Goan Varta News Ad

दहावी, बारावी सुरू; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

कुडचडेत सरकारी नियमावलीस हरताळ; पालकांत भीती

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd November 2020, 12:26 Hrs
दहावी, बारावी सुरू; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

पणजी/कुडचडे : शाळा सुरू करण्याबाबत देशभरातील पालकांत प्रतिकूल मत असतानाही राज्य सरकारच्या निर्देशांनुसार राज्यातील दहावी आणि बारावीचे नियमित वर्ग शनिवारपासून सुरू झाले. पण विद्यार्थ्यांकडून अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला. कुडचडेसह इतर काही भागांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थी आणि शिक्षण संस्थांनी सरकारच्या शाळांबाबतच्या नियमावलीस पहिल्याच दिवशी हरताळ फासल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
राज्यात करोनाचा प्रसार सुरू असतानाही दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, मुख्य परीक्षेसाठी आवश्यक प्रात्यक्षिक परीक्षा त्यांना देता यावी, यासाठी सरकारने शनिवारपासून राज्यातील दहावी आणि बारावीचे नियमित वर्ग घेण्याचे ३ नोव्हेंबर रोजी जाहीर केले होते. त्यानंतर वर्गांबाबत स्वतंत्र नियमावलीही शिक्षण संस्थांना जारी केली होती. त्यानुसार शिक्षण संस्थांनी शनिवारी दहावी, बारावीचे वर्ग सुरू केले. पण बहुतेक ठिकाणी नियमित वर्गांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी होती. एका वर्गात बारापेक्षा अधिक विद्यार्थी न बसविण्याचे निर्देश शिक्षण खात्याने दिले होते. पण बहुतांशी शाळांच्या वर्गात तीन ते चार विद्यार्थीच असल्याचे दिसून आले. कुडचडे तसेच इतर काही शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षण संस्थांनी सरकारने दिलेल्या मास्क, सॅनिटायजर, शारीरिक अंतर आदींसारख्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. शाळा सुटल्यानंतर अनेक विद्यार्थी घोळक्याने बाजारात फिरताना दिसून आले. त्यामुळे दहावी, बारावीचे नियमित वर्ग सुरू करण्याचा सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरण्याची भीती पालकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, काही शाळांनी सरकारच्या निर्देशांनुसार नियमावलीचे पालन करीत दहावी, बारावीचे वर्ग सुरू केले. मास्क, सॅनिटायजर, शारीरिक अंतर या गोष्टींचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही प्रामाणिकपणे पालन केले. आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने शनिवारी जास्त विद्यार्थी शाळांमध्ये आले नाहीत. पण सोमवारपासून विद्यार्थ्यांची संख्या निश्चित वाढेल, असा विश्वास शिक्षकांकडून व्यक्त होत होता.

लेखी हमीस पालकांचा नकार
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठवत असताना पालकांकडून लेखी हमी घेण्याचे निर्देश सरकारने शिक्षण संस्थांना दिले आहेत. पण बहुतांशी पालकांनी मात्र लेखी हमी देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. यातून पालकांचा नियमित वर्ग सुरू करण्यास नकारच आहेत. पण सरकारच्या निर्देशांमुळे ते मुलांना शाळांत पाठवण्यास तयार झाल्याचे दिसून येत आहे.

...तर जबाबदार कोण?
राजधानी दिल्लीसह काही राज्यांमध्ये पुन्हा करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पुढील धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र, गुजरातसह इतर काही राज्यांनीही शाळांचे नियमित वर्ग सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. पण गोवा सरकारने मात्र दहावी, बारावीचे नियमित वर्ग सुरू केले आहेत. विद्यार्थी नियमावलीचे पालन करू शकत नाहीत, हे माहीत असतानाही मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण यातून विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल काही ठिकाणच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.