आकर्षक पद्मसर्वांगासन आणि गर्भासन

वाॅर्मअप

Story: सौ. नीता ढमढेरे ९४२३५२७५०१ |
25th October 2020, 12:50 pm
आकर्षक पद्मसर्वांगासन आणि गर्भासन

मागील भागात आपण पद्मासनामधून पुढे करता येण्यासारखी काही आसने बघितली. उथ्थित पद्मासन, पर्वतासन, पद्ममयुरासन, मत्स्यासन, बद्धपद्मासन ही सर्व आसने येण्यासाठी पद्मासनातील बैठक उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. पद्मासनामध्ये जर पाच, दहा मिनिटे बसता येत असेल तर ही प्रगत आसने करणे सुलभ होते. या प्रगत आसनांचा स्पर्धात्मक योगासनांमध्ये समावेश होऊ शकतो. ही आसने करताना किंवा केल्यानंतर लक्षात येते की या आसनाची काठिण्यपातळी अधिक आहे. ज्यांची लवचिकता उत्तम आहे तसेच ज्यांचे आरोग्य उत्तम आहे त्यांनी या आसनांचा सराव प्रथम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा. जेणेकरून कोणतीही शारीरिक दुखापत होणार नाही. या भागात आपण गर्भासन, बद्ध /पद्म सर्वांगासन या आसनांची माहिती घेऊया.

बद्ध /पद्म सर्वांगासन - हे आसन सर्वांगासन आणि पद्मासन यांचा सुंदर मिलाफ आहे. हे आसन करण्यासाठी सर्वांगासन उत्तम जमणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच सर्वांगासनामध्ये पायांच्या लालित्यपूर्ण हालचाली करून पद्मासन, कोणत्याही आधाराशिवाय घालता येणे आवश्यक आहे.

 आसनस्थिती घेणे- १) प्रथम जमिनीवर उताणे झोपा. पाठ जमिनीवर पूर्णपणे टेकलेली असू द्या. दोन्ही हात शरीरालगत ठेवा. दोन्ही पाय एकमेकाला चिकटलेले असू द्या. २) श्वास सोडा आणि श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता ४५ अंशांपर्यंत वर उचला. तसेच पाय आणखी वर उचलून ९० अंशांपर्यंत आणा. ३) श्वास सोडत पाय थोडे डोक्याकडे आणून कंबर वर उचला आणि पाठीला हातांचा आधार द्या. डोके उचलू नका. ४) आता पाठ हळूहळू सरळ करा आणि खांदे व पाठीचा वरच्या भागावर संपूर्ण शरीर हाताच्या मदतीने तोलून धरा. खांद्यापासून टाचेपर्यंत संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करा. पायाच्या बोटांची दिशा आकाशाकडे ठेवा. हनुवटी गळ्याच्या खोबणीत दाबून ठेवा. श्वास संथपणे चालू ठेवा. यात डोक्याची मागची बाजू खांदे आणि पाठीचा वरचा भाग एवढेच जमिनीला टेकलेले असेल. बाकी संपूर्ण शरीर जमिनीला ९० अंशाचा कोन करून उभे राहिलेले असेल. ५) आता उजवा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायाचे पाऊल डाव्या मांडीवर ठेवावे आणि डावा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या पायाचे पाऊल उजव्या मांडीवर ठेवावे म्हणजे सर्वांगासन मध्ये पद्मासन स्थिती होईल.

घ्यावयाची दक्षता - सर्वांसनामध्ये पद्मासन घालताना हात विशेषतः मनगटावर भार येण्याची शक्यता असते त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष द्यावे.

 आसनस्थिती सोडणे - सावकाश डावा पाय उजव्या मांडीवरून काढून सरळ उभा करावा. नंतर उजवा पाय डाव्या मांडीवरून काढून सरळ करा आणि सर्वांगासनाच्या स्थितीत यावे. आता सावकाश दोन्ही पाय थोडेसे डोक्याकडे आणावेत आणि पाठ कंबर, सावकाश जमिनीवर टेकवावेत. हात सावकाश खाली आणत जमिनीवर ठेवावेत आणि उत्तानपादासन स्थितीत म्हणजे दोन्ही पाय जमिनीला नव्वद अंशाचा कोन करून ठेवावेत. श्वास घ्या आणि तो सोडत दोन्ही पाय सावकाश जमिनीवर आणा आणि विश्राम करा. यालाच बद्ध सर्वांगासन असेही म्हटले जाते. 

हेच आसन प्रथम पद्मासन करून नंतर सर्वांगासन करत करता येते, पण सर्वांगासनातून पद्मासन केले तर ते जास्त ग्रेसफुल/ आकर्षक दिसते.

गर्भासन- हे बैठक स्थितीतील आसन आहे. पूर्वाभ्यास म्हणून पद्मासनामध्ये व्यवस्थित बसता येणे आवश्यक आहे. हे आसन करण्यासाठी प्रथम पद्मासनात बसावे. नंतर दोन्ही हात दोन्ही पायांच्या मधून म्हणजे मांडी व पोटरी यांच्या मधून प्रथम जमिनीवर ठेवावेत. नंतर पद्मासनासह दोन्ही पाय वर घेऊन दोन्ही हातांवर राहतील असे ठेवावेत आणि दोन्ही हात कोपऱ्यातून वाकवून घ्यावेत. आता दोन्ही हातांचे पंजे दोन्ही गालांवर अलगद टेकवून ठेवा.

 आसनस्थिती सोडणे- प्रथम हात गालावरून काढून कोपऱ्यातून सरळ करावेत आणि दोन्ही मांड्या व पोटऱ्यांमधून काढून पाय पद्मासनसह जमिनीवर ठेवावे. नंतर सावकाश पद्मासन सोडावे.

फायदे - गर्भासन या आसनाच्या नावावरूनच लक्षात येते की हे गर्भाशयासाठी उपयुक्त असे आसन आहे. या आसनामुळे गर्भाशय तसेच ओव्हरीजवर उपयुक्त असा दाब पडतो यामुळे गर्भाशयाचे कार्य सुधारण्यास किंवा सुरळीत राहण्यास मदत होते. मासिक पाळीच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते. या आसनामध्ये पोटावर दाब पडत असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. तसेच रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा या आसनाचा उपयोग होतो.

 घ्यावयाची दक्षता - १) ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे, त्यांनी पद्मासन तसेच गर्भासन करू नये. 

२) गर्भवती महिलांनी या आसनाचा सराव करू नये.

 ३) स्लीप डिस्क किंवा पाठदुखीचा त्रास असेल त्यांनी गर्भासनाचा सराव करू नये. ४) गर्भासनाचा सराव करण्यापूर्वी पद्मासनाचा सराव अधिक प्रमाणात असणे आवश्यक आहे.

 ही दोन्ही आसने करावयास थोडी कठीण आहेत, त्यामुळे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास दुखापतीचा धोका राहणार नाही.

(लेखिका फिटनेस क्षेत्रात कार्यरत आहेत.)