Goan Varta News Ad

मोरपंखी आवाजाचा गायक

रुपेरी पडदा

Story: विद्या नाईक होर्णेकर |
10th January 2021, 01:11 Hrs
मोरपंखी आवाजाचा गायक

‘नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाजही पहचान है, गर याद रहे...’ या चार ओळीत खरे तर जीवनाचे सार दडलेले आहे. एक आवाज वगळता प्रत्येक मानवात वयानुरुप बदल हे होतच असतात. त्यामुळे मनुष्य जीवनात आवाजाचे महत्त्व वेगळे सांगावयास नको. त्यातही जिच्यावर सरस्वतीची कृपा असेल त्या व्यक्तीच्या आवाजातील गोडवा काही औरच... त्यामुळे आज अनेक गायक असे आहेत ज्यांच्याविषयी इतकेच म्हणावे लागेल की, ‘आवाजही काफी है’... अशाच गायकांपैकी एक म्हणजे येसूदास. ज्यांचा आवाज हळुवार मोरपंखी आवाज केवळ त्यांच्या गाण्यातील वेगळेपणच सिद्ध करत नाही तर श्रोत्यांना भावविभोर करतो. अशा या ख्यातनाम शास्त्रीय संगीतकार व गायक के. जे. येसूदास यांचा आज वाढदिवस.

येसुदास यांचा जन्म १० जानेवारी १९४० रोजी केरळमध्ये एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचे वडील ऑगस्टिन जोसेफ हे मल्याळी नाटकामध्ये अभिनेता आणि संगीतकार होते. त्या संगीतप्रेमी पित्याने आपल्या मुलाचे कलागुण अचूक हेरले. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपला मुलगा संगीतक्षेत्रात नक्कीच इतिहास घडवेल, अशी त्यांना खात्री असावी, म्हणूनच की काय त्यांनी येसूदास यांना ते चार वर्षांचे असतानाच गाण्याची तालीम देण्यास सुरवात केली. त्यांचे पहिले गुरू त्यांचे वडीलच होते. बालपणी कोचीत आयोजित एका गायन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत येसूदासनी आपल्या वडिलांच्या विश्वासावर जणू शिक्कामोर्तबच केला. परिस्थिती नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना संगीत शिकण्यासाठी तत्कालीन सर्वोत्कृष्ट संगीत विद्यालयात दाखल केले. त्यांचे सगळे प्रयत्न फळास आले.

येसूदास यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९६१ मध्ये झाली. त्यांना एम. बी. श्रीनिवासन या संगीतकाराने पहिला ब्रेक दिला. चेन्नईच्या ज्या स्टुडिओमधून त्यांना गायक म्हणून अपात्र ठरवले होते. तिथेच त्यांनी आपल्या गायकीचा ठसा उमटवला व त्यानंतर मल्याळम, तामिळ, तेलगु, कन्नड आदी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्यांच्या गायकीचा बोलबाला झाला. त्यांची कीर्ती अगदी सातासमुद्रापार गेली. १९६५ मध्ये त्यांना रशियन सरकारने गाण्यासाठी खास निमंत्रण दिले. त्यामुळे त्यांच्या आवाजाची कीर्ती हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचणे स्वाभाविकच होते. संगीतकार सलिल चौधरी यांनी त्यांना बासू चटर्जींच्या ‘छोटीसी बात’ या चित्रपटासाठी करारबद्ध केलं व ‘जानेमन जानेमन तेरे दो नयन...’ म्हणत येसूदास यांनी बॉलिवूड प्रवेश केला. त्यांनी अनेक हिंदी कलाकारांना आवाज दिला असला तरी अमोल पालेकरसारख्या हळूवार नायकाचा मखमली आवाज म्हणूनच ते अधिक ओळखले गेले. त्यांनी रवींद्र जैन, बाप्पी लाहिरी, खय्याम, राजकमल, सलिल चौधरी इतकेच नव्हे तर ए. आर. रेहमान यांच्यासाठीही गीते गायली आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा योग्य वापर बॉलिवूडमध्ये झाला नाही. त्यामुळेच असावे की हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या वाट्यास अत्यल्प गीते आली. मात्र जी गीते त्यांनी गायली त्या गीतांनी यशोशिखर गाठले. ‘क्वांटीटी’पेक्षा ‘क्वालिटी’वर त्यांनी भर दिला. त्यामुळेच असावे की हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचे प्रत्येक गीत अविस्मरणीय ठरले.

