गावांतील पीडितांसाठी तिने वेचले आयुष्य

कर्मनिष्ठांची मांदियाळी

Story: संजय ढवळीकर |
22nd November 2020, 05:38 pm
गावांतील पीडितांसाठी तिने वेचले आयुष्य

तळागाळातील पीडित लोकांबद्दल मारियानाला खूप कळवळा वाटायचा. जगायला आवश्यक असलेल्या सुविधांविना राहणाऱ्या लोकांसाठी तर तिचा जीव तीळ तीळ तुटायचा. त्याचबरोबर निसर्गाने भरभरून दिलेले वरदान टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, यात आपण कमी पडता कामा नये असा तिचा ठाम आग्रह असायचा. पर्यावरणाची काळजी न करता निसर्गावर घाला घालू पाहणाऱ्यांच्या विरोधात साडीचा पदर कंबरेला खोचून रणरागिणी बनायला तिला वेळ लागत नसे.

‘‘उद्याच सकाळी ग्रामपंचायतीवर मोर्चा घेऊन जाऊया. साडेनऊ वाजता या सगळे. घरातल्या सगळ्यांना घेऊन या. बघूयाच सरपंच एवढ्या मोठ्या प्रकल्पाला कशी परवानगी देतो ते. दोनशे फ्लॅटचा हा प्रकल्प आपल्या गावात आला तर गावाची ओळख कशी कायम राहणार? आणि या प्रकल्पासाठी किती झाडं तोडावी लागतील हे त्यांना ठाऊक तरी आहे काय? सांडपाणी व्यवस्थेचं बिल्डर काय करणार माहीत आहे काय..?’’ मारियानाचा तारस्वरातील आवाज लागला होता. एकदा मारियानाने पुढाकार घेतला म्हणजे आता गावावरील संकट टळेलच अशी गावकऱ्यांना खात्री होती.

मागे एकदा मारियानाच्या गावात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव सरकारने बनवला होता. प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाल्याचे समजताच मारियाना खवळून उठली. ग्रामसभेची मागणी करणारे दोनेकशे ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन सरपंचांना आणि पंचायत संचालकांना दिले. ग्रामसभा झाली. स्थानिक आमदाराचे या प्रकल्पाला समर्थन होते, त्याने आपले शंभरेक समर्थक ग्रामसभेला आणून बसवले. त्यांनी प्रकल्पाचे समर्थन सुरू करताच मारियाना उठली आणि एकेका मुद्द्यांवरून प्रकल्प समर्थकांना असे हैराण करून सोडले की त्यांना अखेर सभेतून काढता पाय घ्यावा लागला. अन्यथा भडकलेल्या ग्रामस्थांसमोर त्यांचा निभाव लागला नसता. अखेर गावकऱ्यांचा खंबीर विरोध बघून तो प्रकल्प सरकारला इतर ठिकाणी हलवावा लागला.

कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार तर आधी प्रकल्पाची पूर्ण माहिती द्या, आणि पर्यावरणाला बाधा निर्माण होणार नाही याची लेखी हमी द्या. दुसरे म्हणजे शहरातील कचरा आमच्या गावात प्रक्रियेसाठी का आणता, तिथल्यातिथे प्रकल्प उभारून विल्हेवाट लावा अशा बिनतोड मागण्या मारियानाने केल्या होत्या. प्रकल्पाच्या प्रायोजकांशी आधीच साटेलोटे साधलेल्या आमदाराचा मारियानाच्या मागणीसमोर आणि स्थानिकांच्या आग्रहासमोर निभाव लागला नाही. प्रकल्पासाठी जमीन संपादनही होऊ शकले नाही.

​विधानसभा निवडणुका जवळ आल्या तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला झटका देण्याचे नियोजन विरोधी पक्ष करू लागला. मारियानासारखा बळकट उमेदवार दुसरा कोणी नव्हता. तिला विरोधी पक्षाच्या उमेदवारीची ऑफर आली. पक्षाचे नेते मारियानाच्या घरीच आले होते. मारियानाने त्यांचे स्वागत केले, चहापान झाले आणि त्याच दमात तिने उमेदवारीचा प्रस्ताव फेटाळूनही लावला. आपली भूमिका तिने स्पष्ट केली. ‘‘मी माझ्या गावकऱ्यांची प्रतिनिधी आहेच. त्यांनी मला कधीच नेतृत्त्व बहाल केलंय. पण तुमच्याच कशाला, कोणत्याही राजकीय पक्षाच्या चौकटीत मला माझं काम बंदिस्त करायचं नाही. मला निवडणुकीतच रस नाहीये...’’

नेतेमंडळी आल्यापावली परत गेली. मारियानाचे असेच असायचे. गरजवंतांना लागेल ती मदत करणार, पण त्यांनी काही देऊ केलं तर बिलकूल घेणार नाही. योग्य बाजूला असलेल्या श्रीमंतालाही मदत करेल, पण त्याच्या घरी चहा प्यायलाही जाणार नाही. लोकांना जमवायला कसलेही कष्ट घेईल, पण नेता म्हणून पुढे येणार नाही. आंदोलने उभारण्यासाठी कितीही पुढाकार घेईल, पण निवडणुकीला कधी उभी राहणार नाही. गावकऱ्यांची निरलस सेवा करण्यासाठी आपला जन्म झाला आहे असा तिचा ठाम समज.

भाटकार कुटुंबात जन्माला आलेल्या मारियानाची मालमत्ता गडगंज होती, तिची दानतही तशीच होती. ती तरुण असताना आई-वडील गेले. दोन्ही बहिणी लग्न करून परदेशात गेल्या. मारियानाने लग्न केलं नाही. घरात एकटीच राहते. दोन कुत्रे आणि कित्येक मांजरं हे तिच्या कुटुंबाचे सदस्य.

जवळचे नातेवाईक, परदेशातील बहिणी यांच्याबद्दल मारियानाला आपुलकी अशी नव्हतीच. उलट गावातील गरीबांवर ती अधिक जीव लावायची. कित्येक मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलायची. मारियानाचे वय झाले तसे तिला पुढील व्यवस्था करण्याबाबत अनेकांकडून सल्ले येऊ लागले. पण ऐकेल तर ती मारियाना कसली? मला कुठे काय होतंय, मी आहे धडधाकट असे म्हणून ती नवीन आंदोलनाच्या तयारीतच असते. 

(लेखक ‘गोवन वार्ता’चे संपादक आहेत.)