Goan Varta News Ad

सरकारी कर्मचाऱ्यांना गृहकर्जासाठी ओटीएस

कर्ज, व्याज रकमेवर लाभ : २८ फेब्रुवारीपर्यंत राहणार सुरू

|
17th January 2021, 11:22 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : घरासाठी सवलतीच्या दरात कर्ज घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ओटीएस योजना लागू केली आहे. १५ मे २०२० पर्यंत कर्ज खाते सक्रिय असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कर्जाची जी रक्कम भरणे शिल्लक आहे आणि व्याजाची रक्कम यावर योजनेचा लाभ मिळणार आहे. लेखा संचालनालय आणि बँकेकडे १५ मे २०२० पर्यंत जी नोंद आहे, त्यावर योजनेचा लाभ मिळेल. समजा कर्मचाऱ्याची बँकेकडे २,५०,००० रुपयांची कर्जाची थकबाकी आहे. लेखा संचालनालयाकडे व्याजासह १५ मे २०२० पर्यंत १,००,००० रुपयांच्या थकबाकीची नोंद आहे. या स्थितीत सरकार १,५०,००० रुपयांचा भार पेलू शकते. ज्या कर्मचाऱ्यांचे १५ मे २०२० पर्यंत बँक ऑफ इंडिया वा एचडीएफसी या बँकेत गृहकर्जाचे खाते आहे, ते या योजनेसाठी पात्र आहेत. २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही योजना सुरू राहील.
योजनेचा लाभ घेऊ इ‌च्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विहीत नमुन्यात खाते प्रमुखांकडे अर्ज करावा. खाते प्रमुखांनी तो शिफारस करून लेखा संचालनालयाकडे पाठवावा. अनुदानित संस्था असल्यास संबंधित प्रशासकीय खात्याकडे प्रमुखांनी अर्ज पाठवणे गरजेचे आहे. कर्ज खाते दुसऱ्या बँकेकडे वळवले असल्यास वा कर्ज खाते बंद केले असल्यास त्या कर्मचाऱ्याने थकबाकी नाही, असे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. बँकेकडून प्रमाणपत्र घेऊन ते प्रमुखांकडे सादर करावे. कर्ज खाते सुरू असल्यास लेखा संचालनालय त्याची खात्री करून रक्कम बँकेत भरेल. कर्ज खाते अन्य बँकेत वर्ग केले असल्यास वा बंद केले असल्यास कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळेल. या योजनेसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांत बदल होण्याची शक्यता आहे.
नव्या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा
सरकारी कर्मचाऱ्यांना घरासाठी सवलतीच्या दरात कर्ज देण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली होती. करोना महामारीच्या काळात ही योजना बंद केली. सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ही योजना बंद करू नये, अशी मागणी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आता सरकारने कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी ओटीएस योजना सुरू केली आहे.