‘आप’ची वाटचाल वेगळ्या वाटेने


19th September 2020, 02:05 am
‘आप’ची वाटचाल वेगळ्या वाटेने

आम आदमी पक्षाने काही वर्षांपूर्वी गोव्यात काम सुरू केले तेव्हा राजकीय दृष्टीकोनातून विचार करता या पक्षाकडे काहीच नव्हते. नेते नव्हते, कार्यकर्ते नव्हते, निधीही नव्हता. आता या पक्षाकडे सारे काही आहे असे नाही. परंतु, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधातील काँग्रेस पक्ष या दोन राष्ट्रीय स्तरावरील पक्षांच्या तुलनेत पाहता ‘आप’ने गोव्यात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे, असे दिसून येते. गोव्यात भाजपकडे विधानसभेत बहुमत आहे, सरकार आहे, चार लाखावर सदस्य आहेत. काँग्रेसची स्थिती सध्या दयनीय असली तरी त्यांच्याकडे पाच आमदार आहेत, दीर्घ राजकीय पार्श्वभूमी आहे, पक्षाला उभारी देऊ शकतील, असे नेते आहेत. मगो आणि गोवा फॉरवर्डसारख्या प्रादेशिक पक्षांकडे एकखांबी का असेना, नेतृत्त्व आहे. असे असताना गेल्या काही दिवसांत आम आदमी पक्ष गोव्यात सुत्रबद्धतेने आगेकुच करू लागला आहे. त्यांची ही वाटचाल इतर राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने पहिला राजकीय अनुभव घेतला. त्याआधी वाल्मिकी नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली सुरुवात करून, नंतर एल्विस गोम्स यांच्या प्रमुखपदाखाली विधानसभेला हा पक्ष सामोरा गेला. परंतु, अपेक्षित प्रभाव पडला नाही. आता प्रुडंट वाहिनीने केलेल्या जनमत चाचणीतून हा पक्ष नव्याने पुढे आला आहे. एल्विस गोम्स यांनी निमंत्रकपद सोडून मतदारसंघांत कार्य करण्याचे ठरविले असून राहुल म्हांबरे हा नवीन चेहरा ‘आप’ने पुढे आणायचे ठरविले आहे. या पक्षाच्या गोवा प्रभारी आतिशी यांनी गेले काही दिवस गोवा पालथा घालून राजकीय अभ्यास केला असून पक्षप्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर इथले राजकीय चित्र मांडलेले असेल. चांगल्या लोकांनी ‘आप’मध्ये यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दीड वर्षानंतरच्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला हा पक्ष आताच लागला आहे. त्यांची वाटचाल वेगळ्या वाटेने होताना दिसते आहे.