Goan Varta News Ad

मास्क माहात्म्य

टीपकागद

Story: प्रतिभा कारंजकर |
10th January 2021, 01:01 Hrs
मास्क माहात्म्य

लहानपणी माझी शाळा जैन मंदिराजवळ होती. त्यामुळे रोज सकाळी- सकाळी शाळेत जाताना तोंडाला पांढरा शुभ्र फडका बांधलेल्या शुभ्रधवल वस्त्र परिधान केलेल्या काही जैन साध्वी स्त्रिया अनवाणी मंदिराकडे चालत जाताना दिसायच्या. त्यांच्या त्या आगळ्यावेगळ्या पेहरावामुळे नकळतच लक्ष वेधलं जायचं. त्यांच्या धर्मात सांगितल्याप्रमाणे त्यांना वर्तन करावं लागतं, तेव्हा त्यांच्या असा तोंड झाकून घेण्यामागचं कारण काही तेव्हा माहीत नव्हतं. पुढं मोठं झाल्यावर त्यातला अर्थ कळला. दुसरे जीवजंतु, किडे यांना आपल्यापासून काही त्रास, धोका होऊ नये म्हणून त्यांना अटकाव करण्यासाठी त्या ते वापरत, आपल्याकडून त्यांची हत्या होऊ नये म्हणून अशी अहिंसावादी भूमिका त्यात होती. अहिंसावादी जैन धर्म हा सूक्ष्म किड्या, मुंग्यांचा, प्राण्यांचाही विचार करणारा. सात्विक विचारांचा. अजूनही ते लोक जेवणात कांदा, लसूण वर्ज्य मानतात. 

आता आपण मास्क वापरतो त्यात ही अहिंसावादी भूमिका नसली, बाहेरच्या जीव, जंतूंपासून विशेषतः करोनापासून आपलं रक्षण व्हावं ही मात्र खबरदारी त्या द्वारे घेतली जातेय. आपण एक सुरक्षा कवच म्हणून ते वापरतो.  करोनासारख्या महामारीच्या सूक्ष्मरूपी व्हायरसचा आपल्या शरीराशी विशेषता: नाक आणि तोंडाशी संपर्क होऊ नये म्हणून आपण ते वापरायला लागलो. आता तर जपानमध्ये मास्क वापरणं हे एक सोशल कल्चर बनलं आहे. इतकी लोकांना त्याची सवय झाली आहे. रोग झाल्यावर औषधपाणी करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून खबरदारी घेतलेली लाख पटींनी चांगली. मागे व्हाॅटसअपवर एक कविता याविषयी वाचण्यात आली होती. एवढ्याश्या चिंधीला इतकं महत्वाचं स्थान प्राप्त होईल, असं कधी वाटलं नव्हतं. जेव्हा कृष्णाचं बोट कापलं तेव्हा त्याच्या बोटाला रक्ताची धार लागली तेव्हा कसलाही विचार न करता द्रोपदीने नेसलेल्या भरजरी शालूची चिंधी फाडून ती त्याच्या बोटाला बांधली आणि त्या चिंधीला लाख मोलाचं महत्व प्राप्त झालं. तसं या करोनामुळे शिंप्याच्या ढिगाराभर चिंध्यांना अचानक महत्व आलं. मास्कच्या वापरामुळे कापडाच्या तुकड्यांचं महत्व एकाएकी वाढलं. दिल्लीला तर मास्क नसेल तर दोन हजार रुपये दंड आकारण्यात येतोय.

लहान असताना बुरखा घालून वावरणार्‍या मुसलमानी स्त्रिया पाहून नवल वाटायचं. त्यांचा श्वास गुदमरत नसेल का? त्यातून नीट दिसत असेल का? की धडपडत चालत असतील, असे अनेक प्रश्न मनात उभे राहत. चिंगीची गोष्ट वाचल्यापासून तर प्रत्येक बुरखाधारी स्त्रीच आहे की आत पुरुष अशी शंका मनात यायची. आता या मास्कमुळे ही असेच मन साशंक बनले आहे. आता ही भेटलेली व्यक्ती कोण होती याची मनात शंका आधी येते, मग आवाज ऐकल्यावर ओळखता येते. पण तोपर्यंत त्या व्यक्तीचा गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकेच्या दारातला, ऑफिसच्या बाहेर उभा असलेला किंवा सोसायटीच्या गेटमधला गुरखा यांना याचा जास्त त्रास होत असेल आत जाणारी किंवा बाहेर जाणारी व्यक्ती नक्की कोण हे ओळखणं मास्कमुळे कठीण जात असेल. एव्हढ्याशा या विषाणूने सगळ्यांची तोंडे बंद करून टाकलीत. मास्क लावून समोरचा काय बोलतो हे जरा अंमळ उशीरानेच लक्षात येतं. सराव झाल्याशिवाय ते कळणं अवघडच आहे. मुलगी बघायला जाताना किंवा एखाद्या मुलाने प्रपोज करताना मास्क न वापरणं हेच चांगलं. नाहीतर त्यावेळी तिचा किंवा त्याचा नकार होता की होकार हे आयुष्यभर कळणारच नाही. ते आधी स्पष्ट करून घ्यावं नाहीतर मी मास्कमधून नाही म्हटलं होतं असं ऐकून घेण्याची वेळ यायची. आणि याच्या सतत वापराने पूर्वी जसा ‘घुंघट उठाना’ हा लग्नानंतरचा एक विधी असतो तसा ‘मास्क हटाना’ हा एक विधीच होऊन बसेल, मास्क घालणं हा जीवनाचा एक टास्क बनून राहील. हळूहळू  ती एक परंपरासुद्धा होऊ शकेल. आणि त्यावरच्या म्हणी येतील- बायकांनी डोईवरचा पदर आणि तोंडावरचा मास्क ढळू देऊ नये. मास्कने तोंड लपवणे, मास्क लावून बुक्क्यांचा मार, मास्क तोंडाला वळसा गावाला. आपला मास्क ठेवायचा झाकून दुसर्‍याचा पाहायचा वाकून. मास्क लावी तो करोना मुक्त राही. लहान तोंडी मोठा मास्क. इत्यादी. 

