मानसिक विशेषांगी हेल्पलाईनचा लाभ घ्या

तयांना प्रेम अर्पावे

Story: प्रकाश कामत |
09th September 2020, 01:28 pm
मानसिक विशेषांगी हेल्पलाईनचा लाभ घ्या

विशेषांगींच्या विविध समस्या असतात. केंद्रांतील सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय या समस्यांकडे लक्ष देऊन त्या आपल्यापरीने सोडविण्यासाठी, विशेषांगींना दिलासा देण्यासाठी झटत असते. परवाच असा एक मोठा उपक्रम या मंत्रालयाने मार्गी लावला. २४ x ७ टोल फ्री मानसिक विशेषांगित्व हेल्पलाईन "किरण" (१८००-५००-००१९)

 खास करून कोविडच्या काळात मानसिक विशेषांगींना अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले. या समस्या केवळ त्यांच्याच नसतात, तर त्यांचे कुटुंबीय, खास करून पालक अथवा सेवाधारक यांनाही त्या जाणवतात. विशेषांगीच्या सबलीकरणाच्या केंद्रीय खात्याने तयार केलेली ही हेल्पलाईन मानसिक पुनर्वसन सेवा देईल. त्यात प्रारंभीची छाननी, प्रथमोपचार, मानसशास्त्रीय सहाय्य, आपदा व्यवस्थापन, सकारात्मक वागणुकीचा पुरस्कार व मानसिक कल्याण आणि मानसशास्त्रीय पेचप्रचंग व्यवस्थापन अशा व्यापक सेवांचा समावेश आहे. ही हेल्पलाईन पहिल्या पातळीवरील सल्लामसलत, सल्ला देणे तसेच गंभीर आजार असलेल्या विशेषांगींना सल्लागारांची मदत देणे या गोष्टीही करील. या सगळ्या सेवांमध्ये विविध विशेषांगींना प्राधान्य दिले जाईल, हे पालक, विशेष शिक्षक, सेवाधारक यांनी लक्षात घ्यावे. 


कोविडच्या काळात मानसिक समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यासाठी मदत देणारे व्यावसायिक देशात खूपच कमी असल्याचे लक्षात आल्याने ही हेल्पलाईन सेवा चालू केल्याचे सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने म्हटले आहे.

 भारतात मानसिक रुग्ण असणे हे कलंकीत मानले जाते. (सर्वसामान्य माणसे त्याला वेड लागले आहे, असेच म्हणतात.) याची दखल घेऊन या हेल्पलाईनची सेवा घेणाऱ्या विशेषांगींच्या नावाची गुप्तता पाळण्यात येईल. 

ही सेवा केवळ इंग्रजी भाषेतच नव्हे, तर देशातील भाषिक विविधता लक्षात घेऊन एकूण १३ भाषांमध्ये उपलब्ध होत आहे. यात आजच्या घडीला इंग्रजी, हिंदी, तामिळ, गुजराती, उर्दू, आसामी, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश असेल. बीएसएनएलच्या सहाय्याने सुरू केलेल्या या सेवेत ७५ मानसिक आरोग्य व्यावसायिक देशाच्या विविध भागांतील २५ केंद्रांमधून ही सेवा देतील. यात ८ राष्ट्रीय संस्था, १४ संमिश्र प्रादेशिक मानसिक आरोग्य केंद्रे आणि तीन प्रादेशिक केंद्रे यांचा समावेश आहे.

 दुसऱ्या पातळीवर सेवा देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण खात्याने एकूण ६६० क्लिनिकल सायकोलाॅजिस्ट, ६६८ मानसोपचार तज्ज्ञ यांच्या सेवा उपलब्ध केल्या आहेत. 

हे व्यावसायिक दुसऱ्या पातळीवर गंभीर विशेषांगी मानसिक रुग्णांसाठी सल्लामसलत करतील तसेच गरज असेल तेथे औषधे लिहून देतील (प्रिस्क्रिप्शन सेवा). या सेवेत तिसऱ्या पातळीवरची सेवा म्हणजे गंभीर रुग्णांसाठी सतत अनुसरण सेवा (फाॅलोअप) या हेल्पलाईनवरून उपलब्ध असेल.

 कोवीड लाॅकडाऊन काळात विशेषांगींच्या अनेक समस्या उभ्या राहिल्या. केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण खात्याने केंद्रियो आरोग्य खात्याच्या मदतीने एक अॅडवायजरी देशभर जारी केली खरी, परंतु बऱ्याच राज्यांत तिची व्हावी तशी अंमलबजावणी झाली नाही. पर्यायाने विशेषांगी व त्यांच्या कुटुंबियांना खूब मनस्ताप सहन करावे लागले. देशभर लाॅकडाऊन हळूहळू खुला करीत गेले असले व त्यामुळे सर्वसामान्यांना बराच दिलासा मिळत गेला असला तरी बऱ्याच विशेषांगींना अजून मार्चपासून एकदाही घराबाहेर पडता आलेले नाही. गोव्यातही बऱ्याच जणांना ही मानसिक कोंडी सहन करावी लागते आहे. व्हीलचेअर अथवा खाटेला खिळलेल्या सिरेब्रल पाल्सीसारख्या, शैक्षणिक अथवा मानसिक विशेषांगी, १०० टक्के दृष्टीहिन अशा विशेषांगींची तगमग मला मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे.

 

शाळा, विद्यालय, महाविद्यालय येथे अथवा नॅशनल असोसिएशन आॅफ ब्लाईंडसारख्या संस्थांमध्ये सम- विशेषांगी आणि प्रेमळ शिक्षक वर्गांमध्ये एरवीं रुळणाऱ्या दृष्टीहिन मुलांना घरी बसावे लागल्याने त्यांना बरेच अस्वस्थ व्हायला होत असते. डिचोलीचा १४ वर्षांचा शिवा परबसारखा १०० टक्के दृष्टीहिन विशेषांगी मग आपली ही अस्वस्थता व तगमग शिकवणीस येणारे शिक्षक, पालक अथवा आपल्या भावंडांवर काढतो.

अशा समस्या वाढत आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यास ही ‘किरण’ हेल्पलाईन हे एक वरदान ठरेल याबद्दल मला मुळीच शंका नाही.

 विशेषांगी क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापक, शिक्षक तसेच इतर भागधारकांनी अशा मुलांना व त्यांच्या पालक अथवा सेवाधारकांना या हेल्पलाईनविषयी जाणीव करून द्यावी, शक्य तिथे त्यांना प्रोत्साहित करावे, हवी तर हेल्पलाईनची मदत घेण्यासाठी सहाय्यही करावे, ही विनंती.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, ब्लाॅगर आहेत.)