Goan Varta News Ad

राज्यातील एटीएस सशक्त बनवण्याचे प्रयत्न

४३ कॉन्स्टेबलांची बदली; अत्याधुनिक शस्त्र खरेदीची प्रक्रिया सुरू

|
23rd November 2020, 12:02 Hrs
राज्यातील एटीएस सशक्त बनवण्याचे प्रयत्न

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : गोवा पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) अधिक सशक्त आणि बळकट करण्यासाठी पोलिस खात्याने गोवा पोलिस आणि भारतीय रिझर्व बटालियन (आयआरबी) विभागातील ४३ पोलिस कॉन्स्टेबलची एटीएसमध्ये बदली केली आहे. या कॉन्स्टेबल्सना हरयाणा येथील राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) प्रशिक्षण केंद्रात कमांडो प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. एटीएसमध्ये अत्याधुनिक शस्त्र खरेदी करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

गोवा पोलिसांच्या एटीएस पथकात सद्यःस्थितीत सुमारे १०० हून अधिक जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांतील ४० जवान प्रशासकीय व गुप्तचर विभागात कार्यरत आहेत. सुमारे ६० जणांना हरयाणा येथील राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) केंद्रात कमांडो प्रशिक्षण देऊन पथकात नियुक्ती केली आहे. ही संख्या वाढवून आता ९० ते १०० करून गोव्यात कमांडोंची एक कंपनी तयार करण्यासाठी वरील ४३ पोलिस कॉन्स्टेबल्सची एटीएसमध्ये बदली केली आहे. यात २२ गोवा पोलिस, तर २१ भारतीय रिझर्व बटालियनच्या कॉन्स्टेबलांचा समावेश आहे. सर्व कॉन्स्टेबल २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून त्यांना कमांडोचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी त्यांना प्रथम वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्रात एक ते दीड महिन्याचे तंदुरुस्ती प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना हरयाणा येथील राष्ट्रीय सुरक्षा गार्ड प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात येणार आहे. तिथे त्यांना तीन महिन्यांचे कमांडोचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना अत्याधुनिक तसेच विविध प्रकारची शस्त्रे चालविण्याचे, तसेच कुठल्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला झाल्यास कारवाई करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राज्यात कमांडोची ९० ते १०० जवानांची एक कंपनी तयार होणार आहे. ही कमांडो कंपनी राज्यातील समाजविरोधी तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर लक्ष ठेवणे, संवेदनशील ठिकाणी गस्त घालणे, तसेच दहशतवादी हल्ला झाल्यास कारवाई करण्यासाठी सतर्क रहाणार आहे.

राज्यात दहशतवादी हल्ला किंवा तत्सम इतर प्रकारची मोठी घटना घडल्यास केंद्रीय पथक दाखल होईपर्यंत ही कंपनी कारवाई करण्यास तत्पर राहणार आहे. त्यामुळे घटनेवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

पोलिस अधीक्षकांकडून नियक्तीचा आदेश जारी

पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक अरविंद गावस यांनी पोलिस महासंचालकांच्या परवानगीने ४३ पोलिस कॉन्स्टेबलांची एटीएसमध्ये नियुक्ती केल्याचा आदेश जारी केला आहे. दहशतवादविरोधी पथकात ४० कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यासाठी खात्याने पोलिस कॉन्स्टेबल्सकडून इच्छा अर्ज मागितले होते. त्यासाठी सुमारे ६० जणांनी इच्छा व्यक्त करून खात्याला माहिती दिली होती. त्यानुसार खात्याने संबधित कर्मचार्‍यांची शारिरीक चाचणी घेऊन ४३ कर्मचार्‍यांची एटीएसमध्ये बदली केली आहे.