कर्नाटकच्या फिशिंग ट्रॉलर्सची गोव्यात मासेमारी

कारवाईला दिरंगाई केल्यास पुढील पाऊल उचलू : मच्छीमारी संघटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd September 2020, 11:31 pm

वास्को : कर्नाटकातील मालपे येथील फिशिंग ट्रॉलर्स गोव्याच्या सागरी हद्दीमध्ये बेकायदा प्रवेश करून मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत असल्याने स्थानिक मच्छीमाऱ्यांच्या हाती काहीच मासे लागत नाही. त्यामुळे मालपेच्या त्या फिशिंग ट्रॉलर्सवाल्याविरोधात राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी गोव्यातील मच्छीमारी संघटनांच्या विविध प्रतिनिधींनी केली आहे. यासंबंधी कारवाई करण्यास विलंब केल्यास आम्हाला पुढील पाऊल उचलावे लागेल, असा इशारा देण्यात आला.
मालपे येथील फिशिंग टॉलर्स गोव्याच्या हद्दीत येऊन मासेमारी करीत आहेत. याप्रकरणी कारवाई करण्यास राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. कारवाई करण्याचे आश्वासन देऊन राज्य सरकार स्थानिक मच्छीमाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप एका प्रतिनिधीने केला. तर रापणकाराचो एकवोटचे ओलंसियो सिमोईस यांनी म्हादई, कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे दुपदरीकरणासंबंधी सरकारवर आरोप करून आता मासेमारीही कर्नाटकच्या घशात घालणार आहेत काय, असा प्रश्न विचारला आहे.
क्रुस्टोडियो डिसोझा यांनी मालपेतील त्या फिशिंग ट्रॉलर्सवाल्यांविरोधात कारवाई न झाल्यास भवितव्यामध्ये गोवेकरांना मासळी मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली. कर्नाटक, महाराष्टातील फिशिंग ट्रॉलर्सवाल्यांनी गोवा किनारपट्टीपासून खोल समुद्रात मासेमारी करावी. गोव्याच्या हद्दीत त्यांनी मासेमारी केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करा. गोव्यातील मच्छीमाऱ्यांचे हित पाहण्यासाठी मालपेचे ट्रॉलर्स जप्त करा. त्या विरोधात कारवाई केल्याशिवाय त्यांची मासेमारी बंद होणार नाही, असेही ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी आम्हा मच्छीमाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलाविले होते. त्यावेळी मंत्री मायकल लोबोही उपस्थित होते. त्यांनी अशा प्रकारची मासेमारी करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची अद्याप कार्यवाही झाली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
..........बॉक्स.............
गोवेकरांचे हित जपण्याची गरज
महाराष्ट्र सरकारने गोव्यातील काहीजणांच्या बोटी महाराष्ट्राच्या हद्दीत बेकायदा मासेमारी करीत असल्याप्रकरणी बोटी जप्त करून कारवाई केली होती. यामध्ये एका आमदाराचीही बोट होती. परंतु, कर्नाटकातील बोटी गोव्यातील सागरी हद्दीत शिरून मासेमारी करीत असताना सरकार काहीच कारवाई करीत नाही. मालपेच्या फिशिंग ट्रॉलर्स वाल्यांनी येथे मासेमारी करताना मासळी मिळण्याचा पट्टाच नाहीसा करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुख्यमंत्री, मत्स्योद्योग मंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून गोवेकरांचे हित जपण्याची गरज आहे. याविरोधात तात्काळ कारवाई न झाल्यास आमचा व्यवसाय बंद होण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
किनारपट्टीपासून १२ सागरी मैलाच्या बाहेर मासेमारी करण्याचा नियम असताना मालपेचे ट्रॉलर्सवाले किनारपट्टीजवळ येऊन मासेमारी करीत आहेत. बुल ट्रॉलिंग मासेमारी करण्यास बंद असल्याने कर्नाटक, महाराष्ट्र येथे अशा पद्धतीने मासेमारी होत नाही. मात्र, मालपेचे फिशिंग ट्रॉलर्स गोव्याच्या हद्दीत शिरून बुल ट्रॉलिंग करतात. राज्य सरकार यासंबंधी गप्प आहे. _ ओलंसियो सिमोईस, रापणकाराचो एकवोटचे प्रतिनिधी

हेही वाचा