यापूर्वी फक्त ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना डॉक्टर लोक मास्क वापरायचे किंवा एखाद्या कारखान्यात केमिकल अपायापासून बचाव म्हणून मास्क वापरले जायचे किंवा विमान प्रवासात विमान सुरू होण्यापूर्वी सेफ्टीच्या टिप्स दिल्या जातात, त्या ऑक्सीजन मास्क कसा वापरायचा याचं प्रात्यक्षिक हवाईसुंदरी देतात ते पाहिलं होतं, पण कधी काळी आपल्यावरही असा मास्क सतत लावायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. पण, कालाय तस्मै नमा: म्हणत परिस्थितीला शरण जाऊन तेही करावं लागतंय. हा मास्क घालण्याच्या ही प्रत्येकाच्या आपल्या आपल्या वेगळ्या पद्धती आहेत. कुणी गॉगल अडकावावा तसा केसांवर अडकवतात, कुणी कानावर ठेवतात कुणी गळ्यात अडकवतात समोर कुठे पोलिस दिसला की नाकावर घेतात. काहीजण तर चक्क हातात घेऊन फिरतात तर काही बायका पर्समध्ये घेऊन फिरतात. काहीजण बोटावर कीचेन गोल गोल फिरवत रहातात तसा मास्क फिरवताना दिसतात. म्हणजे त्याच्या वापराचा उद्देश हा कोसो दूर रहातो. 

आता तर डिझायनर मास्क वापरायचे फॅड आले आहे. परवा कुणी मला नाजूक हॅन्ड अंब्रोयडरी केलेला मास्क गिफ्ट दिलाय. लग्न समारंभात कुणाची साडी भारी हे पाहतात तशा बायका आता कुणाचा मास्क भारी हेही पाहू लागल्या आहेत. परवाच ऐकलं कुणी तरी लग्न पत्रिकासोबत एक मास्क आणि एक सानिटायजरची बाटली पण दिली. खबरदारी म्हणून हे ठीक आहे, पण त्याचा योग्यरित्या वापरही झाला पाहिजे. आजकाल साडीला, ड्रेसला मॅचिंग होणारे मास्कसुद्धा मिळू लागलेत. भरजरी शालूवरचेही मास्क बनवून दिले जाऊ लागलेत. साडीला फॉल पिको करायला देताना त्यातल्या मॅचिंग ब्लाऊज पिसची लांबी वाढवली जाऊन त्यात मॅचिंग मास्कसुद्धा तयार होईल, अशी रचना होऊ लागली आहे. लग्नात नववधूला, नवर्‍याला नवीन टाईपचे आकर्षक मास्क लावले जातात कारण फोटोत चांगले दिसले पाहिजे. लहान मुलांनी लावावेत म्हणून त्यांच्या मास्कवर त्यांच्या आवडीचे कार्टून असलेले मास्क मिळतात. सिगरेट ओढणार्‍यांना ‍किंवा पान, तंबाखू, गुटखा खाऊन पिचकार्‍या मारणार्‍या लोकांना मात्र या मास्कचा फारच अडथळा होत असेल. या कारणामुळे व्यसने कमी झाली तर चांगलीच गोष्ट आहे. संरक्षक अशी असली तरी काहींना ती नकोशी वाटणारी गोष्ट आहे. 

तसं पाहिलं तर माणूस समाजात वावरताना एक वेगळाच चेहरा किंवा मास्क घालून वावरत असतो. त्याचा खरा चेहरा त्याच्या मागे लपला असतो. हसणारा चेहरा आपल्या आतले दुख लपवत सामोरा येतो तोही एक प्रकारचा हसण्याचा मास्क घालूनच आलाय असं म्हणता येईल. घाणेरड्या मुखवट्यांचे मास्क घालून समाजात वावरणारे लोक आतून वेगळेच असतात तर कधी साधूसंतांचे मास्क घालून येणारे आतून काही वेगळेच असतात. जसा फ्रांस, इटलीमध्ये कार्निव्हलच्या मिरवणुकीत चेहर्‍यावर मास्क चढवून लोक शामिल होतात, तसे आता सगळीकडेच या मास्कवाल्यांचे राज्य अवतरले आहे, असं वाटू लागलेय. असं या मास्कचं माहात्म्य वाढतच जाताना दिसतंय.   

जोपर्यंत लस सापडत नाही तोपर्यंत मास्क हाच पर्याय आहे, विषाणूच्या संक्रमणापासून बचाव करण्याचा तोच एक स्वस्त आणि चांगला मार्ग आहे. नियमितपणे त्याचा वापर करून आणि सार्वजनिक ठिकाणी अंतर राखून या रोगापासून दूर रहाता येईल. स्वतः तर वापरायचाच दुसर्‍यालाही लावायला सांगायचा, मास्क वापरुन करोनाला मात देऊ शकतो. उद्या लस जरी आली तरी मास्क वापरावाच लागेल, कारण कोणी लस घेतलीय आणि कोणी घेतली नाही हे कळायला मार्ग नाही म्हणून सर्वांनीच मास्क वापरला पाहिजे. नाहीतर संक्रमणाचा धोका वाढू शकतो. मास्क आता आपल्या जीवनशैलीचाच एक भाग बनून राहील असं वाटतंय. 


(लेखिका गृहिणी, साहित्यिक आहेत.)