निवृत्त पत्रकारांना माहिती खात्यात सामावून घेऊ

संचालक सुधीर केरकर : अरविंद धुरी यांच्यासह चार जणांचा सत्कार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th January 2021, 12:16 am
निवृत्त पत्रकारांना माहिती खात्यात सामावून घेऊ

सत्कारमूर्ती अरविंद धुरी, रामनाथ देसाई, प्रकाश कुर्डीकर, जनार्दन नागवेकर यांच्यासमवेत प्रमुख पाहुणे सुधीर केरकर. मागे सुहास बेळेकर, लीना पेडणेकर, चित्रा क्षीरसागर, रमेश वंसकर, शंभू बांदेकर, प्रकाश धुमाळ व विनायक नाईक.

पणजी : निवृत्त झालेले संपादक, पत्रकार यांची माहिती गोळा करून त्यांना माहिती खात्यात सामावून घेण्याचा मनोदय व्यक्त करून, गोवा शासनाच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक सुधीर केरकर यांनी आपण संचालकपदावर असेपर्यंत पत्रकारांना हक्कासाठी लाचार होण्याची पाळी येणार नाही, असे येथे आश्वासन दिले.
गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि गोवा मराठी पत्रकार संघातर्फे बुधवारी मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने सुधीर केरकर बोलत होते. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुर्डीकर, अरविंद धुरी, जनार्दन नागवेकर व रामनाथ देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्याकडे काहीच नसते तेव्हा संयम हवा आणि सगळे काही असते तेव्हा दृष्टिकोन हवा, हा दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा विचार उद्धृत करून केरकर म्हणाले, सामाजिक जाणीव महत्त्वाची आहे. चांगल्या उपक्रमांना आपल्या खात्याचे नेहमीच सहकार्य राहील, असे अभिवचनही त्यांनी दिले.
सत्काराला उत्तर देताना रामनाथ देसाई म्हणाले, मी ग्रामीण भागात पत्रकारिता करताना माधवराव गडकरी, नारायण आठवले, दत्ता सराफ हे संपादक वाघाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांचा मोठा धीर होता. मी निर्भीडपणे पत्रकारिता केली. लाचारी कधी पत्करली नाही. बिकट स्थितीत स्वच्छ मनाने काम केले. माझ्या शिक्षकी पेशावर गदा आणण्याचे प्रयत्न केले गेले.
जनार्दन नागवेकर यांनी सांगितले, की आपण निरपेक्षपणे आपले काम करत रहावे. आपले आचरण, मानवता धर्म सांभाळायला हवा. पत्रकारितेत बरे वाईट अनुभव आम्हीही घेतले.
मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यवाह चित्रा क्षीरसागर यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. कार्यकारी सदस्या लीना पेडणेकर यांनी आभार मानले.

दहावीपर्यंत आम्ही मराठी विषय शिकलो. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी पेडण्याबाहेर पडलो तरी मराठी विषय सोडला नाही. मराठीने आम्हाला समृद्ध केले आहे. मराठीविषयीची आत्मियता कायम आहे.
- सुधीर केरकर, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक