Goan Varta News Ad

अनुभवाची शिदोरी

वाचु आनंदे

Story: मानसी संजय शेट मांद्रेकर ९७६५८ १८५६१ |
11th October 2020, 11:32 Hrs
अनुभवाची शिदोरी

सुधा मूर्ती या एक अध्यापिका, समाजसेविका, उच्चपदस्थ अधिकारी आहेत. इन्फोसिस कंपनीच्या त्या संचालक.  त्यांनी कन्नड साहित्यात एक लेखिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 'गोष्टी माणसांच्या' या पुस्तकात आयुष्यातील अनुभव व त्यांना माहीत असलेल्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने त्यांनी मांडल्या आहेत. How I Taught My Grandmother To Read And Other Stories' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा लीना सोहोनी यांनी केलेला हा मराठी अनुवाद.

   कर्नाटकातील हवेरी जिल्ह्यातील शिग्गवी या गावात जन्मलेल्या सुधा मूर्ती यांचे बालपण आजी- आजोबांच्या सहवासात गेले. त्यांना त्यांचा विशेष लळा होता. सुधाताईंना लहानपणापासून पुस्तकांची आवड. वाचनाची आवड आजोबांनी लावली. त्यांनी आपली आजी कृष्तक्का यांना कन्नड वाचायला व लिहायला शिकविले. त्यांच्या आजींना असलेली शिकण्याची ओढ त्यांनी सुंदररीत्या या पुस्तकात मांडलेली आहे. सुधा मूर्ती यांचे छोट्या छोट्या गोष्टींचे निरीक्षण, कोणत्याही प्रसंगातून शिकण्याचं कौशल्य या पुस्तकात प्रत्ययास येते. परदेशात त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी व त्यातून घेतलेला बोध या पुस्तकात मांडला आहे.

सुधा मूर्ती या कॉम्प्युटर सायन्स विषयाच्या अध्यापिका होत्या. एक अध्यापिका म्हणून त्यांनी फक्त आपल्या विषयाचंच नव्हे, तर नीती मूल्यांचं मुलांना केलेलं मार्गदर्शन लाजवाब आहे. विद्यार्थ्यांना समजून घेण्याची वृत्ती या पुस्तकात जाणवते. विद्यार्थ्यांना मित्र समजून त्यांच्यामध्ये मिळून मिसळून त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे घडवलं‌.

भारताचे अकरावे राष्ट्रपती डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी झालेली त्यांची पहिली भेट, त्यांच्याकडून त्यांनी शिकलेल्या गोष्टी आणि कलाम यांचा साधेपणा त्यांनी खूप गोड पद्धतीने या पुस्तकात मांडला आहे.

जे. आर. डी टाटांवरील लेखात सुधाताई किती धाडसी आहेत हे कळते आणि टाटांचं व्यक्तिमत्व कसं होतं याची जाणीव होते. सुधा मूर्ती या 'टेल्को' कंपनीच्या शॉप फ्लोअरवर काम करणाऱ्या पहिल्या महिला होत्या, हेही समजते.

आई म्हणून त्यांनी मुलांना दिलेले संस्कार एका लेखात वाचायला मिळतात. सुधा मूर्ती यांच्यामध्ये असलेली आणखीन एक खासियत म्हणजे एक अध्यापिका असूनही विद्यार्थ्यांप्रमाणे सतत ज्ञान संपादन करण्याची त्यांची वृत्ती! आपली मुलगी अक्षता हिने तिला काय शिकविले यांचं त्यांनी खूप सुंदर वर्णन केले आहे.

इन्फोसिस फावंडेशन त्यांनी कशाप्रकारे उभं केलं तसेच या फावंडेशनने केलेली समाजकार्ये त्याविषयी या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितले आहे. गरीबांविषयी असलेल्या भावना व त्यांना केलेली मदत याचही सुंदर वर्णन त्यांनी केले आहे. मनात असलेला शिक्षकांविषयी आदर दिसतो. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आहे तसेच त्या परोपकारी वृत्तीच्या आहेत, हे कळते.

दान कसं करावं हे खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे. त्यांचे पती नारायण मूर्ती यांच्याबद्दलही त्यांनी खूप सांगितले आहे. विद्यार्थ्यांकडून करून घेतलेले वेगवेगळे उपक्रम त्यांच्या बुद्धीमत्तेची जाणीव करून देतात. सुधा मूर्ती यांनी मुलांना सांगितलेल्या सुंदर कथाही या पुस्तकात आढळतात.

पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. केवळ १३० रुपये किंमतीचे व १६७ पानांचं हे पुस्तक सुधा मूर्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देते. वाचकांनी ते मुद्दाम वाचावे.

(लेखिका विद्यार्थिनी आहेत.)