२०० किमी राईड पूर्ण करणारी मास्कारेन्हास एकमेव महिला रायडर

५८ सायकलिस्टनी घेतला स्पर्धेत भाग


24th November 2020, 11:36 pm

पणजी : ५८ इंडयुरन्स सायकलिस्टनी ट्राय गोवाची पहिली अधिकृत २०० किमी ब्रिवेट रँडोनुअर माँडीएक्स (बीआरएम) राईड पूर्ण केली. २०२०-२१ या सिझनची ही पहिली राईड रविवारी (दि. २२) झाली. दक्षिण गोव्याच्या कामुर्ली येथील ऍडलीन मास्कारेन्हास यांनी १३ तास आणि ३० मिनिटांच्या आत ही राईड पूर्ण केली. ही राईड पूर्ण करणाऱ्या त्या एकमेव महिला रायडर ठरल्या.
याबाबत बोलताना दोन मुलांची आई असणाऱ्या चाळीस वर्षीय ऍडलीन म्हणाल्या, ही माझी २०० किमीची तिसरी राईड आहे. मला ३००, ४०० आणि ६०० किमी पूर्ण करून सुपर रँडोनुअर ही पदवी मिळवायची आहे. संपूर्ण भारतातील आज्या या राईडमध्ये सहभागी होत असताना गोव्यातील स्त्रिया मागे का पडतात? २०० किमीच्या राईड सोबतच या इव्हेंटमध्ये दहा सायकलिस्टनी ट्राय गोवा १०० किमी ब्रिवेट राईड पूर्ण केली. यात तीन स्त्रियांचा समावेश आहे. यामध्ये रिबेका जॉर्ज, मेगन फर्नाडिस आणि मिका फर्नांडिस यांचा समावेश आहे.
याबाबत बोलताना ट्राय गोवा फौंडेशनचे संस्थापक राजेश मल्होत्रा म्हणाले, चार महिला सायकलिस्टनी त्यांच्या राईड पूर्ण केल्यामुळे आम्ही आनंदी झालो आहोत. यामुळे ट्राय गोवाच्या येणाऱ्या इव्हेंटमध्ये अधिकाधिक महिला सहभागी होण्यास प्रवृत्त होतील. ट्राय गोवा हा औडक्स इंडिया रँडोनुअर (एआयआर) आणि औडक्स क्लब पर्शियनशी (एसीपी) संलग्नित क्लब आहे.
२०० किमीच्या राईडला 'ट्राय गोवा कोस्टलाईन बीआरएम' असे म्हटले जाते यामध्ये सायकलिस्ट दक्षिण गोव्याच्या किनारी भागातून राईड करत माजोर्डा, कोलवा, बाणावली, कोला, अगोंद आणि पोळे मार्गे परत मडगाव, बोरी आणि ओल्ड गोवा असा प्रवास करतात. २०० किमी पूर्ण केलेल्या सर्व यशस्वी सायकलिस्टना फ्रान्स येथील औडक्स क्लब पर्शियन कडून विशेष मेडल आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.