रंगसंगीत

अनुभूती

Story: प्रसाद शंकर गुरव |
21st March 2020, 11:39 am
रंगसंगीत

‘रंगसंगीत’ या विषयावर लिहिताना मला नेहमीच कसं व कुठून सुरु करु, असा प्रश्न पडतो. जेव्हा या विषयावर पीएचडी करत होतो तेव्हाही आणि ती पूर्ण झाल्यावरही फारसा फरक पडला असं नाही. (पीएचडीसाठीचा विषय ‘स्वातंत्र्योत्तर हिंदी रंगसंगीत’ असा होता. २००३ साली मी गोवा विद्यापीठाच्या हिंदी विभागातून या विषयावर शोधप्रबंध सादर केला.) या विषयामध्ये भरभरून सांगावे असं खूप काही आहे, पण जेव्हा सांगण्याची, ​किंबहुना लिहिण्याची वेळ येते तेव्हा मला मी असमर्थ आहे असंच वाटतं. वर वर अगदी सरळ व सोपा अर्थ असा की रंगमंचासाठी (नाटक) जे संगीत व ध्वनी उपयोगात आणले जातात, त्याला ‘रंगसंगीत’ म्हणतात. पण, माझ्यासारख्या कित्येक रंगकर्मींना मात्र या विषयाची व्याप्ती खूप मोठी वाटते. खरंतर या विषयामध्ये पीएचडी करण्याचा तसा काही माझा सुरुवातीपासूनच विचार होता, असं नाही किंवा काहीतरी करायचं म्हणूनही ते केलं गेलं असं नाही. मुळात थिएटर आर्टसमध्ये शिकत असताना प्रसिद्ध रंगकर्मी ब. व. कारंथजींचे विचार ऐकण्याची संधी मला लाभली व या विषयामध्ये खूप कमी प्रमाणात लिखाण झाल्याचं कळल्यामुळे या विषयावर लिखाण व्हायला हवं असं वाटलं. खरं तर कारंथजी यांनीच या विषयावर लिहायला हवं, असं मला त्यावेळी वाटायचं व मी त्यांच्याकडे तसं बोललोही होतो, पण त्यांना कदाचित लिहावं असं वाटलं नसावं. पुढे मग जेव्हा नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाच्या ‘रंगमंडला’ मध्ये अभिनेता म्हणून नोकरी करतेवेळी पं. भास्कर चंदावरकर यांच्यासोबत सहाय्यक रंगसंगीतकार म्हणून काम करायची सुवर्णसंधी मला लाभली. त्यामुळे त्यांची रंगसंगीताबद्दल विचार करण्याच्या पद्धतीचा मला जवळून अनुभव घेता आला.
रंगमंचीय संगीताला आपलंस करायला तसा सुरुवातीला मला थोडा वेळ लागला खरा, पण त्याची विशालता पाहून मात्र मी त्याकडे आकर्षिला गेलो. शास्त्रीय संगीताचे थोडेफार ज्ञान असल्यामुळे नाटकाला लागणारं संगीत, त्यात काय मोठंसं, असे सामान्य विचार माझेही होते, पण रंगसंगीतात आतापर्यंत दिग्गजांनी केलेले नवनवीन प्रयोग व दृष्टिकोण पाहून आपण समजतो तितका हा विषय सोपा नाही हे समजलं.
या लेखाचे उद्दिष्ट रंगसंगीत जास्त बरं किंवा शास्त्रीय संगीत कमी उत्कृष्ट वगैरे पटवणे हा बिलकूल नसून कोणतेही संगीत तेव्हा रंगमंचाच्या दृष्टिकोनातून रंगकर्माकडे येतं तेव्हा त्याच्या स्वरूपामध्ये आमुलाग्र बदल होतो, यावर दृष्टीक्षेप टाकणे हा आहे. आतापर्यंत रंगमंचीय संगीतात शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, विविध नैसर्गिक व अनैसर्गिक ध्वनी यांचं संयोजन केलं गेलेलं आहे, एवढंच नव्हे तर शब्दांमधील अंतराळातील स्तब्धतादेखील रंगसंगीताचा हिस्सा बनते. शब्द आपले अर्थ व प्रतिकं बदलायला लागतात व नवीन रंगभाषेची निर्मिती होऊ लागते.
मला नेहमी वाटत असे की शास्त्रीय संगीत रंगमंचीय संगीताला नेहमी उपयुक्तच असणार, पण ब. व. कारंथजींच्या रंगसंगीतातील योजना पाहिल्यावर मी माझे विचार बदलले. त्यांच्या मतानुसार शास्त्रीय संगीतातील राग नियमांना रंगसंगीतात तसा वाव नाही. उलट त्यांच्या मतानुसार तबल्याला तबल्यासारखं न वाजवता त्यातून उत्पन्न होणाऱ्या निराळ्या ध्वनीचं संयोजन रंगसंगीताला जास्त उपकारक आहे. त्यांच्या या मताचा अर्थ तबल्याचे बोल शास्त्रीय संगीतात ज्याप्रकारचे बिंब तयार करतात, त्यांच्यापासून वेगळे होत, ज्याप्रकारच्या ध्वनीलहरींची नाट्याला गरज आहे, ती बिंबं उत्पन्न व्हायला हवीत.
