Goan Varta News Ad

शून्य मृत्यूदराचे लक्ष्य : मुख्यमंत्री

जनसंपर्क, जागृतीवर देणार भर; लक्षणे दिसताच चाचणी, उपचार घेण्याचेही आवाहन

|
15th September 2020, 08:02 Hrs
शून्य मृत्यूदराचे लक्ष्य : मुख्यमंत्री

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : लक्षणांकडे दुर्लक्ष करून उपचारांसाठी वेळाने इस्पितळात पोहोचणार्‍या करोनाबाधितांमुळेच राज्यातील मृत्यूंचे प्रमाण वाढत चालले आहे. नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क आणि जागृतीद्वारे करोना मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याचे प्रयत्न यापुढे केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

राज्यात सोमवारी दिवसभरातील सर्वाधिक १४ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आरोग्य सचिव, संचालक, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, कोविड केअर सेंटर्स, कोविड इस्पितळ, प्राथमिक, ग्रामीण इस्पितळांचे प्रमुख यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

लक्षणे दिसत असतानाही उशिरा चाचणी करून बाधित रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. त्यामुळेच मृत्यूंचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या काही दिवसांत तर करोनाने मृत झाल्यानंतर संबंधित व्यक्तींना उपचारासाठी इस्पितळात आणण्यात आल्याची माहिती करोनाबाबत काम करत असलेल्या डॉक्टरांनी बैठकीत दिली. करोना मृत्यू रोखणे ही सरकारप्रमाणे नागरिकांचीही जबाबदारी आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात मोफत आणि दर्जेदार उपचार दिले जात आहेत. प्लाझ्मा थेरपी आणि रेमडेस्वीर इंजेक्शनमुळे गंभीर बाधितांचे प्राण वाचत आहेत. कोविड केअर सेंटर्स तसेच कोविड इस्पितळांत अनेक खाटा रिक्त आहेत. याचा विचार करून नागरिकांनी लक्षणे दिसताच करोना चाचणी करून घ्यावी आणि उपचारांसाठी न घाबरता इस्पितळात दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ज्या दिवशी करोनाबाधितांचा आकडा सर्वोच्च झाला, त्याचदिवशी गोमेकॉत रुग्णांना जमिनीवर झोपावे लागले. त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. पण त्यानंतर त्यांना तत्काळ खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या. बाधितांचे प्रमाण वाढत चालले आहे, त्याप्रमाणे त्यांच्या उपचारांच्या सुविधेतही वाढ करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

ऑक्सिजनची कमतरता नाही

ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे करोनाबाधिताचा मृत्यू झाला ही चुकीची बातमी आहे. राज्यात ऑक्सिजनचा अजिबात तुडवडा नाही. सद्यस्थितीत पुरेल इतका ऑक्सिजन साठा राज्यात आहे. शिवाय गोव्याला ऑक्सिजन पुरविणार्‍या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या संपर्कात आम्ही आहोत, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

तीन दिवसांत तीन एचएफएनओ मशिन्स

राज्यात सध्या पुरेसे व्हेेंटिलेटर उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांचीच जास्त गरज होती. त्यामुळे तत्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात आले. त्यानंतर एका महिन्याने एचएफएनओ मशिन्स घेण्याचा निर्णय झाला. या मशिनची ऑर्डर दिली, तेव्हा संपूर्ण भारतात मशिन्सची कमतरता होती. पण पुढील तीन दिवसांत तीन एचएफएनओ मशिन्स उपलब्ध केल्या जातील, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

प्लाझ्मादान करणार

करोनामुक्त झाल्यानंतर आपण प्लाझ्मादान करणार का असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, करोनामुक्त होऊन २८ दिवस झाल्यानंतर सर्वच निकषांत बसत असेल तर आपण निश्चित प्लाझ्मादान करू, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

अधिवेशनाची तूर्त गरज नाही

एकदिवसीय पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. शिवाय सध्या राज्यात करोनाबाधितांचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे तत्काळ विधानसभा अधिवेशनाची गरज नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. करोनाची साथ कमी झाल्यानंतर अधिवेशन घेण्याबाबत सभापती निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

शाळांचा निर्णय चर्चेनंतरच

२१ सप्टेंबरपासून नववी ते बारावी आणि महाविद्यालयांच्या अंतिम शाखांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय अद्याप सरकारने घेतलेला नाही. त्याबाबत दोन दिवसांत मुख्याध्यापक तसेच पालक-शिक्षक संघटनांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली जाईल. त्यानंतरच शाळांबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.