Goan Varta News Ad

पाकच्या करोना नियंत्रणामागील गुपित काय?

पाकिस्तान

Story: विश्वरंग |
15th September 2020, 06:26 Hrs
पाकच्या करोना नियंत्रणामागील गुपित काय?

अमेरिका, भारत, ब्राझिलसारख्या देशांत करोनाचा कहर सुरूच असून, दिवसेंदिवस बाधित आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. अमेरिकेसह युरोपमधील विकसित देश तसेच जगातील विकसनशील देशांनाही या महामारीला आवर घालण्याचे सूत्र अद्याप सापडलेले नाही. करोनावरील लस कधी येते, आणि कधी आपला जीव भांड्यात पडतो, अशी जगातील जवळजवळ प्रत्येक देशाची स्थिती आहे. परंतु, भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तामधील आकडेवारी मात्र सर्वांसाठी आश्चर्यजनक ठरली आहे. २२ कोटी लोकसंख्येच्या या आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशात आरोग्य सुविधा सुमार दर्जाच्या असल्याने ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पाकिस्तानमध्ये ८० हजार ते १ लाख बळींची नोंद होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु, आश्चर्यजनकरीत्या आकडा ७ हजारांच्या आत राहिलेला आहे. 

करोना नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरातील देशांनी लॉकडाऊनचा आधार घेतला असताना पाकिस्तानने मात्र काही निवडक नियम लागू करून सर्व व्यवहार खुले ठेवले होते. देशातील दोन तृतीयांश नागरिक रोजंदारीवर काम करत असल्याने लॉकडाऊनसारखे उपाय देशाला परवडणार नसल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले होते. पाकिस्तानमधील व्यवहार सुरू ठेवल्यास सामाजिक संसर्गाचा धोका वर्तवण्यात आला होता. मात्र, गेल्या ५-६ महिन्यांतील परिस्थिती लक्षात घेता, ताज्या आकडेवारीनुसार पाकिस्तानमधील करोनाबाधितांची संख्या ३ लाखांच्या आसपास तर मृतांची संख्या ७ हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. जूनच्या मध्यात प्रतिदिन सुमारे ७ हजार करोनाबाधित आढळून येणाऱ्या पाकिस्तानमध्ये सप्टेंबर महिन्यातील प्रतिदिन करोनाबाधितांची संख्या ५०० च्या आसपास राहिलेली आहे. यामुळे या जादुई संख्येचे नेमके काय गुपित आहे, असा प्रश्न जगाला पडला आहे. 

पाकमधील लोकांची चांगली प्रतिकारशक्ती, गेल्या काही महिन्यांतील तापमान तसेच नागरिकांचे सरासरी वय २२ च्या आसपास असल्याने तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दावे केले जात आहेत. परंतु, चाचण्या, बाधितांचे प्रमाण, टक्केवारी आदी आकडेवारी यातून वेगळेच चित्र समोर येत आहे. भारताने आजपर्यंत ५ कोटी नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत तर पाकमध्ये ही संख्या ३० लाखांच्या आत आहे. भारताच्या सरासरी ३५ हजार चाचण्यांच्या तुलनेत पाकमध्ये प्रतिदिन केवळ १२ हजार चाचण्या होतात. भारतात एका दिवसात विक्रमी १० लाख चाचण्या झालेल्या आहेत तर पाकमध्ये २० हजारांवर आकडा गेलेला नाही. तसेच, रुग्ण दगावण्याचे प्रमाण भारताच्या १.८ टक्क्यांच्या तुलनेत पाकमध्ये २.३ टक्के एवढे आहे.  

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, तेथील इस्पितळांत कौटुंबिक चाचण्या होण्याचे प्रमाण नगण्य आहे. काही प्रांतात तर आकडेवारी कमी करून सांगण्याचे आदेशच देण्यात आल्याचे वृत्त आहे. चीनप्रमाणे पाकिस्तानमध्येही आकडे लपवण्यात येत नाही ना, असा प्रश्न पडण्यास वाव आहे. कारण, एका सर्वेक्षणानुसार पाकिस्तानमधील ८५ टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये करोनाविरोधी अँटीबॉडीज अद्याप तयार झालेल्या नाहीत. याचा अर्थ ८५ टक्के लोकसंख्या अद्याप करोनाच्या रडारवर असून शकते. अशातच कराची, लाहोरसारख्या दाट वस्ती असलेल्या शहरांतील रेस्टॉरंट, उद्याने खुली झाली आहेत. मास्क घालण्याचा प्रकार बंद झाले असून, थिएटर, मॉल्समधील वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील करोनाची पहिली लाट ओसरली असे गृहीत धरल्यास दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता गाफील राहणे नागरिकांना परवडणारे नाही, असे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.