Goan Varta News Ad

कॅरेबियन प्रीमिअर लीगला १८ ऑगस्टपासून सुरुवात

|
13th August 2020, 03:29 Hrs
कॅरेबियन प्रीमिअर लीगला १८ ऑगस्टपासून सुरुवात

जमैका : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीगला (सीपीएल २०२०) खेळवली जाते. २०१३ ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक ३ वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा येत्या १८ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून जगभरातील सर्व ट्वेंटी-२० लीगमध्ये कॅरेबीयन लीगचीही प्रचंड चर्चा आहे.
या लीगमध्ये एकूण ३३ सामने खेळवले जाणार आहेत. यामधील २३ सामने हे ब्रायन लाराच्या अकादमीमध्ये होणार आहेत, तर उर्वरित १० सामने हे पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहेत. या लीगमध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. या लीगचे उपांत्य आणि अंतिम लढतीचे सामने ब्रायन लारा अकादमीमध्येच होणार आहेत. या लीगचा अंतिम सामना १० सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. या ट्वेन्टी-२० क्रिकेट लीगचे लाईव्ह सामने स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर चाहत्यांना पाहता येणार आहेत.
या लीगमधील खेळाडू आणि अन्य स्टाफची करोना चाचणी करण्यात आली होती. कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील खेळाडू आणि अन्य स्टाफ अशी एकूण १६२ जणांची करोना चाचणी करण्यात आली असून यांचे अहवाल आले आहेत. या अहवालानुसार १६२ पैकी एकही व्यक्ती करोनो पॉझिटिव्ह सापडलेली नाही. त्यामुळे आता या सर्वांना काही दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच खेळाडूंचा सराव आणि सामने सुरू होणार आहेत.
या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूही सहभागी होणार आहेत. फक्त एकाच देशाचे नाही तर बऱ्याच देशांतील आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ या लीगमध्ये पाहता येणार आहे. या लीगला मिनी आयपीएल, असेही काही जण म्हणत आहेत. त्यामुळे आता ही लीग कशी खेळवली जाते, यावर आयपीएलचे भवितव्य अवलंबून असल्याचे म्हटले जात आहे.