Goan Varta News Ad

खाणींसाठी हलचालींना मुख्यमंत्र्यांकडून गती

खाण कार्यालयात जाऊन पडताळल्या फाईल्स

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd October 2020, 11:21 Hrs
खाणींसाठी हलचालींना मुख्यमंत्र्यांकडून गती

पणजी : खाणी लवकरात लवकर सुरू करून राज्यासमोरील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नव्या दमाने कामाला लागले आहेत. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी पणजीतील खाण कार्यालयास भेट देऊन मुख्य सचिव, खाण संचालक तसेच अॅडव्होकेट जनरल यांच्यासोबत तेथेच बैठक घेऊन चर्चा केली. तसेच कार्यालयातील फाईल्सही तपासल्या.      

खाणप्रश्नी तोडगा काढण्याबाबत राज्य सरकार कोणती पावले उचलत आहे, याची माहिती राज्य सरकार वेळोवेळी केंद्र सरकारला देत आहे. शिवाय त्यासंदर्भात केंद्राने ताबडतोब पावले उचलावी यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यातील खाण धोरण, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी याबाबत निर्णय घेण्यासाठी आपण वारंवार मुख्य सचिव, खाण संचालक तसेच राज्याच्या अॅडव्होकेट जनरलांशी चर्चा करीत असतो. बऱ्याचवेळा संदर्भासाठी फाईल्स महत्त्वाच्या असतात. त्या मंत्रालयात मागवून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन फाईल्स तपासणे सोपे जाते. त्यामुळेच आपण प्रत्यक्ष खाण कार्यालयात येऊन फाईल्स तपासल्या. तसेच संबंधितांशी चर्चाही केली, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.      

आगामी काळात खाणींबाबत जे निर्णय घेतले जातात, त्याची पूर्ण माहिती जनतेला वेळोवेळी देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. खाणींवर पडून असलेल्या तसेच रॉयल्टी भरलेल्या खनिज वाहतुकीला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ३१ जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील खनिज वाहतूक सुरू होणार असून, ग्रामीण भागांतील खाण अवलंबितांना त्यामुळे काहीअंशी दिलासा मिळणार आहे. पण  सरकारने याच काळात अधिक प्रयत्न करून, केंद्र सरकारशी चर्चा करून खाणप्रश्न सोडवावा आणि याच हंगामात खाणी सुरू कराव्या, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटनेही यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन कायदा दुरुस्ती किंवा न्यायालयीन लढाई यापैकी कोणत्याही तोडग्याने याच हंगामात खाणी सुरू करा आणि खाण अवलंबितांना दिलासा मिळवून द्या, अशी मागणी केली आहे. तर दक्षिण गोव्यातील खनिज ट्रक मालक संघटनांनीही दोन दिवसांपूर्वी हीच मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.      

दरम्यान, राज्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा असलेल्या खाणी गेल्या आठ वर्षांपासून बंद आहेत. त्यातच पर्यटनालाही उतरती कळा लागलेली असतानाच मार्चनंतर राज्यात करोनाने थैमान घातला. त्यामुळे सरकार खाणी कधी सुरू करेल, याकडेही त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.  

मुख्यमंत्री कधी बोलवतात याची वाट पाहतोय !

खाणप्रश्नी चर्चा करण्यासाठी पुन्हा बोलवू, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आम्हाला गेल्या भेटीवेळी दिली आहे. मुख्यमंत्री आम्हाला कधी बोलावतात, याची आम्ही वाट पाहत आहोत. मुख्यमंत्र्यांशी त्यावेळी चर्चा करून आम्ही आमची पुढील भूमिका स्पष्ट करू, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने बोलताना गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी दिली.