गुणी साहित्यिक सिल्वियानो बार्बोझा

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
20th September 2020, 01:07 pm
गुणी साहित्यिक सिल्वियानो बार्बोझा

सिल्वियानो बार्बोझा हे प्रसिद्ध लेखक, कवी, कादंबरीकार, तियात्र कलाकार. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९४९ रोजी कुंकळ्ळी येथे झाला. कुडचडे येथील गार्डियन एंजल शाळेत त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पोर्तुगीज भाषेत लिसेंवपर्यंत शिकले. त्यांना १९६६ साली राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती. १९७० मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी मिळवली. १९७३ ते १९७५ पर्यंत ते यु. के., जर्मनी, स्वित्झर्लंड देशांमध्ये होते. नंतर कॅनडात स्थायिक झाले. 

कॅनडात सिल्वियानो यांनी टोरंटो विद्यापीठात व हुंबेर महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर जाॅर्ज ब्रोन महाविद्यालयात कादंबरी लेखनाचा पाठ्यक्रम पूर्ण केला. ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहेत. सीएसटीई साॅफ्टवेअर चे ते अभियंते आहेत.

सिल्वियानो हे कॅनडाचे नागरिक असले तरी गोमंतकीय समाजाशी त्यांचे निकटचे नाते व संपर्क आहे. त्यांच्या कोकणी कविता, लेख पणजी आकाशवाणीवरून प्रसारित झाले आहेत. त्यांना इंग्रजी, पोर्तुगीज, हिंदी व फ्रेन्च या भाषाही येतात. दी गोवा टायम्स, सिने टायम्स, गोवन स्पोर्ट्स विकली आणि वावराड्यांचो इश्ट या नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. गोवानेट वेबसाईटवर ते नियमित लिहितात. क्लासिक गोवा नावाची त्यांची कोकणी कांताराची सीडी लोकप्रिय आहे. चार हजारांहून अधिक सीडींची विक्री झाली आहे. प्रसिद्ध गायिका लाॅर्ना यांनी त्यांची तीन गीते गायिली आहेत. 

२००४ साली त्यांची द सिक्थ नाईट ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. अमेझाॅन डाॅट काॅमवर ती उपलब्ध आहे. गोव्यातील ख्रिश्चन महिलेला सोसाव्या लागलेल्या जातीभेदावर ती लिहिली आहे. कोकणी भाषा व संस्कृतीला योगदानासाठी सिल्वियानो यांना रेडिओ मांगो यांनी २०१७ मध्ये पुरस्कार दिला होता. 

सध्या ते निवृत्त झाले असून कोकणी कादंबरी व दोन तियात्र या कामात व्यस्त आहेत. निर्माते मिळाल्यास कोकणी चित्रपट निर्माण करण्याचाही त्यांचा विचार आहे. त्यांना शुभेच्छा.

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)