शिक्षण क्षेत्रातलं राजकारण

वाचू आनंदे

Story: उर्वी भट |
21st March 2020, 11:39 am
शिक्षण क्षेत्रातलं राजकारण


--
साहित्यिक द. वा. दळवणेकर यांची ‘अक्षरांची पाऊले’ ही २०१८ साली प्रसिद्ध झालेली पहिली कादंबरी. त्यानंतर एका वर्षानेच ‘बालंट’ ही त्यांची दुसरी कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. या जगात आरोप होतच असतात. कालांतराने त्यातील काही खोटे असल्याचे सिद्ध होते. जेव्हा खोटे आरोप एखाद्या निरागस माणसाच्या मानेवर भूताप्रमाणे बसतात त्यावेळी ते त्याच्यासाठी ‘बालंट’ ठरतात. याच विषयाला हात घालणारी ही कादंबरी होय.
शिक्षकी पेशा हा नेहमीच शुद्ध पेशा समजला गेला आहे, पण आताच्या आधुनिक जगात या पवित्र पेशातसुद्धा चालू असलेले डावपेच, राजकारण आणि नीच वृत्ती या सगळ्यांचा प्रत्यय आपल्याला ‘बालंट’ या कादंबरीमधून येतो. कादंबरीच्या सुरुवातीपासूनच ही कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेते. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित वळणे घेत, विविध मानसिकतेचे आणि प्रवृत्तीचे दर्शन घडवत ही कथा शेवटी सुखद किनाऱ्याला येऊन लागते. कथेचा शेवट जरी सुखद असला तरी ‘बालंट’ चा धाक प्रत्येक वाचकाच्या मनाला पेटवून देतो.
‘बालट’ एखाद्या शिक्षकाला आत्महत्येपर्यंत घेऊन जाते. तो जवळजवळ उध्वस्त होण्याच्या मार्गावर असतो. पण, त्याचे काही सहकारी, कुटुंब आणि मित्र त्याला सावरतात. त्यांच्या आधार, सल्ल्यामुळे त्याचे जीवन मार्गाला लागते. सुरळीत होते. हे सारे घडत असतानाच, फक्त स्वतःचा अहंकार सुखावला जावा किंवा कोणीतरी आपले काहीतरी ऐकले नाही म्हणून त्या निर्दोष व्यक्तीवर बालंट आणावे अशा वृत्ती विद्येच्या प्रांगणात राजरोसपणे वावरताना दिसतात.
कादंबरीतील प्रत्येक प्रसंग वाचकाला आपल्या डोळ्यांसमोर घडावा असा दिसतो. कथानकाची सरळ, सोपी भाषा कादंबरीत वापरून लेखक द. वा. तळवणेकर वाचकांना शिक्षकी पेशातील राजकारणाचे भयानक दर्शन घडवितात. कादंबरीत आलेली बरीच पात्रे विक्षिप्त, विचित्र भासतात. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे नुकसान करायला त्यांना काहीही वाटत नाही. त्यावरून जगात दगडाच्या काळजाची, संधिसाधू माणसे आहेत, याचा प्रत्यय येतो. या व्यक्तींसोबतच मुकुलनाथसारखी काही पात्रे समंजसही असल्याचे दिसते.
आजच्या काळात मवाळ स्वभावाच्या व्यक्तींना त्रास, मनस्ताप सहन करावा लागतो. या कादंबरीत तशी व्यक्ती आहे. तिच्यावर आलेले बालंट किती खरे-खोटे आहे, याची शहानिशा वाचकालाही करावीशी वाटते. सुगंधा माने यांनी मवाळांवर विनयभंगाचा खोटा आरोप का केला असावा, असा प्रश्न प्रत्येक वाचकाला पडल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर विद्यालयात चंचल वाकडे याच्यासारखी बेशिस्त, कुजके, स्वार्थी, खोटारडे लोक उदाहरण बनून फिरत आहेत, याचा वाचकाला तिटकारा वाटतो. शेवटी मुकुलनाथाला जे समाधान लाभते तेच समाधान प्रत्येक वाचकाला कादंबरीचा शेवट वाचून मिळते.
ही कादंबरी विद्यालयात होणाऱ्या राजकारणाचा ज्वलंत प्रत्यय वाचकांना देते. हे लिखाण खूप धैर्याचे होय. विद्येच्या मंदिरात घडणाऱ्या विषारी गोष्टी वाचकांना अक्षरश: अस्वस्थ करतात. विचार करायला प्रवृत्त करतात. साहित्यिक द. वा. तळवणेकर यांची ‘बालंट’ ही कादंबरी वाचकांना एक वेगळाच अनुभव देऊन जाते. अशा ज्वलंत, वास्तववादी विषयांवर अधिकाधिक लिखाण व्हायला हवे. वाचकांनी मुद्दाम ही ‘बालंट’ कादंबरी वाचावी.
(लेखिका प्राध्यापक आहेत.)
---------------------------------------------
बालंट
लेखक : द. वा. तळवणेकर
प्रकाशक : द. वा. तळवणेकर, चित्रांगी रेसिडन्सी, मंगेशी (गोवा)
किंमत : ३०० रु. पाने : १५०