कायदा आणि सुव्यवस्थेकडे प्राधान्याने बघण्याची गरज

करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत जावी तसे रोज राज्यात गुंडगिरीचा प्रकार नजरेस येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्यक्रम बनविल्याशिवाय या आघाडीवर प्रत्यक्ष कृती दिसणार नाही.

Story: अग्रलेख |
09th July 2020, 09:05 pm
कायदा आणि सुव्यवस्थेकडे  प्राधान्याने बघण्याची गरज

गेल्या काही दिवसांत कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न काही ठिकाणी निर्माण झाले आहेत. शहर-गाव, दिवस-रात्र, स्त्री-पुरुष असा कोणताही फरक या घटनांमध्ये करता येत नाही. गुंडगिरीचे प्रकार शहरांत घडले आहेत, तसेच गावांतही. दहशत निर्माण करण्याचे प्रकार दिवसा घडले आहेत, तसेच रात्रीही. या प्रकारांमध्ये पुरुष सहभागी आहेत तसेच स्त्रीयाही. गुंडगिरी गोव्याला, गाेव्याच्या राजधानी पणजी शहराला नवीन नाही, परंतु कायदा आपल्या हातात घेण्याच्या या प्रकारांचे जणू काही नवीन रुप आता बघायला मिळत आहे. पोलिस नेहमीप्रमाणे घडून गेलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यात व्यस्त असतात, रात्री रस्त्यात नाकाबंदीसाठीचे अडथळे उभारून वेळ घालवत असतात. गाडी चालविताना सीटबेल्ट घातला नाही, तसेच घराशेजारच्या दुकानात दुचाकीवरून जाताना हेल्मेट घातले नाही अशा किरकोळ कारणांवरून सर्वसामान्य लोकांना पिडून त्यांच्याकडून दंडाचे शंभर-दोनशे रुपये वसूल करण्याच्या मोहीमेवर असताना मात्र त्यांचे हात फुरफुरत असतात. अर्थात यासाठी पोलिसांना दोष देऊन काही उपयोग नाही. सध्या करोनामुळे सर्वच व्यवहार बंद असल्यामुळे सरकारची महसूलप्राप्ती कमी झाली असून पोलिसांना नाक्या-कोपऱ्यावर राहून दिवसाकाठी विशिष्ट रक्कम वसूल करण्याचे लक्ष्यच नेमून देण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात एक वेळ गुंडगिरीकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल, परंतु शंभर-दोनशे रुपयेरुपी सोन्याचे अंडे देणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी चालकांना सोडायचे नाही असा पोलिसांचा पण दिसतो आहे. 

गुंड, राजकारणी, पोलिस
या धांदलीत गोव्यात नवनवीन प्रकारची गुंडगिरी सुरू झाली आहे. जुन्या काळात १९८०-९० च्या दशकांतही गुंडगिरी होती. परंतु तेव्हाचे गुंड हे गुंडच असायचे, त्यांच्या टोळ्या असायच्या. हळूहळू गुंडगिरी आ​णि राजकारणी यांचे सख्य होऊ लागले. गुंड आणि राजकारणी यांचे एकमेकांशी जुळून आल्यानंतर खरा गुंड आणि राजकारणी यातील फरक कमी होऊ लागला. गुंड राजकारणात आणि राजकारणी गुंडगिरीत अशी सरमिसळही होऊ लागली. हा गुंता अधिक गहिरा बनल्यामुळे पोलिसांच्या मदतीची आवश्यकता भासू लागली. त्यातून गुंड, राजकारणी आणि पोलिस असा त्रिकोण तयार झाला. हा त्रिकोण आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत ठरू पाहात आहे. अलिकडच्या काळात बघावे तर सांताक्रुझमध्ये दोन टोळ्यांमध्ये चकमक झाली. ताळगावात बांधकाम व्यावसायिकाच्या पुढाकारातून जमीन व्यवहारात गुंडांमार्फत धमकावण्याचा प्रकार झाला. राजधानीच्या सांतिनेज भागात भर दिवसा बाउन्सर आणि कामगार आणून घरे पाडण्याची धमक निर्माण झाली. मालमत्तेच्या वादातून सर्वण-डिचोली येथील विवाहित महिलेचे अपहरण करून नंतर तिला बेशुद्धावस्थेत सोडून देण्याची घटना दिसली. हणजुणे ग्रामपंचायतीच्य हद्दीत हाॅटेल प्रकल्पाच्या मालकाकडून खंडणीसाठी पंचांनीच कारस्थान रचल्याचे उघड झाले. लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराचे पालन आवश्यक असताना सारे नियम धाब्यावर बसवून किनारपट्टी भागात पार्ट्यांचे आयोजन सुरू झाले. सत्तरीत प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा आवाज पोलिसांच्या मदतीने दाबून टाकण्याची घटना घडली. 
प्रत्यक्ष कार्यवाहीची गरज 
करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत जावी तसे रोज राज्यात कोठे ना कोठे गुंडगिरीचा प्रकार नजरेस येत आहे. कधी गुंडांच्या दोन टोळ्यांतील झगडा, तरी कधी व्यावसायिकाची लुबाडणूक होते. कधी व्यावसायिकाने भाडोत्री गुंडांना आणलेले असते, तर कधी सर्वसामान्यांना गुंडगिरीची झळ बसते. काही पोलिस राजकीय इशाऱ्यांबरहुकूम नाचत असतात, तर काही गुंडांशी हातमिळवणी करून असतात. यामुळे राज्यात गुंडगिरीच्या छोट्या-मोठ्या घटना सतत घडत आहेत. असेच रोज चालू राहिले तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक उरणार नाही. नूतन पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी राज्याचे पोलिसप्रमुख म्हणून गेल्याच आठवड्यात ताबा घेतला. गुन्हेगारी नष्ट करणे, अमली पदार्थ व्यवहारांतील व्यक्तीवर कडक कारवाई करणे, प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणांचा तपास पूर्ण करणे तसेच वाहतुकीत शिस्त आणणे हे आपले प्राधान्यक्रम असल्याचे त्यांनी आठ दिवसांपूर्वी सांगितले, त्यांचे शब्द अद्याप वास्तवात उतरायचे आहेत. त्याआधी आठ दिवस म्हणजेच जूनच्या अखेरच्या आठवड्यात गृह खात्याचा कार्यभार सांभाळणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावून गुन्हेगारीविरोधात कडक मोहीम हाती घेण्याचा आदेश दिला, त्यांच्या आदेशाची कार्यवाही अद्याप दिसायची आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्यक्रम बनविल्याशिवाय या आघाडीवर प्रत्यक्ष कृती दिसणार नाही.