Goan Varta News Ad

बांगलादेश निर्मितीच्या वेळेची स्थिती पहाण्याची संधी

इफ्फीत इंडियन पॅनोरमा आणि कंट्री फोकसचे उद्घाटन

|
17th January 2021, 11:27 Hrs
बांगलादेश निर्मितीच्या वेळेची स्थिती पहाण्याची संधी

फोटो : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागाचे उद्घाटन झाल्यानंतर उपस्थित मान्यवर. (नारायण पिसुर्लेकर)
.................................
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : हायब्रिड पद्धतीने होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फीत) दुसऱ्या दिवशी रविवारी इंडियन पॅनोरमा आणि कंट्री फोकस विभागाचे उद्घाटन झाले. १९७१च्या युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली. या वर्षी बांगलादेशला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. १९७१ साली पाकिस्तानातील स्थिती आणि संघर्ष कसा होता हे पहाण्याची संधी ‘रूपसा नोदिर बांके’ या चित्रपटातून मिळणार आहे. या चित्रपटाने ‘कंट्री फोकस’ विभागाचे उद्घाटन झाले.
‘कंट्री फोकस’ विभागासाठी यावर्षी बांगलादेशची निवड झाली आहे. ‘रूपसा नोदिर बांके’ चित्रपटाचे कथानक डाव्या विचारसरणीचे नेते मानोव्रतम मुखर्जी यांच्या जीवनावर आधारित आहे. ब्रिटिश राजवटीत या नेत्याने स्वदेशी चळवळ राबवली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर दंगली उसळल्या होत्या. या दंगलीचे चित्रणही या चित्रपटात आहे. बांगलादेश निर्माण होण्यापूूर्वी तेथील शेतकरी आणि गरीब लोकांवर जो अन्याय झाला, त्याविरुद्ध मानोव्रतमने लढा दिला होता, असे चित्रपटाचे दिग्दर्शक तन्वी मुकल्लम यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटाच्या कथानकाची माहिती दिली.
चित्रपटाला देशाच्या सीमांचे बंधन नसते. बांगलादेशात कशा प्रकारचे चित्रपट तयार होतात, त्याची कल्पना ‘कंट्री फोकस’ विभागातील चित्रपट पाहिल्यानंतर येईल, असे महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी सांगितले. करोना महामारीमुळे यंदाचा महोत्सव हायब्रिड स्वरूपाचा आहे. दरवर्षीप्रमाणे रसिकांची गर्दी दिसत नाही. रविवारी ‘इंडियन पॅनाेरमा’ विभागाचेही उद्घाटन झाले. फिचर फिल्म विभागाचे ‘सांड की आँख’, तर ‘नॉन फिचर’ विभागाचे ‘पांचिका’ या गुजराती चित्रपटाने उद्घाटन झाले. लोकशाही पद्धतीने इंडियन पॅनोरमातील चित्रपटांची निवड झाली, असे परीक्षक मंडळाचे अध्यक्ष जॉन मॅथ्यू मेथन यांनी सांगितले. भारतात खऱ्या नायकांच्या बऱ्याच कहाण्या आहेत. या कथा लोकांपर्यंत पाेहोण्याची गरज आहे, असे ‘सांड की आँख’ चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.