है प्रित जहाँ की रित सदा....

रुपेरी पडदा

Story: विद्या नाईक होर्णेकर |
21st March 2020, 11:35 am
है प्रित जहाँ की रित सदा....

भारतीय संस्कृतीचा प्रभाव आज पाश्चिमात्य देशांवर पडलेला आहे. परंतु, दुर्दैव म्हणजे ‘जिथे पिकतं तिथं विकलं जात नाही’ अशी स्थिती आज भारतात आहे. आमच्या युवापिढीला पाश्चिमात्य संस्कृतीची भुरळ पडली आहे. मात्र, ती केवळ २१ व्या शतकातील पिढीला पडली आहे, अशातला भाग नसून, अगदी ब्रिटीश राजवटीतही पाश्चिमात्य संस्कृतीच्या दिशेने तत्कालीन युवापिढी आकर्षित होण्याचा श्रीगणेशा झाला होता. इंग्रजीचे वारे जसे वाढत गेले तसतसे त्याचे प्रमाणही वाढत गेले. याची चाहूल चित्रपटनिर्मिती करणाऱ्यांनाही लागली. त्यामुळे त्याची दखल चित्रपटांमधूनही घेतली गेली. ती घेण्यात अग्रेसर होते, मनोज कुमार. नायक म्हणूनच नव्हे तर निर्माता, दिग्दर्शक म्हणून मनोजकुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला जे योगदान दिले आहे, ते जितके उल्लेखनीय आहे, तितकेच त्यांचे देशप्रेमही... जे त्यांच्या चित्रपटातून वारंवार दिसून आले.
‘उपकार’ पासून त्यांच्या ‘भारतकुमार’ प्रवास सुरू झाला. मनोजकुमार यांनी ‘उपकार’ मध्ये ‘जय जवान, जय किसान’ चा संदेश दिला. त्यानंतर आलेल्या त्यांच्या ‘पूरब और पश्चिम’ चित्रपटाने पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित होणार्‍या व भारताला नगण्य ठरवणाऱ्या भारतीयांवर सडकून प्रहार केला. १९७० मध्ये तो प्रदर्शित झाला. यंदा या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, पाच दशकानंतरही संगीत, अभिनय व संवादासह एकूणच चित्रपटाचे गारुड प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. मनोजकुमारने एका स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलाची भूमिका केली आहे. ज्याच्यासाठी त्याचा देश व त्या देशाची सांस्कृतिक मूल्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. पुढील शिक्षणासाठी तो परदेशात जातो. मात्र, तिथेही भारतीय संस्कृतीचा मान - सन्मान राखण्यात तो कुठेही कमी पडत नाही. परदेशात त्याची ओळख तेथील भारतीयांशी होते, ज्यांच्यात नखशिखांत पाश्चिमात्य संस्कृती भिनलेली असते. त्यांना भारतीय संस्कृती व सभ्यतेचा तर विसर पडलेलाच असतो, शिवाय त्यांना पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारत नगण्य वाटतो. या चित्रपटात विशेष संस्मरणीय जर काही असेल, तर तो म्हणजे प्राण व मनोज कुमार यांच्यातला संवाद.
प्राण यांनी साकारलेले ‘हरनाम’ हे पात्र भारताला शून्यात गणते. मात्र त्या ‘शून्या’ ला योग्य उत्तर देताना नायकाने जे गीत सादर केले आहे, त्यात भारताची महती अगदी ठासून भरली आहे. ‘जब जीरो दिया मेरे भारत ने, भारत ने मेरे भारत ने...दुनिया को तब गिनती आयी, तारों की भाषा भारत ने, दुनिया को पहले सिखलायी, देता ना दशमलव भारत तो, यूँ चाँद पे जाना मुश्किल था, धरती और चाँद की दूरी का, अंद़ाजा लगाना मुश्किल था, सभ्यता जहाँ पहले आयी, पहले जनमी है जहाँ पे कला, अपना भारत वो भारत है, जिसके पीछे संसार चला, संसार चला और आगे बढ़ा, यूँ आगे बढ़ा बढ़ता ही गया, भगवान करे ये और बढ़े, बढ़ता ही रहे और फूले-फले... है प्रीत जहाँ की रीत सदा... मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ।’ हे गीताचे पहिलेच कडवे भारत व भारतीय संस्कृतीचे महत्त्व विशद करण्यास पुरेसे ठरावे. देशभक्तीपर चित्रपट म्हणजे केवळ स्वातंत्र्य सैनिक वा स्वातंत्र्य लढ्यावर आधारित असावेत अशातला भाग नसून, अन्य विषयांच्या माध्यमातूनही देशभक्ती दाखवली जाऊ शकते, हे मनोजकुमार यांनी दाखवून दिले आहे. ‘पूरब और पश्चिम’ ही त्यास अपवाद नाही. या चित्रपटात अशोककुमार, प्राण, प्रेम चोप्रा, विनोद खन्ना, सायरा बानो यांचा समावेश आहे. सायराच्या भूमिकेचेही कौतुक करावेसे वाटते. पाश्चिमात्य संस्कृतीत वाढलेली, सिगरेट व मद्याच्या आहारी गेलेली, किमान कपड्यात वावरणारी बोल्ड मुलगी तिने साकारली आहे. नायकाच्या सान्निध्यात आल्यानंतर व भारतीय संस्कृतीची ओळख पटल्यावर तिने स्वत:त घडवून आणलेले बदलही अगदी उत्कृष्टरीत्या साकारले आहेत.
चित्रपटातील गीते व संगीत तर अगदीच मधूर. मग ते ‘है प्रीत जहाँ की रित सदा...’ असो की, ‘दुल्हन चली, ओ पहन चली...’ असो. ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड दे...’ हे गीत तर आजतागायत श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेते. मुकेश, महेंद्र कपूर, आशा भोसले, लता मंगेशकर यांच्या आवाजात सजलेल्या गीतांना कल्याणजी - आनंदजी यांचे स्वर्गीय संगीत लाभले आहे. त्यामुळे या गीतांची गोडी आजतागायत कायम आहे. ‘पूरब और पश्चिम’ या चित्रपटाविषयी कितीही लिहिले तरी बरेच काही राहून गेले असेच वाटावे, इतका हा चित्रपट सुंदर आहे. त्यानंतर हा विषय घेऊन ‘नमस्ते इंडिया’ सारखे असंख्य चित्रपट आले, मात्र ‘पूरब और पश्चिम’ ची ‘बातही कुछ और’...
(लेखिका नामवंत सिनेभाष्यकार आहेत.)