स्टीव्ह स्मिथ खेळण्याची शक्यता : लँगर

‌इंग्लंड-ऑस्ट्रेलियादरम्यान आज तिसरा एकदिवसीय सामना


15th September 2020, 05:39 pm

मॅनचेस्टर : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी मॅनचेस्टर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ खेळण्याची दाट शक्यता ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी व्यक्त केली आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळण्यासाठी स्टीव्ह स्मिथने मंगळवारी नेटमध्ये सराव केला. मागील सामन्यांच्या सरावादरम्यान स्मिथच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे तो दोन्ही एकदिवसीय सामन्यांत खेळू शकला नव्हता. दरम्यान, तिसऱ्या सामन्याच्या आदल्या दिवशी स्मिथने काहीकाळ मैदानात पुरेसा सराव केला. त्यामुळे या सामन्यात तो खेळण्याची शक्यता लँगर यांनी व्यक्त केली. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय सामन्याच्या आधी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याबाबत बोलताना लँगर म्हणाले, स्टिव्ह स्मिथने या सामन्यात खेळण्यासाठी आम्ही सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण करीत आहोत. या सामन्यात खेळण्यासाठी स्मिथ योग्य दिशेने वाटचाल करीत आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला एकदिवसीय सामना जिंकला होता. पण, दुसऱ्या सामन्यात २३१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ४९ षटकांत केवळ २०७ धावांवर बाद झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी अवसानघातकी फलंदाजी केल्यामुळे त्यांना हा सामना गमावावा लागला. मात्र, तिसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथच्या ‍आगमनामुळे संघाच्या फलंदाजीला बळकटी मिळेल ज्याची ऑस्ट्रेलियाला जास्त आवश्यकता आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या पहिल्या तीन टी२० सामन्यांची मालिकाही इंग्लंडने २-१ अशी जिंकली होती. यजमान इंग्लंडने पहिले दोन्ही टी२० सामने जिंकून मालिकेवर वर्चस्व मिळविले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाने शेवटच्या सामन्यात बाजी मारली होती.
या एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघाचे काही खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी युएई येथे रवाना होणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच, स्टिव्ह स्मिथ एडम जांपा, तर इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये जोस बटलर, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरेस्टो, मोईन अली, इयॉन मॉर्गन यांचा समावेश आहे.
संभाव्य संघ :
इंग्लंड : जेसन रॉय, जॉनी बेयरेस्टो, जो रूट, इयाॅन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम बिलिंग्स, मोईन अली, क्रिस वोक्स, आदिल राशिद, जोफ्रा आर्चर, मार्क वुड.
ऑस्ट्रेलिया : अॅरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टोयनिस, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, एलेक्स कैरी (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, एडम जांपा, जोश हेजलवुड.