महान फुटबॉलपटू मॅरेडोना यांचे निधन


25th November 2020, 11:10 pm

ब्युनोस एयर्स : आपल्या फुटबॉल कौशल्याने संपूर्ण जगावर मोहिनी घालणारे अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे बुधवारी निधन झाले, ते ६० वर्षांचे होते. मॅरेडोना यांना दोन आठवड्यांपूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण बुधवारी पुन्हा एकदा मॅरेडोना यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
३० ऑक्टोबरला मॅरेडोना यांनी आपला ६०वा वाढदिवस साजरा केला. १९८६ मध्ये त्यांनी अर्जेटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या मॅरेडोना यांना उच्च जोखमीचा रुग्ण म्हणून पाहिले जात होते. मॅरेडोना यांची टीम गिमनासिया यांनी पॅटरानटोचा ३-० ने पराभव केल्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस एयर्सजवळ असलेल्या ला प्लेटा इथल्या रुग्णालयात मॅरडोना यांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात करण्यात आलेल्या स्कॅनिंगनंतर मॅरेडोना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण शस्त्रक्रियेनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचे निधन झाले.
दरम्यान, मॅरेडोना यांच्या अनेक चाचण्या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आल्या. एका स्कॅनमध्ये मेंदूत ब्लड क्लोट होण्याची बाब उघडकीस आली. यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या आठवड्यात त्यांच्या बॉडीगार्डला करोना विषाणूची लक्षणे आढळल्यानंतर मॅरेडोना स्वत: आयसोलेशनमध्ये गेले होते. मॅरेडोना यांची करोना टेस्टदेखील झाली होती. परंतु, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला.