...आणि शेवटी एकदाचा मी करोना निगेटिव्ह ठरलो, हुश्श !

स्वानुभवावरून लक्षात आलेल्या उणिवा; त्रुटींवर उपाय न योजल्यास स्थिती हाताबाहेर


15th September 2020, 07:57 pm
...आणि शेवटी एकदाचा मी करोना निगेटिव्ह ठरलो, हुश्श !

प्रसन्न बर्वे

गोवन वार्ता

पणजी : जगात यापूर्वीही अनेक महामार्‍या आल्या आणि गेल्या. कदाचित यापुढेही येतील. प्रश्न हा नाही की, महामारी का, कशी आली? प्रश्न हा आहे की, आम्ही त्याला कसे सामोरे जात आहोत. त्याविरुद्ध लढण्याची आपल्याकडे काय व्यवस्था आहे? व्यवस्थेत असलेले कमकुवत दुवे प्रत्यक्ष व्यवस्थेचा फटका बसल्याशिवाय नाही लक्षात येत. मला हा अनुभव पुरेपूर आला. माझी सौभाग्यवती पणजीतल्या एका फार्मसीत काम करते. करोनाचं संकट आल्यादिवसापासून ती अजिबात न डगमगता फार्मसीत जात राहिली. शून्य असलेला करोनाबाधितांचा आकडा वाढू लागला, तेव्हाही ती मागे हटली नाही. पण, अखेर करोनाने तिला गाठलेच.

त्याचे झाले असे की, फार्मसीतल्या एका स्टाफला लागण झाल्याचे समोर येताच सर्वांनी टेस्ट करून घ्यायचे ठरले. फार्मसी बंद करण्यात आली. ती व तिच्यासोबत काम करणारी तिची एक मैत्रीण एका लॅबमध्ये गेल्या, अँटीजेन टेस्ट करायला सांगितली. त्या लॅबमध्ये अँटीजेन टेस्ट करतो असे म्हणून ब्लड सँपल घेतले आणि अँटिबॉडी टेस्ट केली. (जी वास्तविक करोना येऊन गेल्यानंतर करायची असते.) याचे ज्ञान तिला झाल्यावर तिने व तिच्या मैत्रिणीने अर्बन हेल्थ सेंटर गाठले. तिथे ‘तुम्ही राहता तो भाग आमच्या कक्षेत येत नाही.’ असे उत्तर मिळाले. मग, त्यांनी पर्वरी आरोग्यकेंद्र गाठले. तोपर्यंत दुपार झाल्यामुळे दुसर्‍या दिवशी यायला सांगितले. पुन्हा जिथे राहता तिथेच टेस्ट करा, असा निरोप आल्यामुळे त्यांनी सांताक्रुझ सेंटर गाठले. तिथे सांगितले चिंबल केंद्रावर चला. अशी नाचानाच करून शेवटी एकदा ती अँटिजेन टेस्ट बुधवार, दि. ९ रोजी झाली. त्यात सौभाग्यवतींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ताबडतोब तिला घेऊन वेळग्याला आमच्या घरी गेलो. तिथे होम क्वारंटाइनसाठी ऑनलाइन अर्ज केला. संध्याकाळी माझ्या मोबाइलवर फोन आला, ‘उद्या सकाळी, टेस्ट करून घ्या.’ दुसर्‍या दिवशी माझी सांताक्रुझला टेस्ट झाली. ११ तारखेला एसएमएस येईल आणि रिपोर्ट काय आहे ते कळेल असे सांगण्यात आले. मी स्वत: सोसायटीमध्ये सर्वांना कळवले. मी दाराची कडी लावून आत स्वत:ला बंदिस्त करून घेतले. १३ तारखेपर्यंत वाट पाहिली. मग, फोनाफोनी सुरू केली. उत्तरे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. ‘प्रत्यक्ष आरोग्य केंद्रावर जाऊन रिपोर्ट घ्या’ अशी सूचना करण्यात आली. जे करणे धोकादायक होते. समजा मी पॉझिटिव्ह असतो, तर अनेकांना करोनाबाधित करण्याचे पाप माझ्या हातून घडले असते. जे मला अजिबात करायचे नव्हते. मी घरीच थांबलो. दि. १४ रोजी एक हकिकत समजली. सांताक्रुझमधील एक व्यक्ती अशीच टेस्ट करून रिपोर्टसाठी चिंबल, बांबोळी, ताळगाव आणि सांताक्रुझ येथे हेलपाटे घालत राहिली. शेवटी चार दिवसांनी त्याला ताळगाव येथे तो ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे समजले. त्यानंतर तीन दिवसांनी त्याला एसएमएस आला की, तो ‘पॉझिटिव्ह’ आहे. दरम्यान, तो जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याने एका जरी माणसाला बाधित केले असल्यास, किमान सोळा माणसे बाधित झाली असतील.

मी मंगळवारी सकाळी एका डॉक्टरांना फोन केला, त्यानंतर ताळगाव, चिंबल, सांताक्रुझ असे फोन फिरवत राहिलो. गेले तीन-चार दिवस मी हेच करत होतो. शेवटी बहुधा माझ्या फोन करण्याचा कंटाळा आल्यामुळे त्या बिचार्‍या नर्सने सर्वत्र शोध घेऊन मला फोन केला आणि सांगितले, ‘बर्वे तुम्ही निगेटिव्ह आहात.’ घरातलं सामान संपलं होतं, कालचा एक दिवस मी फक्त सुक्या पोह्यांवर काढला होता. मी धावत जाऊन आधी सामान घेतलं. घरी आलो मस्तपैकी कॉफी घेतली. दुपारचे १२.३० वाजून गेले होते आणि माझ्या मोबाईलवर मॅसेज झळकला, ‘मिस्टर प्रसन्न भरवे, आपला दि. १० रोजी सकाळी ९.०० वाजता केलेल्या आरटी-पीसीआर टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.’ बदललेल्या आडनावासकट मी हुश्श केले. पण, डोक्यात एक विचार आला; व्यवस्थेतला हा हलगर्जीपणा, कुणालाच योग्य माहिती नसणे, ती न देणे, त्यामुळे टेस्ट करू पाहणार्‍यांचे होणारे हाल, रिपोर्ट मिळवण्यासाठी त्यांचे बाहेर फिरणे  ही कारणे तर करोना वाढण्यामागे नसतील? करोनासारख्या लगेच संक्रमित होणार्‍या महामारीविरुद्ध लढण्यासाठी आमची ही अशी व्यवस्था असेल तर करता करता सर्व गोवेकर विपरीत अर्थाने ‘पॉझिटिव्ह’ होतील. हे लिहिण्याचा हेतू कुणाला दोष देणे हा नाही. पण, या आणि अशा असंख्य उणिवा दूर केल्या नाहीत, तर खरोखरच परिस्थिती हाताबाहेर जाईल यात शंका नाही !

हेही वाचा