Goan Varta News Ad

कुचेलीत पूर्ववैमनस्यातून खून

तीन तासांत दोघे संशयित गजाआड

|
23rd November 2020, 11:06 Hrs
कुचेलीत पूर्ववैमनस्यातून खून

राजेश शेटकर खून प्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींसह उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर व पोलिस पथक.

प्रतिनिधी । गोवन वार्ता

म्हापसा ः खडपावाडा कुचेली येथे राजेश चंद्रकांत शेटकर (४९, रा. खडपावाडा कुचेली) यांचा त्याच्या मित्रांनीच पूर्ववैमन्यस्यातून खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी कुचेली येथील सलीम अब्दुल नदाफ (२४) व रूपेश महाले (३२) या संशयितांना अटक केली आहे.

कुचेली साईबाबा मंदिर परिसरातील झुडपात राजेश जखमी अवस्थेत आढळून आले. १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा इस्पितळात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा केला. अवघ्या तीन तासांत या खुनाचा छडा लावून संशयितांना गजाआड केले. संशयित रूपेशला कुचेलीतून तर सलिमला कांदोळीतून अटक केली. राजेश आणि सलिम यांचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. रविवारी तिघेही दारू पिण्यासाठी गेले होते. शुद्ध हरवल्याचे पाहून संशयितांनी राजेशच्या डोक्यात दगड घातला. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजून आग लावली व ते निघून गेले. होरपळलेल्या राजेश यांनी जवळील झुडपांचा आधार घेतला. दुपारपर्यंत ते तेथेच जखमी अवस्थेत होते.

पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर, अधीक्षक शोबित सक्सेना यांनी घटनास्थळाची पाहणी केली. उपनिरीक्षक अनिल पोवळेकर, आशिश परब, हवालदार आल्विटो डिमेलो, सुशांत चोपडेकर, शिवाजी शेटकर, इर्शाद वाटांगी, शिपाई फ्रेन्की वाझ, राजेश कांदोळकर, अक्षय पाटील, देमगो माटणेकर, सर्वेश मांद्रेकर, अभिषेक कासार व प्रकाश पोळेकर यांनी संशयितांना ताब्यात घेतले.

...तर जीव वाचला असता        

राजेश विव्हळत असल्याचे पाहून स्थानिकांनी दुपारी १२.४५ वा. १०८ रुग्णवाहिकेला बोलावले होते. रुग्णवाहिका २ तासांनी दाखल झाली. रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर कदाचित जीव वाचला असता, असे बोलले जात होते.

कारागृहातून आल्यानंतर दुसर्‍याच दिवशी खून

राजेश शेटकर याला गेल्या ऑक्टोबरमध्ये दुचाकी चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. म्हापसा येथील हॉटेल सत्यहिराच्या समोर पार्क केलेली दुचाकी चोरून नेताना पोलिसांनी त्याला गांधी चौक येथे पकडले होते. महिनाभर तो कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडीत होता. पत्नीच्या प्रयत्नामुळे शनिवारी, २१ रोजी त्याची कोठडीतून जामिनावर मुक्तता झाली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी संशयितांनी दारू पार्टीच्या नावे बोलावून त्याचा काटा काढला.