Goan Varta News Ad

परदेशातून होतो विरोध : मुख्यमंत्र्यांची टीका

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
31st October 2020, 12:15 Hrs
परदेशातून होतो विरोध :  मुख्यमंत्र्यांची टीका

मडगाव : कोळसा वाहतूक व रेल्वे दुपदरीकरणावरून दक्षिण गोव्यातील विविध संघटना, राजकीय नेते यांचा विरोध वाढत आहे. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी टीका केली आहे. लंडनमध्ये बसून मोलेतील प्रकल्पाला विरोध होत आहे. कोळशासाठी रेल्वे दुपदरीकरण केले जात नाही, तरीही निवडणुका जवळ आल्याने विरोधक वेगवेगळे विषय उकरून काढून टीका करत आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा कोळशाविरोधातील दक्षिण गोव्यातील आंदोलनाची धार तीव्र होण्याची शक्यता आहे.
दक्षिण गोव्यात विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांच्याकडून कोळसा वाहतूक व रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाला विरोध होत आहे. याच धर्तीवर गोंयचो एकवोट, गोयात कोळसो नाका या संघटनांतर्फे विविध ठिकाणी प्रकल्पांबाबतची माहिती देऊन, निषेधफेरी काढून लोकांना जागृत करण्याचे काम केले जात आहे. याआधी देशाबाहेरील गोमंतकीयांना भाजपचे प्रवक्ते दामोदर नाईक यांनी ‘बेबे’ म्हटले होते. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनीही कुंकळ्ळी येथील एका कार्यक्रमावेळी विदेशातील गोमंतकीयांवर टीका केली आहे. लंडनमध्ये बसून काहीजण मोलेतील प्रकल्पाला विरोध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, बऱ्याच जणांना या सरकारला विरोध करण्याची सवय झालेली आहे. त्यांच्याकडे कोणताही अजेंडा किंवा विषय नाही. राष्ट्रीय महामार्ग हा पुढील २० वर्षांनंतर कधीतरी होणार आहे. मात्र, त्याचे नियोजन आतापासून नाही करणे गरजेचे आहे. कुठे मोले आणि कुठे लंडन. त्या लंडनमध्ये बसून काहीजण विरोध करतात. गोमंतकीयांनी जागे होण्याची गरज आहे.


मुख्यमंत्री म्हणतात...

- राज्यातील पॉवर ट्रान्समिशन प्रकल्प आता न केल्यास दहा वर्षांनंतर घरातील एसीही चालणार नाहीत व उद्योगधंदेही चालणार नाहीत. कोळशासाठी राज्य सरकार रेल्वेचे दुपदरीकरण करत नाही. आंदोलन करणाऱ्यांचे म्हणणे हे सरकार ऐकून घेते, त्यामुळे आंदोलकांनी राज्य सरकारकडे समस्या मांडाव्यात.
-शेळ मेळावलीत जाऊन लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. आयआयटी झाल्यानंतर हजार ते दोन हजार जणांना नोकऱ्या मिळणार असल्याने अशा प्रकल्पाला विरोध कशासाठी केला जातो. विरोध करणाऱ्यांनी सरकारशी चर्चा करावी उगाचच चुकीच्या माहितीवर विरोध करू नये.
- बेतुल येथे पोर्ट होत असल्याचे काहीजण सांगत आहे. खरे तर बेतूला येथील पोर्टचा प्रकल्प रद्द करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्यासोबत काहीजण भेटण्यास आले होते. त्यांना पुन्हा एकदा बैठकीसाठी बोलावले आहे.