Goan Varta News Ad

कोळसाविरोधी रोष मंत्री, आमदारांपर्यंत

नेसाय, दवर्लीत नागरिकांची एकजूट : गुन्हे दाखल होत असल्याने आमदार धारेवर

|
23rd November 2020, 11:19 Hrs
कोळसाविरोधी रोष मंत्री, आमदारांपर्यंत

फोटो : नेसाय येथे मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांच्याशी चर्चा करताना नागरिक. (संतोष मिरजकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : राज्यातील कोळसाविरोधातील आंदोलनात आता नागरिक एकजूट दाखवून लढा उभारत आहेत. नेसाय येथील भू मोजणीच्या कामावेळी लोकांनी रेल्वे दुपदरीकरणच नको असल्याने मोजणीला विरोध दर्शवला. मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांच्याकडून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे व कॅबिनेटमध्ये ठराव घेण्याची मागणी केली. दवर्लीतील नागरिकांनी चर्चेसाठी आलेल्या आमदार लुइझिन फालेरोंना रेल्वे दुपदरीकरणाचे काम बंद करण्यास आपणासोबत येण्यास व काम बंद करण्यास भाग पाडले. या प्रकारांमुळे आता कोळसाविरोधी आंदोलकांचा रोष आमदार व मंत्र्यांकडे वळल्याचेच दिसून येत आहे. 

रेल्वे दुपदरीकरणाबाबत कॅबिनेटमध्ये

ठराव मांडणार : फिलीप नेरी रॉड्रिग्ज

नागरिकांना रेल्वे दुपदरीकरण नकोच असल्याने नेसाय रेल्वे फाटकानजीक मोजणी करण्यास उपस्थित नागरिकांनी विरोध केला. यावेळी मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी कोळसाविरोधी आंदोलनात लोकांसोबत असून नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी, भू संपादन रद्द करण्यासाठी, रेल्वे दुपदरीकरणाचे काम बंद करण्यासाठी कॅबिनेटमध्ये ठराव घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

रेल्वे दुपदरीकरणाच्या मुद्द्यावरून दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. नेसाय येथील रेल्वे दुपदरीकरणाचे काम गुरुवारी ग्रामस्थांनी रोखले. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा सुरू करण्यात आलेले काम रोखत पंचायत मंडळ व ग्रामस्थांनी सोमवारी भू मोजणी केल्यानंतर काम सुरू करण्यात यावे, तोपर्यंत रेल्वेने काम बंद ठेवावे, असे सांगितले होते. सोमवारी सकाळी नेसाय रेल्वे फाटकानजीक शेकडो नागरिकांनी जमा होत रेल्वे दुपदरीकरणालाच विरोध असल्याचे स्पष्ट केले. उपस्थित मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांना नागरिकांनी पोलिसांना मध्ये न येण्यास सांगावे, असे सांगितल्यानंतर मंत्री रॉड्रिग्ज यांनी पोलिसांशी चर्चा करत हा प्रश्न नागरिकांचा असल्याने पोलिसांनी दूरच राहावे, अशा सूचना केल्या. त्यावर रेल्वे रूळावर कुणालाही येऊ न देण्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर रेल्वे दुपदरीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची, पोलिस महासंचालकांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी मंत्री रॉड्रिग्ज यांच्याकडे केली. त्यावर रेल्वे दुपदरीकरणाला पंचायतीप्रमाणे आपलाही विरोध असल्याचे मंत्री नेरी यांनी स्पष्ट केले. रेल्वे दुपदरीकरणाबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा करून ठराव संमत करण्यात येईल, भू संपादन प्रक्रिया रद्द करण्यात येईल, पंचायतीने पंचायत क्षेत्रातील बांधकामाला आक्षेप घेतला असून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार, पोलिस महासंचालकांच्या वक्तव्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, अशी आश्वासने मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी दिली.

पोलिस अधिकार्‍यांवरील कारवाईचे आश्वासन

नागरिकांनी पोलिस उपअधीक्षकांवर कारवाईची मागणी केल्यानंतर मंत्री फिलीप रॉड्रिग्ज म्हणाले की, राज्य सरकारकडून पोलिस अधिकार्‍यांना वक्तव्य करण्यास सांगितलेले नाही. त्यामुळे पोलिस उपअधीक्षकांनी केलेले वक्तव्य गृहमंत्र्यांच्या नात्याने मुख्यमंत्र्यांनी तपासून कारवाई करावी, अशी मागणी केली जाईल. अन्यथा राज्य सरकारऐवजी पोलिस अधिकारी राज्य चालवत असल्याचा संदेश सगळीकडे जाईल, असेही मंत्री रॉड्रिग्ज यावेळी म्हणाले.

नेसाय येथे मोठा पोलिस बंदोबस्त

नेसाय येथील जमीन मोजणीवेळी काही आक्षेपार्ह प्रकार घडू नये, यासाठी पोलिस उपअधीक्षक किरण पौडवाल यांच्यासह मडगाव, फातोर्डा, मायना कुडतरी, कुडचडे येथील पोलिस निरीक्षकांसह मडगाव व फातोर्डातील पोलिसांची फौज घटनास्थळी तैनात करण्यात आलेली होती.