लवचिक आवाजाचा गायक

8 माहीत आहे??

Story: महेश दिवेकर, डिचोली |
25th September 2020, 06:34 Hrs
लवचिक आवाजाचा गायक

https://www.youtube.com/watch?v=Sin-OhGGOH0

-

https://www.youtube.com/watch?v=D_4RpD3mk_w

--

https://www.youtube.com/watch?v=KxzqIXFc194

दक्षिणेत कन्नड, तामिळ, मल्याळम, तेलगू अशा चार भाषांतील चित्रपट  बनतात. विशेष म्हणजे या चारही भाषा जाणणारे लाखो प्रेक्षक कर्नाटक, केरळ, आंध्र, तमिळनाडू राज्यांत आहेत. तेथील काही अभिनेते, दिग्दर्शक व गायक, संगीतकारांचा या चारही भाषांत मुक्त वावर असतो. पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (७४) हे त्यातीलच एक. दोन सप्ताहापूर्वी त्यांनी करोनावर मात केली होती, पण प्रकृती खालावल्याने त्यांची प्राणज्योत शुक्रवारी मालवली. 

स्वतःची स्वतंत्र शैली असली की गायकाला हमखास यश मिळते. तो कायम रसिकांच्या मनात राहतो. बालूसर किंवा एसपी यांचीही स्वतःची शैली होती. किशोरकुमारप्रमाणे त्यांचा आवाजात मस्ती, लवचिकता होती. आवाजही स्वतंत्र होता. म्हणजे त्यांचे अनोळखी गाणे ऐकले तरी ते एसपी हे त्यांची इतर भाषांतील गाणी ऐकणारा सहज सांगेल. शास्त्रीय संगीताचा प्रचंड अभ्यास. हिंदीत आले म्हणून ते देशभर लोकप्रिय झाले. त्यामुळे प्रादेशिक भाषांतील कलाकारांनी हिंदीत, जमल्यास (हाॅलिवूड) इंग्रजीत काम करायला हवेच. अर्थात तशी संधी सर्वांनाच मिळत नाही. 

सत्तर, ऐंशीच्या दशकात एसपींचे दक्षिण भारतीय संगीतावर वर्चस्व होते. म्हणजे दहा गाणी वाजली तर त्यातील पाच- सहा त्यांची. ऐंशीच्या दशकात ते हिंदीत आले. सलमानचा आवाज बनले. नंतर अचानक विरक्ती आल्यागत परत दक्षिणेत गेले. 40 हजारांहून अधिक गाणी त्यांच्या नावावर आहेत. 12 तासात 21 कन्नड गाणी गायचा विक्रमही त्यांनी केला आहे. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशात 4 जून 1946 रोजी झाला. 1966 पासून ते गात आहेत. श्री मर्यादा रामण्णा हा त्यांचा पहिला चित्रपट. केवळ गायकच नव्हे, तर ते डबिंग आर्टिस्टही होते. कमल हासनसाठी (मूळ नाव पार्थसारथी, नंतरचे कमलासन) ते डबिंग करायचे. हिंदी व संस्कृतवर एसपींचे प्रभुत्व होते. एक दुजे के लिए हा सुपरहीट चित्रपट त्यांच्या गाण्यांनी गाजला. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. नंतर गाजला तो मैने प्यार किया, मग हम आपके है कौन, रोजा, हम साथ साथ है, साजन, वंश वगैरे.

एसपींची काही हिंदी गाणी सांगायची झाल्यास, ‘ख्वाबोंमे तुम साँसो मे तुम रोजा, सच मेरे यार है, ओ मारिया, आजा शाम होने आई, आते जाते हसते, कभी तू छलिया लगता है, साथिया तुने क्या किया, आके तेरी बाहों में, तुमसे मिलने की तमन्ना है, देखा है पहली बार, पहला पहला प्यार है, मौसम का जादू है मितवा, तेरे मेरे बिच में, मेरे जीवन साथी प्यार किए जा, दिल दीवाना वगैरे.

एसपींना अभिनयाचीही आवड होती. त्यांनी 74 चित्रपटांत लहानसहान भूमिका केल्या आहेत. संगीत कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून ते टीव्हीवरही दिसायचे. 2001 साली पद्मश्री तर 2011 साली पद्मभूषण किताब त्यांना बहाल करण्यात आला होता. सहा राष्ट्रीय तर सात फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. 24 नंदी पुरस्कार, सात राज्य  असे अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे, पण त्यांचा वेगळ्याच धाटणीचा आवाज यापुढे ती भरून काढील, हे नक्की. 

बोनस लिंक- एसपी मुलाखत

https://www.youtube.com/watch?v=mwLccUadDx4