मग ते ‘सदमा’ तील हृदयाला स्पर्शून जात डोळे पाणवणारे अंगाई गीत ‘सुरमई अखियोंमें नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे...’ असो की ‘दौड’ चित्रपटातील ‘ओ भँवरे....’ येसुदास यांनी विविध भाषेत मिळून हजारो गाणी गायली आहेत. साठ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर अनेक पुरस्कारांचाही वर्षाव झाला. येसूदास यांना गायक म्हणून सात वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पराक्रम करणारे ते देशातील एकमेव गायक आहेत. गोरी तेरा गांव बडा प्यारा, जब दीप जले आना, दिल के टुकडे, मधुबन खुशबू देता है, आज से पहले, तू जो मेरे सूर मे, का करू सजनी ही त्यांची काही हिंदी गाणी.

येसुदास यांनी ‘वडाक्कुम नाथम’, ‘मधुचंद्र लेखा’ आणि ‘पट्टनाथिल सुंदरन’ अशा चित्रपटांची निर्मितीही केली आहे. केरळ सरकारने संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम ‘स्वाती पुरस्कारम’ हा पुरस्कार देऊन येसूदास यांचा गौरव केला आहे. फिल्मफेअरसारखे अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कारही बहाल करण्यात आले आहेत. युनेस्कोने त्यांच्या संगीत आणि शांततेसाठी केलेल्या कार्याचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्यांनी पुढील काळात आपण कुठलाही पुरस्कार स्वीकारणार नसल्याची घोषणाच केली आहे, इतके पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

या मानसन्मानासोबतच काही बोचक प्रसंगही त्यांच्या वाट्यास आले. त्यांचे गुरु चेन्बाई वैद्यनाथ भागवातर त्यांना केरळच्या गुरुवायूर मंदिरात घेऊन गेले होते, जिथे येसुदास ख्रिश्चन असल्याने मंदिरप्रवेश नाकारण्यात बसून रात्रभर मल्याळम भक्तीगीतांची मैफल रंगली. येसूदास यांचे मंदिरात बसून ‘कृष्ण महिमा’ गाण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. येसूदास दरवर्षी शबरीमाला मंदिरात यात्रेदरम्यान दर्शनास जातात. पद्मनाभ स्वामी मंदिरात त्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चळवळ चालवली होती. तिला यश मिळाले. आजही अय्यप्पा मंदिराचे दरवाजे सायंकाळी बंद करण्यापूर्वी ‘हरीवरसनम्’ हे येशुदास यांच्या आवाजातील भजन वाजवले जाते. हा नित्यक्रम झाला असून, इतर अनेक गायकांनी हे भजन गायलेलं असूनही येशुदास यांच्याच भजनाला मंदिराकडून स्वीकृती मिळाली आहे. येशुदास यांची कर्नाटकातील कोल्लूर येथील मुकांबिका देवीवरही श्रद्धा आहे. २००० पासून ते दरवर्षी त्यांचा वाढदिवस या मंदिरात गाणे गाऊनच साजरा करतात. एकदा ख्रिश्चन धर्मगुरूनी त्यांना इतर धार्मिकस्थळांमध्ये गायनास मज्जाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र येसुदास यांनी आपली संगीतसाधना कुठल्याही एका धर्मासाठी मर्यादित ठेवली नाही. त्यामुळेच त्यांचा आवाज जाती-धर्मच नव्हे तर देशांच्या सीमा पार करण्यात यशस्वी ठरला. या महान गायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

(लेखिका नामवंत सिनेसमिक्षक आहेत.)