Goan Varta News Ad

राज्यात करोनाचे आणखी ११ बळी

नवे ६१३ बाधित; मृतांचा आकडा ३१५, सक्रिय रुग्ण ५,१०२

|
15th September 2020, 08:00 Hrs
राज्यात करोनाचे आणखी ११ बळी

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : चोवीस तासांत राज्यात पुन्हा ११ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने तसेच नवे ६१३ बाधित सापडल्याने करोना संकट अधिकच गडद होत चालल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. नव्या ११ मृत्यूंमुळे मृतांचा आकडा ३१५ झाला आहे. तर ४४६ जण करोनातून मुक्त झाल्याने सक्रिय बाधितांची संख्या ५,१०२ वर आली आहे.

डिचोली येथील २७ वर्षीय युवती, मडगाव येथील ६८ वर्षीय, पारोडा येथील ८३ वर्षीय, वास्को येथील ८२ वर्षीय, बागा येथील ३४ वर्षीय, खोर्ली येथील ९० वर्षीय, तर पर्वरी येथील ७९ वर्षीय पुरुषाचा चोवीस तासांत मृत्यू झाला आहे. शिवाय केपे येथील ८२ वर्षीय, दाबोळी येथील ५५ वर्षीय व आमोणा येथील ७२ वर्षीय महिलेचेही करोनामुळे निधन झाले. ११ पैकी ९ जणांचे गोमेकॉत, तर दोघांचे मडगाव येथील कोविड इस्पितळात मृत्यू झाले. अकराही मृतांना करोनासोबतच इतर गंभीरही आजार होते, अशी माहिती आरोग्य खात्याने मंगळवारच्या दैनंदिन अहवालातून दिली आहे.

दरम्यान, राज्यातील करोनातून बरे होणार्‍यांचा दर ७८.७६ टक्के झाला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत २५,५११ जणांना करोनाची लागण झाली असून, त्यांतील २०,०९४ जण करोनातून मुक्त झाले आहेत. तर नव्या ४३४ जणांनी घरी अलगीकरणात राहण्याचा पर्याय निवडल्याने सद्यस्थितीत घरी अलगीकरणात असलेल्यांची संख्या १०,२९७ झाली आहे, असेही खात्याने सांगितले आहे. राजधानी पणजीत चोवीस तासांत २७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात रायबंदर, करंझाळे, सांतिनेज, मिरामार, टोंक येथील नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली आहे.

७१७ खाटा रिकाम्या

उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटर्समधील ५४५ खाटांपैकी १७८, तर दक्षिण गोव्यातील १,००६ खाटांपैकी ५३९ खाटा सध्या रिक्त असल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. कोविड केअर सेंटर्सप्रमाणेच कोविड इस्पितळांतही किती खाटा रिकाम्या आहेत, याची माहितीही सरकारने दररोज जनतेला द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आणखी २४ पर्यटकांवर कारवाई

पणजी महानगरपालिकेने (मनपा) दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मिरामार किनार्‍यावर मास्कविना फिरणार्‍या २४ पर्यटकांवर मनपाने मंगळवारी सायंकाळी दंडात्मक कारवाई केली. मास्क, सॅनिटायझर तसेच सामाजिक अंतर या नियमांचे पालन न करता पर्यटक फिरत असल्याने त्यांच्यापासून इतरांना करोना संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी काळात ही मोहीम आणखी कडक केली जाईल, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.