फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने उचलली तातडीची पावले
नवी दिल्ली : एकीकडे करोनाचे संकट असताना भारतात पक्षांच्या तीव्र गतीने होणाऱ्या मृत्युमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून जंगली पक्षी, कावळे आणि कोंबड्यांच्या मृत्यूच्या कारणांचा तपास करण्यात येत आहे. बर्ड फ्लू रोखण्यासाठी केंद्र सरकारने स्थानिक अधिकाऱ्यांसोबत समन्वय अधिक तीव्र केला आहे.
बर्ड फ्लूची साथ रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीची पावले उचलली असून पशुपालन आणि डेअरी विभागाने संभाव्य हॉटस्पॉटवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत ज्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा आणि गुजरातचा समावेश आहे.
दरम्यान, दिल्ली, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या राज्यांमध्ये बर्ड फ्लू आहे किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे. दिल्लीत बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता जसोला येथे गेल्या तीन दिवसांमध्ये कमीतकमी २४ कावळे आणि संजय सरोवरात १० बदके मृतावस्थेत आढळली आहेत. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात असलेल्या कुक्कुट पालन केंद्रात ९०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे पाहण्यासाठी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आम्हाला तपास अहवालाची प्रतीक्षा आहे, असे परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुलगीकर यांनी सांगितले.
उत्तराखंड जिल्ह्यात गढवाल जिल्ह्यातील सिताबपूर परिसरातील एका नाल्यात ५ कावळे मृतावस्थेत आढळले. या बरोबरच हरयाणातील पंतकुला जिल्ह्यात ५ कुक्कुटपालन केंद्रांमध्ये १.६० लाखांहून अधिक कुक्कुट पक्षी मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, कुक्कुट पालन केंद्रांच्या मालकांना ९० रुपये प्रति पक्षाच्या हिशेबाने नुकसान भरपाई दिली जाणार आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात पंचकुला येथे कुक्कट पालन केंद्रांमध्ये सुमारे ४ लाख पक्षांचा मृत्यू झाला आहे.
- महाराष्ट्रातील एका कुक्कुटपालन केंद्रात ९०० पक्षांसह संपूर्ण भारतात शनिवारी १,२०० हून अधिक पक्षी मृतावस्थेत आढळले. या बरोबरच उत्तर प्रदेशात देखील बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबरोबर देशात एकूण ७ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झालेला आहे.
- राजस्थानात शनिवारी ३५० हून अधिक पक्षी मेल्याचे वृत्त आहे. याबरोबर राज्यात मृत्यू पावलेल्या पक्षांची संख्या २,५१२ वर पोहोचली आहे. शनिवारी मृत्युमुखी पडलेल्या पक्षांमध्ये २५७ कावळे, २९ कबुतरे, १६ मोर आणि ५४ इतर पक्षांचा समावेश आहे.