Goan Varta News Ad

अपघातात पती ठार, पत्नी जखमी

|
19th March 2018, 06:33 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता

म्हापसा : बस्तोडा येथे ग्रीन पार्क हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो पिकअप व दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीस्वार प्रकाश अनंत नाईक ( वय ५०, रा. पुर्ण बार्देश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी प्रतिमा नाईक ही गंभीर जखमी झाली आहे.      

म्हापसा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या  सुमारास घडला. मयत प्रकाश नाईक पत्नीसह (जीए ०३ एके ६६९३) क्रमांकाच्या अॅक्टीवा दुचाकीवरुन करासवाडा ते पर्वरीच्या दिशेने तर एमएच ०९ ईएम २२९० क्रमांकाची बोलेरो पिकअप पर्वरीहून पेडणेच्या दिशेने जात होती. ग्रीनपार्कजवळ बस्तोडाच्या बाजूने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. 

या अपघातात दुचाकीस्वार प्रकाश नाईक यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी प्रतिमा नाईक ही गंभीर जखमी झाली. अपघातानंतर पिकअप घटनास्थळावरून अंदाजे २० मीटरवर जाऊन उलटली. अपघाताचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक एलिडिओ फर्नांडिस व हवालदार उल्हास गावकर यांनी केला. पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या पिकअप चालक पांडुरंग कांबळी (कोल्हापूर, महाराष्ट्र) यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन हाकत दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यामुळे गुन्हा दाखल करून त्याला अटक 

केली आहे.