Goan Varta News Ad

आधी भाजपलाच गुन्हेगारांपासून मुक्त करा !

मारहाण प्रकरणात रमेश तवडकर दोषी ठरल्यानंतर आपचा टोला

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th October 2020, 10:47 Hrs

पणजी : चावडी (ता. काणकोण) येथे २०१७ साली झालेल्या एका मारहाण प्रकरणी भाजपचे नेते तथा माजी मंत्री रमेश तवडकर यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नेहमी करत असता. परंतु, तवडकर यांच्यासारख्या नेत्यांना पक्षाच्या विविध पदांवरून हटवू मुख्यमंत्र्यांनी प्रथम भाजपला गुन्हेगारमुक्त करावे, असा टोला आम आदमी पक्षाचे नेते संदेश तेलेकर यांनी हाणला आहे. 

तवडकर हे सध्या गोवा भाजपचे राज्य उपप्रमुख, गोवा राज्य अनुसूचित जाती व जमाती कल्याण मंडळाचे अध्यक्ष, भाजपचे माजी मंत्री आणि वरिष्ठ नेते आहेत. मारहाण प्रकरणात दोषी ठरल्याने त्यांनी या पदांचा राजीनामा देणे योग्य ठरते, असेही तेलेकर यांनी म्हटले आहे. भाजप सरकारच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठ सदस्य हे गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतले असल्याचे पाहायला मिळते, असेही त्यांनी म्हटले आहे.

वादग्रस्त 

नेत्यांचा दाखला

यापूर्वीही भाजपचे पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांचे नाव बलात्कार प्रकरणाशी जोडले गेले होते. त्या प्रकरणात पीडित मुलगी काही आठवड्यांपूर्वी ती राहत असलेल्या ठिकाणाहून अचानक गायब झाली. 

लहान मुलांची अश्लील चित्रफीत समाजमाध्यमांद्वारे पसरवल्याच्या कथित प्रकारामुळे सध्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर वादात अडकले होते.

एका पंचायतीने बेकायदा बांधकाम केलेल्या इमारतीसाठी बनावट सही केल्याच्या प्रकरणामुळे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो नुकतेच वादग्रस्त ठरले. 

तेलेकर यांची टीका, मागणी

  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या स्वतःच्या कॅबिनेटमध्येच चारित्र्यावर डाग असलेले व वादग्रस्त मंत्री असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या प्रशासनाचीच परिस्थिती अशी असेल, तर ते गोवा गुन्हेगारमुक्त कसे बरे करतील? 

  तवडकर हे मारहाणीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आहेत. त्यामुळे सध्या ते जी पदे प्रशासकीय पातळीवर व संघटनात्मक पातळीवर भूषवत आहेत, त्या सर्व पदांवरून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा.