाचे अधीक्षक निधीन वालसन यांनी जारी केले आहेत.
निरीक्षक विद्धेश पिळगावकर यांची शुक्रवारी नव्या आदेशानुसार शिवोली किनारी सुरक्षा पोलिस स्थानकात बदली करण्यात आली. तसेच तिथे सेवा बजावत असलेल्या निरीक्षक राजेश कुमार यांची गुन्हा विभागात बदली केली. हा आदेश पोलिस स्थापना मंडळाचा शिफारसीनुसार जारी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.