रंगसंगीतातील सृजनात्मकता नाट्यातील मूळ गाभ्यावर व दिग्दर्शकी संकल्पनेवर पूर्णत: अवलंबून असते. रंगसंगीतकार सृजनतेचे गठ्ठे करुन ठेवूच शकत नाही. एकवेळ त्याच्याकडे असलेल्या विविध स्रोतामुळे त्याची रंगसंगीतकार म्हणून भरीव कामगिरी करण्याची शक्यता मात्र नाकारता येण्याजोगी नाही. म्हणजे असं की एखाद्याला शास्त्रीय व पाश्चात्य संगीताचे उत्तम ज्ञान असेल तर रंगसंगीतासाठी तो एक स्रोत असू शकतो, पण उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा उपयोग करणे म्हणजेच रंगसंगीतातील सृजनशीलता आहे, असे मात्र नक्कीच नाही. रंगमंच वा फिल्मसंगीत यासाठी कोणतेही नियम वा अटी नाहीत. कधी कधी शांततादेखील रंगमंचाचे प्रभावी पार्श्वसंगीत ठरते. रंगसंगीतकारांनी आतापर्यंत विविध ध्वनींचं संयोजन उत्कृष्टरीत्या केलेलं आहे. उदा. पाण्याच्या थेंबाच्या टिपकण्याचा आवाज, श्वासोच्छ्वास, कंठध्वनी इत्यादी.
बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या उल्लेखाशिवाय रंगसंगीतच काय नाट्यकर्मदेखील अपूर्ण आहे. त्यांनी आपल्या नाटकातून संगीताचा उपयोग कल्पकतेने व विविधतेने केला. पण, सगळ्यात वेगळ्या तऱ्हेने केलेला विशेष प्रयोग म्हणजे ‘आभासाला तडा देणारे संगीत’ होय. (यूजीत बर्टोल्ट ब्रेख्त - जन्म आउसबर्ग, जर्मनी १० फेब्रुवारी १८९८ रोजी आणि निधन १४ आॅगस्ट १९५६) हे एक नाटककार होते व मार्क्सवादी जीवनदर्शनापासून प्रभावित होते. विचार प्रदान करण्याकरिता त्यांनी रंगमंचाच्या तत्त्वाचा उपयोग केला. भारतातील रंगसंगीतकारच नव्हे तर कित्येक रंगकर्मीवर त्यांचा प्रभाव पहायला मिळतो. भारतातही अनेक रंगसंगीतकार होऊन गेले व आहेतही. ज्यामध्ये विशेष योगदान ब. व. कारंथ, पं. भास्कर चंदावरकर, कावालम नारायण पण्णीक्कर, हबीब तनवीर, शीला भाटीया, मोहन उप्रेती व इतर यांचे आहे.
माझ्या आतापर्यंतच्या रंगमंचीय प्रवासात कित्येकदा रंगसंगीत करण्याची मला संधी मिळाली आहे. पण, त्यामध्ये अगदी प्रभावी व न विसरण्याजोगी अनुभूती आर्य चाणाक्य करते वेळीची आहे. जेव्हा मी दिग्गज रंगसंगीतकारांना भेटला तर नव्हतोच, परंतु त्यांच्याबद्दल वा त्यांच्या कार्याबद्दल मला काहीच माहीत नव्हते. या नाटकाच्या प्रक्रियेमध्ये मात्र माझ्या वडिलांचे सहकार्य मला मिळत असे. नाटकातील कलाकार व मी पार्श्वसंगीताचे रेकॉर्डींग घरीच कॅसेट प्लेअरवर करायचो. जोपर्यंत ते उत्कृष्ट बनत नाही तोपर्यंत परत परत करायचो. ते खूप कष्टप्रद होते. परंतु, स्टुडियोमध्ये करण्याइतकी आमची ऐपतच नव्हती. मला चांगलच आठवतय नाटकाचे सर्व रेकाॅर्डींगचे काम पूर्ण झालं होतं. पण, नाटकाचे शेवटचे गीत ‘निघाले आर्य प्रवासाला...’ या गीताला का कोण जाणे माझ्याकडून म्हणावी तशी चाल लागत नव्हती. प्रस्तुतीकरणाचे दिवस जवळ आले होते.
एके दिवशी रिहर्सल संपवून रात्री १२-१ वाजता आम्ही माझ्या घरी चर्चा करत बसलो होतो. नेहमीप्रमाणे मी गीताला चाल लावली, पण मला ती भावली नाही. जवळच माझे वडील होते. त्यांना अचानक काय सुचलं कुणास ठाऊक, त्यांनी माझ्या हातातील गीत आपल्याकडे घेतले न् मला डग्ग्यावर काही बोल वाजवायला सांगितले. अर्थात ते बोल नेहमीच्या शास्त्रीय संगीताच्या बोलांपेक्षा निराळे होते. ते बोल मी रेकाॅर्डींगचे बटण दाबल्यानंतर वाजवायचे हे ठरलं, पण पूर्ण गीताची तालीम मात्र केली नाही. रेकाॅर्डींगचं बटण दाबलं गेलं. मी डग्ग्यावर बोल वाजवू लागतो तसं बैरागी रागाच्या सुरावटीमध्ये ते गीत त्यांनी गायला सुरुवात केली. एकाच ‘टेक’मध्ये हे गीत त्यांनी गाऊन पूर्ण केले. गाणं संपलं. रेकॉर्डींग झालेलं होतं. मी व माझ्यासोबत असलेले कलाकार कितीवेळ तरी सून्न होऊन बसून राहिलो, इतका त्या गीत गायनाचा प्रभाव होता. एवढेच नाही तर प्रत्येक प्रयोगाला ते गीत ऐकल्यावर कलाकार भावूक होत. इतका दर्द या गीतगायनात होता. पुढे मग आम्ही तेच गीत योजनाबद्ध पद्धतीने परत रेकाॅर्ड करायचा प्रयत्न केला, पण तसेच भाव, तसाच प्रभाव मात्र परत कधीच अनुभवायला नाही मिळाला.
(लेखक अभिनेते, संगीतकार आहेत.)