कामचुकार कर्मचार्‍यांना घरचा रस्ता : मुख्यमंत्री

‘स्वयंपूर्ण मित्र’ अधिकार्‍यांना शनिवारपासून प्रशिक्षण


28th October 2020, 10:39 pm
कामचुकार कर्मचार्‍यांना घरचा रस्ता : मुख्यमंत्री

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : काही वर्षांपासून अधिकारी, कर्मचार्‍यांकडून कामचुकारपणा सुरू आहे. कामचुकारपणा करणारे, कामावर उपस्थित न राहणारे खातेप्रमुख व कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास त्यांना निलंबितही केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पुन्हा ठणकावले.

दक्षता जागृती सप्ताहानिमित्त मंगळवारी खातेप्रमुखांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी झाडाझडती घेतली होती. कार्यालयांतील त्रुटींवर बोट ठेवत त्यांनी खातेप्रमुख आणि सचिवांनाच दोषी ठरवले होते. शिवाय ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ योजनेअंतर्गत खातेप्रमुख आणि कर्मचार्‍याला गावागावांत फिरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. अधिकारी, कर्मचार्‍यांबाबत तुम्ही बोललात त्याची अंमलबजावणी होणार का, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, आपण बोलतो ते सत्यात उतरवून दाखवतो. कामांत हयगय करणार्‍यांकडे दुर्लक्ष होणार नाही. वेळ आल्यास कामावरून कमी करण्यासही मागे-पुढे पाहणार नाही. त्यामुळे कर्मचार्‍याने कामाशी प्रामाणिक राहावे.

‘स्वयंपूर्ण मित्र’ अधिकार्‍यांना शनिवारपासून प्रशिक्षण दिले जाईल. स्वयंपूर्ण मित्रांसह खातेप्रमुख, कर्मचारी यांच्यासह आमदारही शनिवारपासून गावागावांत पोहोचतील. समस्या सोडविण्याचे प्रयत्न करतील. आगामी काळात खातेप्रमुख, कर्मचार्‍यांनाही प्रशिक्षण दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा