Goan Varta News Ad

फादर वास्को दु रेगो – एक गुणी गीतकार

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
11th October 2020, 11:36 Hrs

फादर वास्को दु रेगो यांनी कोकणी गीते रचली आहेत. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९२५ रोजी झाला. शिक्षण पोर्तुगीज, लॅटिन व इंग्रजी भाषेत झाले. वयाच्या विसाव्या वर्षी ते जेज्युईत संस्थेत दाखल झाले. 

१९५२ ते १९५६ पर्यंत ते धार्मिक शिक्षणासाठी बेल्जियमला गेले. तेथे पहिल्याच वर्षी ख्रिसमस समारंभात विविध देशांतील धर्मगुरुंना आपापल्या मातृभाषेत नाताळगीत गाण्यास सांगितले. त्यावेळी कोकणीत एकही नाताळगीत नव्हते. साहजिकच त्यांना स्वतःचीच लाज वाटली. त्यावेळी त्यांनी आपणच कोकणीत गीते रचण्याचा निश्चय केला. त्यांना लिहायला यायचे. दुसऱ्याच दिवशी त्यांनी कोकणीतले पहिले नाताळ गीत लिहिले, विस्वासाचो दीस. पुढे गायनाचो झेलो, हे सेवाधार्मिक गितांचे पुस्तक तयार करण्यासाठी फादर रेगो यांनी ३०० हून जास्त गाणी रचली. विशेष म्हणजे त्यांना चालही लावली. 

सर्वांत जुने कोकणी नियतकालीक दर म्हयन्याची रोटी याचे ते संपादक होते. २००९ ते २०१९ पर्यंत त्यांनी ते काम पाहिले. बेल्जियमहून परतल्यावर त्यांनी पाच वर्षे पुण्यात काम केले. मग १९६३ साली रायतूर येथील सेमिनारीचे आत्मीक गुरू म्हणून काम पाहिले. 

व्हेटिकनच्या दुसऱ्या विश्वसभेने चर्चमधील प्रार्थना मातृभाषांमध्ये करण्याची परवानगी दिली. त्यावेळी फादर रेगो यांनी प्रार्थना कोकणीत द्यायला सुरुवात केली. लॅटिन भाषेतील प्रार्थनेचा ग्रंथ त्यांनी व मंगळुरूचे फादर फिलीप नाझारेथ यांच्या सहाय्याने कोकणीत आणला. पर्वरी येथील थाॅमस स्टिफन्स कोकणी केंद्राचे ते संस्थापक सदस्य. रेगो यांनी अनेक पुस्तकांचा कोकणीत अनुवाद केला आहे. १९६५ साली त्यांनी नवो करार या नावाच्या लहान पुस्तिका तयार केल्या. वर्षभरातील प्रार्थनांची यादी त्यात आहे.

कोकणी शाळांचा प्रचार करण्यासाठी ते संपूर्ण गोवा फिरले. प्राथमिक शिक्षण कोकणीत व्हावे, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. लाॅयोला शाळेत त्यांनीच कोकणी वर्ग सुरू केले. माताजी (मदर) निर्मला यांच्यासोबत त्यांनी गोरगरीब, अनाथांची सेवा केली आहे. गोव्यातील मेटास्ट्रिप्स, नायलाॅन ६.६, कोकण रेल्वे आंदोलनात त्यांनी भाग घेतला आहे.  

जानेवारी २०१५ त फादर जुजे वाझ या पयल्या गोमंतकीयाच्या संतपदावेळी त्यांनी गीत रचले होते. पोप फ्रान्सिस यांच्या हजेरीत ते गायिले गेले होते. फादर रेगो यांनी एनिमी या कोकणी चित्रपटाचे शीर्षक गीत लिहिले आहे. त्यांनी दाल्गाद कोकणी अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. सध्या ते पुणे येथे इशाप्रेम निकेतनात असतात. 

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)