क्रिकेट रंगते मैदानात, लाखोंचे बेटिंग हॉटेलांत

आयपीएल चालू असताना पोलिसांनी कारवाई केल्यासारखे दाखवायचे आणि जुगाऱ्यांनी गाशा गुंडाळल्याचे नाटक करायचे. पुढच्या रात्री कालचाच खेळ पुन्हा चालू होतो.


13th October 2020, 12:54 am
क्रिकेट रंगते मैदानात, लाखोंचे बेटिंग हॉटेलांत

भारतात ​सर्वाधिक लोकप्रियता लाभलेला खेळ आहे क्रिकेट आणि क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेली स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल. संयुक्त अरब अमिरातीत सध्या आयपीएलचे सामने दररोज चुरसपूर्ण रीतीने होत आहेत. स्पर्धा चांगल्याच रंगतदार वळणावर येऊन पोहोचली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगलोर हे संघ सातत्यपूर्ण खेळ करीत आहेत. तर हैदराबाद, चेन्नई, राजस्थान आणि पंजाब या संघांना विजयापेक्षा पराभवांचाच अधिक सामना करावा लागत आहे. काही संघ सामने जिंकता जिंकता ऐनवेळी दुबळा खेळ करून हरून जाताहेत, तर काही सामन्यांत हरणारा संघ अखेरच्या क्षणी दणकट प्रदर्शन करून सामन्यात विजय खेचून आणताहेत. क्रिकेटवेड्या भारतीय प्रेक्षकांना ही वर-खाली जाणाऱ्या खेळाची मेजवानी हवीच असते. दर वर्षी भारतातील आठ किंवा दहा ठिकाणी खेळली जाणारी आयपीएल स्पर्धा यंदा करोनाच्या साथीमुळे धोक्यात आली हाेती. अखेर तुलनेने सुरक्षित असलेल्या संयुक्त अरब अमिरातीत दुबई, शारजा, अबुधाबी अशा ठिकाणी सारे सामने खेळविण्याचे ठरले. त्यानुसार स्पर्धा खेळली जात आहे संयुक्त अरब अमिरातीत, परंतु रंगली आहे प्रामुख्याने भारतात. रंगणाऱ्या चुरसपूर्ण सामन्यांबरोबरच आयपीएल स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असते. ते म्हणजे सट्टा खेळण्याचे. ऑनलाईन बेटिंगचा जुगार अायपीएल स्पर्धेतील सामन्यांवर मोठ्या प्रमाणात चालतो. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था भले अडचणीत आलेली असेल, परंतु आयपीएलचा झगमगाट आणि आयपीएलवरील बेटिंग अजिबात कमी झालेले नाही हे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे.

ही स्पर्धा सुरू झाल्यापासून गोव्यात पोलिसांनी आतापर्यंत चार ठिकाणी छापे मारून ऑनलाईन सट्टाबाजार उधळून लावला आहे. प्रामुख्याने मोरजी, बागा, कळंगुट, कांदोळी या समुद्रकिनाऱ्यांच्या पट्ट्यात हॉटेलांमधून ऑनलाईन बेटिंगची रॅकेट चालू असतात. तिकडे मैदानावर खेळ चालू असताना हॉटेलच्या खोलीत बसून या वेगळ्या खेळाचे आयोजक अॉनलाईन बेटिंग चालवतात. त्यात सहभागी होण्यासाठी हॉटेलमध्ये येऊन राहणारे पर्यटक असतात, त्याचप्रमाणे इतर ठिकाणांहून या खेळात सहभागी होणारे उत्साही जुगारीही असतात. एकेका सामन्यावर लाखो रुपयांचे बेटिंग चालते. पैसा लावणारे बहुतेक त्यात हरतात, एखाद दुसरा जिंकतही असेल. परंतु मॅन ऑफ द मॅच असतो सट्ट्याचा संचालक. गेल्या अकरा दिवसांत पोलिसांनी कांदोळीत दोन वेळा, मोरजी येथे एकदा तर गेल्या शनिवारी बागा-कळंगुट येथे छापा मारून बे​टिंगचा खेळ रंगेहाथ पकडला. लाखो रुपयांची रोख रक्कम, ऑनलाईन बेटिंगचे साहित्य आणि उपकरणे जप्त केली. चारही छाप्यांमध्ये मिळून पंधरा ते सतरा लाेकांना अटक केली, यात खेळाचे आयोजक आहेत, तसेच खेळताना पोलिसांच्या तावडीत सापडलेले पर्यटकही आहेत. यातील गंभीर बाब म्हणजे छापे मारून अटक केलेल्या आयोजक आणि जुगाऱ्यांना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत बातमी प्रसिद्ध होण्याआधी रातोरात जामीन मिळालेला असतो. कारण म्हणे जुगार हा जामीनपात्र गुन्हा आहे आणि संशयितांना कोठडीत डांबून ठेवता येत नाही!

त्यामुळे आयपीएल स्पर्धा चालू असतानाचे हे छापे म्हणजे ऑनलाईन सट्टाबाजाराचे आयोजक आणि पोलिस यांच्यातील लुटुपुटीची लढाई असते. पोलिसांनी कारवाई केल्यासारखे दाखवायचे आणि जुगाऱ्यांनी गाशा गुंडाळल्याचे नाटक करायचे. पुढच्या रात्री कालचाच खेळ पुन्हा चालू होतो. कारण या गुन्हेगारांना कोठडीत ठेवता येत नाही, त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध होऊन त्यांना शिक्षाच होत नाही. दर वर्षी आयपीएल स्पर्धा सुरू झाली की ऑनलाईन सट्टाबाजार जोमाने चालतो. किनारपट्टीवरील विशिष्ट हॉटेलमधील गर्दी त्या दिवसांत वाढते. करोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता शिथील झाला आहे, वाहतुकीवरील निर्बंध उठले असले तरी सामाजिक अंतराचे पालन अनिवार्य आहे. मात्र सुरक्षेचे सर्व उपाय भिरकावून देत, जुगार प्रतिबंधक नियमांचा भंग करीत ऑनलाईन सट्टा चालतो. संघांवर, खेळाडूंवर हजारो रुपयांच्या बोली लावल्या जातात. कारवाई मात्र तोंडदेखली असते. कडक कारवाईची भीतीच नसल्यामुळे हे चालते. असे असेल तर हतबल बनलेले पोलिस खाते जुगारविषयक कायदे आणि नियम कडक करण्याची शिफारस सरकारला का बरे करीत नाहीत? सरकार स्वत:हून हे कायदे कडक करण्याचे पाऊल का बरे उचलत नाही? की आज आयपीएलच्या निमित्ताने तर उद्या आणखी काही तरी निमित्ताने, सर्वांच्याच फायद्याचा हा खेळ रंगलेला असतो? दर काही दिवसांनी पोलिसांनी छापे मारून कारवाई केल्याचे दाखविले तरी स्पर्धा संपेपर्यंत हे जुगारी अड्डे चालू राहतील याबाबत सर्वसामान्य माणसाला अजिबात शंका नाही.