Goan Varta News Ad

हरहुन्नरी अंजू कामत

परिचित

Story: कविता आमोणकर ९९६०५ ६८७९० |
10th January 2021, 01:04 Hrs
हरहुन्नरी अंजू कामत

या अंबरातल्या नीलपटावर श्याम कन्हैया नाचे

या अवनीपटाच्या रास लयीवर एक बासुरी बाजे....

म्हजी सुदबुद आणि रितबीत तू भिजूनी चिंब चिंब रे

नीळ रंगी रंगला रे, कान्हा नीळ रंगी रंगला..

गोव्याचे प्रसिद्ध कवी स्व. श्रीधर कामत यांनी लिहीलेल्या आणि शंकर महादेवन यांनी गायिलेल्या या गीताने संगीत क्षेत्रामध्ये अक्षरश: उधाण आले होते. या गीताने प्रचंड लोकप्रियता मिळवली. प्रसिद्धीच्या झोतात असतानाच श्रीधर यांच्यावर काळाने आकस्मिक हल्ला केला आणि वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. त्यांची गाजलेली गीते सीडी, कॅसेट या माध्यमातून प्रसारित झाली. परंतु, त्यांचे हे साहित्य पुस्तकरुपाने प्रकाशित करून अजरामर करण्याचे कार्य त्यांच्या अर्धांगिनी अंजू कामत यांनी करुन आपल्या पतीला एका प्रकारे श्रद्धांजली देण्याचे कार्य केले.

श्रीधर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे साहित्य पुस्तकरुपाने प्रकाशित करुया असा मानस अंजू यांचा होता. परंतु त्याला श्रीधर यांनी नकार दिला. परंतु, श्रीधर यांच्या निधनानंतर त्यांचे हे सर्व मौलिक साहित्य पुस्तकरुपाने अजरामर करण्याचे कार्य अंजू यांनी निर्धाराने तडीस नेले. पतीच्या आकस्मिक निधनानंतर खचून न जाता आपले दु:ख मनामध्ये लपवून जगाला सामोरे गेल्या. श्रीधर यांच्या जयंतीदिनी त्यांचे साहित्य त्यांनी प्रकाशित केले. ‘इनफिनट श्रीधर’ (गीते), ‘इनफिनट श्रीधर’ (काव्य), ‘जैत’ पुस्तकाची दुसरी आवृत्ती, तसेच ‘बेसूर’ ही पुस्तके त्यांनी संजना पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित केली. श्रीधर यांनी लिहिलेली पारितोषिक प्राप्त एकांकिका, नाटकांचा संग्रह ‘बेसूर’ या पुस्तकात आहे.

श्रीधर जरी पेशाने अभियंता असले, तरी त्यांचा पिंड हा साहित्यिक होता. साहित्याशी त्यांचे असलेले नाते अतूट होते. त्यांनी लिहीलेली गीते अनेक चित्रपटांत गाजली. त्यांना गीत लिहिण्याची उर्मी आली, की ते मिळेल त्या साधनावर गीत लिहून ते पूर्ण करत असत. प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजेंद्र तालक यांच्या ‘आलिशा’ चित्रपटातील तुफान लोकप्रियता मिळालेले गीत ‘कळी कळी.. मोनी कळी..’ हे गीत तर त्यांना विमानात असताना सुचले होते. व तेथेच त्यांनी ते लिहून पूर्ण केले. अशी श्रीधर यांची आठवण सांगताना अंजू यांनी सांगितली. श्रीधर यांना रात्री अपरात्री, कुठेही काव्य स्फुरत असे आणि त्यावेळेस ते मिळेल त्या कागदाच्या चिटोर्‍यावर आपली प्रतिभा साकारात असत. त्यांनी लिहीलेले हे सर्व साहित्य सांभाळून ठेवण्याचे काम अंजू या सदैव तप्तरतेने करत असत. त्यासाठीच श्रीधर यांचे साहित्य हे संग्रहित झाले.

श्रीधर यांचा साहित्याशी घनिष्ट संबंध होता. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील कवी ग्रेस, गायिका किशोरीताई आमोणकर, संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर, पं. भास्कर चंदावरकर, सलीम, गायक शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर या व इतर अनेक मातब्बर कलाकारांशी त्यांचा घनिष्ट संबंध आला. त्यामुळे आपसूकच अंजू यांचाही या मातब्बर कलाकारांशी संपर्क आला. त्यांच्यापासून अनेक सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या.

मडगावच्या ‘अप्रूप’ या ग्रुपतर्फे १९८४ साली कलाकार साईश पाणंदीकर, केतन भट, शशांक शिंक्रे, प्रसाद शिंक्रे, अभय खंवटे, सुहास सडेकर यांनी एक कॅसेट काढली. त्यात श्रीधर यांची गीते गाजली. त्यानंतर मडगावचे उद्योजक दीपक कारापूरकर यांनी काढलेल्या ‘तुजे विणें’ या सीडीमधील श्रीधर यांची गीते लोकप्रिय झाली.  संगीतकार सिद्धनाथ बुयांव निर्मित ‘मस्ती बडी’, ‘एक नाते’ मधील श्रीधर यांनी लिहिलेले ‘रे दामोदरा’ हे भक्तीगीत संपूर्ण गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेरही लोकप्रिय झाले. मडगावचे उद्योजक व चित्रपट निर्माते राजेंद्र तालक यांच्या ‘सावरिया डॉट कॉम’ व ‘आलिशा’ या चित्रपटातील श्रीधर यांची सर्वच गाणी लोकप्रिय झाली.

आज अंजू या मडगाव घोगळ येथील मॉडेल प्राथमिक शाळेच्या पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहेत. मुलांच्या अंगातील सुप्त गुण ओळखून त्यांना वाव द्यायला आवडते. पतीचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करतानाच त्यांनी आपले विविध छंद जोपासले. घरी संग़्रही असलेल्या विविध विषयांवरील पुस्तकांत त्या हरवून जातात. अंजू या स्वतः एक उत्तम कवयित्रीही आहेत. त्यांच्या कवितांना काव्यमैफिली व सोशल मिडीयावर प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिक्रिया मिळतात. 

भरतकाम, विणकाम करताना स्वत: चित्रीत केलेली नक्षी व त्यावर भरतकाम, विणकाम करताना त्यांनी अनेक सुंदर टेबलक्लॉथ, बेड्शीट्स तयार केली. कॅनव्हासवर चित्रीत केलेली त्यांची चित्रे पाहून त्यांच्यातील चित्रकाराची साक्ष पटते. रिकाम्या बाटल्या त्या अतिशय सुंदर रितीने रंगकाम करुन त्या आकर्षक रितीने सजवतात. घराच्या जागेभोवती त्यांनी विविध प्रकारची झाडे, रोपटी लावून अतिशय आकर्षक असा बगीचा तयार केला आहे. यातील काही रोपटी तर त्यांनी पोर्तुगालच्या सफरीवरून येताना आणली आहेत. स्वयंपाक करताना विविध पारंपरिक तसेच विविध प्रकारची व्यंजने बनवण्यात तर त्यांचा हातखंडा आहे. आणि हे पदार्थ करतानाच घरी आलेल्या गेलेल्या पाहुण्यांना प्रेमाने खाऊ घालताना त्यांना वेगळाच आनंद मिळतो. आणि त्यांच्या घरी गेलेला प्रत्येक जण अंजू यांच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाने भारावून जातो..... अगदी मी भारावून गेले, तसेच!!

(लेखिका पत्रकार आहेत.)