हसतखेळत रुग्णाला बरा करणारे डॉक्टर

कर्मनिष्ठांची मांदियाळी

Story: संजय ढवळीकर |
14th November 2020, 11:49 am
हसतखेळत रुग्णाला बरा करणारे डॉक्टर


‘‘मी काय सांगतोय ते ऐक. काहीही झालेलं नाही तुला. इथून उठ आणि सरळ घरी जा. रजा घेतलेली नसेल तर थेट ऑफिसमध्ये जा. काम सुरू कर. तुला कसलाच आजार झालेला नाही. तुझ्या शरीरातील सारे अवयव व्यवस्थित शिस्तीत काम करताहेत...’’

डॉ. करमली यांच्याकडून हे आत्मविश्वासपूर्ण शब्द ऐकून रुग्ण त्यांच्या दवाखान्यातून बाहेर पडतानाच बरा झालेला असतो. अस्वस्थ वाटतंय, पोटात दुखतंय अशा तक्रारी घेऊन डॉ. करमलींकडे गेल्यानंतर डॉक्टर आधी त्या रुग्णाशी दोन मिनिटे संवाद साधतात. कुठं काय होतंय, कधीपासून, गेल्या दोन दिवसांत काय खाल्लं, नियमित जीवनशैलीत काही बदल झालाय का, असे प्रश्न या संवादात असतात. त्यानंतर आपल्या खुर्चीतून उठून रुग्णाला सांगतात, ‘‘चल, आडवा हाे तिथं. बघूया काय झालंय ते.’’

सुमारे पाच मिनिटे शांतपणे रुग्णाला तपासतील. डोळे, घसा, नाक बारकाईने बघितल्यानंतर रक्तदाब तपासण्यासाठी उजव्या दंडाभोवती रक्तदाबाच्या उपकरणाचे रबरी कापड गुंडाळतील आणि उपकरण सुरू करण्याआधी पोटावर हलकेच दाब देऊन तपासून घेतील. हे उपचार पार पाडत असताना जुन्या हिंदी सिनेमातील राज कपूर किंवा दिलीपकुमारचं एखादं गाणं ओठातल्या ओठांत गुणगुणत राहतील. रुग्णाला वाटावे की या डॉक्टरांचे आपल्याकडे लक्ष तरी आहे काय, सिनेमातील गाणी गुणगुणताहेत. पण, त्यांच्या शांत आणि संयत अवताराकडे बघून रुग्ण शांत पडून राहतो.

डॉ. करमलींचे हेच तर वैशिष्ट्य. रुग्णाला काय झालंय, त्याचा आजार किती गंभीर आहे याचा अंदाज घेऊन ते आपला अवतार धारण करतात. ​हिंदी गाणे गुणगुणायला लागले की समजायचे की रुग्णाची प्रकृती ठीकठाक आहे, काळजीचे कारण नाही. नियमित येणाऱ्या रुग्णांना हे लगेच समजते आणि रुग्ण तिथल्या तिथे समाधानी होतो. मात्र कधी कधी खरोखरच काळजी करण्यासारखी परिस्थिती असते. त्यावेळी डॉ. करमलींचा अवतार बदलतो. ओठांतील गाणे बंद हाेते, तपासण्याची प्रक्रिया अधिक संथ होते, चेहरा गंभीर बनतो. ते बारकाईने तपासणी करतात. तपासून झाल्यानंतर रुग्णाला उठून बसायला मदत करतात आणि आपल्या खुर्चीत येऊन बसत त्यालाही समोर बसायची खूण करतात, एकही शब्द न बोलता.

‘‘हे बघ, लक्षपूर्वक ऐक. तुला रक्त तपासणी करून घ्यावी लागेल, छातीचा एक्स रे काढावा लागेल. मी प्रिस्क्रीप्शन लिहून देतो. मिडवे हॉस्पिटलमध्ये जा, डॉ. डिसिल्वांना भेट. तू तिथं पोहोचेपर्यंत मी त्यांना फोन करून ठेवीन. पण तू घरी किंवा इतर कोठेही जाण्यात आता वेळ वाया घालवू नकोस. आधी थेट डॉ. डिसिल्वांना भेट. तपासण्या करून पुढे काय करायचं हे डॉक्टर सांगतील.’’ हे एेकल्यानंतर रुग्ण मागेपुढे विचार न करता आधी तपासण्या करून घेण्यासाठी जातोच. डॉ. करमली सांगतात तेच अंतिम सत्य हे नियमित येणाऱ्या रुग्णाला ठाऊक असते. त्यामुळे त्यांच्या तपासणीबाबत तसेच निष्कर्षांबाबत शंका नसतेच.

आरोग्याचा काही तरी गंभीर स्वरूपाचा प्रश्न असेल तर डॉ. करमली तेवढेच गंभीर बनून रुग्णाला उपचारांबाबत पटवून देतात. बहुतेक वेळा रुग्णाच्या आरोग्याच्या किरकोळ तक्रारी असतात, त्यावर हसतखेळत उपचार सांगतात, गोळ्या- औषधे लिहून देतात आणि चार-पाच दिवसांनी कसे वाटते ते सांग म्हणून रुग्णाला पिटाळतात. असा रुग्ण दवाखान्यातून बाहेर येतानाच अर्धा बरा झालेला असतो.

काही वेळा मात्र वेगळ्याच प्रकारच्या रुग्णांचा डॉक्टरांना सामना करावा लागतो. आपल्याला खूप काही तरी झालंय असा ग्रह करून घेऊन हे रुग्ण डॉ. करमलींकडे येतात. तपासून झाल्यानंतर वास्तव परिस्थिती डॉक्टरांना कळते. रुग्णाला काहीच झालेले नाही, पण काही तरी औषध दिल्याशिवाय त्याला बरे वाटणार नाही हेही त्यांच्या लक्षात येते. अशा वेळी हानिकारक नसलेल्या कसल्यातरी व्हिटामिनच्या गोळ्या ते लिहून देत रुग्णाची बोळवण करतात. चार दिवसांनी रुग्ण आवर्जून फोन करून आपल्याला बरे वाटल्याचे डॉक्टरांना सांगतो!

गंभीर अवतार धारण न करता, उलट हसत खेळत रुग्णांना बरे करता येते हाच संदेश डॉ. करमली आपल्या वर्तनातून देत असतात. त्यांच्याकडे आलेला रुग्ण फिरून दुसऱ्या डॉक्टरकडे जाण्याचा कधी विचारही करत नाही. डॉक्टरांचे आता वय झाले आहे, त्यांना निवृत्त व्हायचे आहे. पण रुग्णांनी उसंत दिली तरच ना!

(लेखक ‘गोवन वार्ता’ चे संपादक आहेत.)