Goan Varta News Ad

काँग्रेस बळकटीचा निर्धार

बूथ समित्यांवर भर; ३१ ऑक्टोबरपासून विविध कार्यक्रम

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th October 2020, 10:48 Hrs
काँग्रेस बळकटीचा निर्धार

पणजी : प्रदेश काँग्रेसच्या विविध समित्यांना बळकटी देऊन आणि गोमंतकीय जनतेच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून आगामी विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविण्याचा निर्धार प्रदेश काँग्रेसने केला आहे. त्याबाबत पक्षाचे आमदार, खासदार, ज्येष्ठ नेते तसेच बूथ समित्यांचे अध्यक्ष यांच्याशी गेले दोन दिवस आपण चर्चा केली आहे, असे नवे पक्ष प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी शनिवारी स्पष्ट केले.       

पणजीतील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राव बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

राज्यातील विद्यमान भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. करोना काळात प्रशासन चालविण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत असमर्थ ठरले. त्याचा फटका राज्यातील जनतेला बसला. विविध समस्यांखाली दडपलेल्या जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेसच्या बूथ तसेच इतर समित्यांना बळकटी देणे आवश्यक आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत यावर अधिक भर देण्यात येणार आहे. समित्यांत काही बदलही करण्यात येणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये बूथ अध्यक्षांना विविध गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रत्येक महिन्याला त्यांची बैठक घेऊन त्यांच्या कामांचा आढावा घेतला जाईल, असे दिनेश राव यांनी सांगितले.       

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीदिनी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी म्हापसा आणि मडगाव या दोन ठिकाणी किसान अधिकार दिन साजरा केला जाईल. शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देणे तसेच केंद्र सरकारच्या जाचक कायद्यांबाबत त्यांच्यात जागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असेल, असे ते म्हणाले. देशभरातील महिला आणि दलित अत्याचारांविरोधात ५ नोव्हेंबर रोजी पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन छेडले जाईल. ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने संसदेत संमत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात डिचोली ते मांद्रेपर्यंत रॅली काढली जाईल. तसेच १४ नोव्हेंबर रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, असेही राव यांनी नमूद केले.

बैठकीला सर्व आमदार उपस्थित

दरम्यान, दिनेश राव यांनी शनिवारी काँग्रेस भवनात घेतलेल्या बैठकीला काँग्रेसचे पाचही आमदार उपस्थित होते. बऱ्याच महिन्यांनंतर काँग्रेस भवनात असे चित्र दिसून आले. गेल्या वर्षभरापासून पक्षापासून दुरावलेले आमदार आलेक्ह रेजिनाल्ड बैठकीला उपस्थित राहिल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये समाधान पसरले होते.