Goan Varta News Ad

कोळसा कर : ‘जेएसडब्ल्यू’ला वाहतूक खात्याची डिमांड नोटीस

१५ दिवसांची मुदत; कारवाईचाही इशारा

|
23rd November 2020, 11:11 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : कोळसा हाताळणीसाठीचा १५६.३५ कोटींचा गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण कर थकवल्यानंतर तो न भरण्याचा पवित्रा घेणार्‍या जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड कंपनीला वाहतूक खात्याने डिमांड नोटीस जारी केली आहे. १५ दिवसांत कर न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड कंपनीने २०१४ ते २०१८ या कालावधीत सुमारे ३.१२ कोटी मेट्रिक टन कोळशाची राज्यात हाताळणी केली आहे. त्यापोटी कंपनीने १५६.३५ कोटींचा कर द्यावा लागतो. पण रेल्वेतून कोळसा वाहतूक करताना प्रदूषण होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. त्यामुळे आम्ही गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण कर भरणार नाही, असा पवित्रा या कंपनीने घेतला होता. त्यानंतर वाहतूक खातेही आक्रमक झाले होते. कर चुकविलेल्या कंपन्यांकडून दंड वसूल करणारच, अशी भूमिका वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी मांडली होती. त्यानुसार दक्षिण गोवा सहाय्यक वाहतूक संचालकांनी चार दिवसांपूर्वी जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड कंपनीला डिमांड नोटीस जारी करत पंधरा दिवसांत थकित कर भरण्याचे निर्देश दिले आहेत. कर न भरल्यास तुरुंगवास किंवा २.५० लाखांचा दंडही होऊ शकतो, असेही नोटिशीत म्हटले आहे.

‘त्या’ तरतुदीनुसार दंड वसूल करणार!

राज्यात कोळसा हाताळणी करणार्‍या जिंदाल, अदानी तसेच इतर काही कंपन्यांनी प्रदूषण करत नसल्याने दंड भरणार नाही, असे कळवले आहे. पण गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण कर २००६ नुसार एमपीटीवर कोळसा उतरला की दंड लागू होतो. कायद्यातील याच तरतुदीनुसार सरकार वसुली करेल, असेही नोटिशीत म्हटले आहे.