राज्यरंग। राजस्थान
‘भगवान के घर देर है, अंधेर नही’ असे म्हटले जाते. याचीच प्रचिती राजस्थानमधील राजा मानसिंह हत्याकांड प्रकरणात आली आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे. राजा मानसिंह यांचे नातेवाईक व समर्थकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी निकाल लागण्यासाठी तब्बल ३५ वर्षे लागावीत, हे नक्कीच विचार करायला लावण्यासारखे आहे.
२० फेब्रुवारी १९८५ रोजी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवचरण माथूर यांची देग येथे निवडणूक प्रचारसभा होती. त्यांच्या समर्थकांनी विरोधी पक्षाचे राजा मानसिंह यांचे झेंडे उतरवले होते. मुख्यमंत्र्यांनीही सभेत त्यांच्यावर टीका केली होती. ही गोष्ट कळताच राजा मानसिंह समर्थकांसह सभास्थानी दाखल झाले. तोपर्यंत सभा पार पडली होती. मानसिंह यांनी आपल्या जीपने तेथील व्यासपीठाला जोराची धडक दिली. तेथून ते थेट मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरलेल्या हेलिपॅडवर गेले. तेथेही त्यांनी जीपने हेलिकॉप्टरला धडक दिली. २१ फेब्रुवारी रोजी राजा मानसिंह आणि त्यांच्या समर्थकांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात राजा मानसिंहांसह अन्य दोघांचा मृत्यू झाला. २२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दिवशी झालेल्या जाळपोळीवेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला होता. यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारविरुद्ध संताप निर्माण झाला होता. काँग्रेस हायकमांडने ताबडतोब शिवचरण माथूर यांना राजीनामा देण्यास सांगून हिरालाल देवपुरा यांना मुख्यमंत्री केले होते.
हे प्रकरण २८ फेब्रुवारी १९८५ रोजी तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले. १७ जुलै १९८५ रोजी सीबीआयने जयपूर सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. १९९० मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजस्थानहून उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्हा आणि सत्र न्यायालयात स्थलांतरित करण्यात आले. २१ जुुलै २०२० रोजी तिघांना निर्दोष, तर ११ आरोपींना दोषी ठरवण्यात आले. २२ जुलै २०२० रोजी दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात अाली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी १७०० हून अधिक वेळा तारखा पडल्या. आरोपी आणि दोषींना मथुरा येथे आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. या काळात १९ न्यायाधीश बदलले. २० व्या न्यायाधीश साधना रानी ठाकूर यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. हा खटला तब्बल ३५ वर्षे चालला. त्यामुळे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. या काळात तिघा दोषींचा मृत्यू झाला. दोषी ठरलेले तत्कालीन डीएसपी कानसिंग भाटी आता ८२ वर्षांचे आहेत. अनेकांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. वयोमानामुळे अनेकांना चालणेही कठीण होत आहे. सर्व दोषींची रवानगी तात्पुरत्या कारागृहात करण्यात आली आहे.
या निकालानंतर न्यायालयीन प्रक्रियेबाबत अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी तातडीने न्याय होणे गरजेचे आहे.