वयाच्या अवघ्या तिशीत मधुमेहाचे निदान झाल्यानंतर ती अगदीच अस्वस्थ झाली होती. आपण एवढे अॅक्टिव्ह असूनही रक्तातील साखर अचानक वाढण्यामागचे कारण काय असावे, हा प्रश्न तिला सतावत होता. डॉक्टरांशी चर्चा करताना तिला आपल्या पूर्वीपासून असलेल्या पी.सी.ओ.एस. या समस्येची आठवण झाली. अनेक वर्षांपासून अनियमित मासिक पाळी आणि वजनवाढ यांचा सामना करताना तिने या समस्येकडे केवळ स्त्रीरोगविषयक त्रास म्हणून पाहिले होते. मात्र, वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर पी.सी.ओ.एस.चा संबंध शरीरातील इन्सुलिनच्या कार्याशी आणि भविष्यातील मधुमेहाच्या धोक्याशीही असू शकतो, हे तिला पहिल्यांदाच समजले.
खरे तर अनेक महिलांची हीच परिस्थिती आहे. पी.सी.ओ.एस. म्हटले की अनियमित पाळी, चेहऱ्यावरील मुरुमे, अनावश्यक केसांची वाढ आणि वजनवाढ एवढ्याच गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मात्र, या लक्षणांपलीकडे जाऊन पी.सी.ओ.एस.चा परिणाम संपूर्ण शरीराच्या चयापचयावर होऊ शकतो.
पीसीओएस म्हणजे नेमके काय?
पीसीओएस म्हणजे Polycystic Ovary Syndrome. हा महिलांमध्ये आढळणारा एक सामान्य हार्मोनल विकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रजननक्षम वयोगटातील सुमारे १० ते १३ टक्के महिलांना हा त्रास असू शकतो.
या स्थितीमध्ये हार्मोन्सचे संतुलन बिघडते. विशेषतः अँड्रोजन या हार्मोन्सचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होणे, बीजांडाचे नियमित उत्सर्जन न होणे, चेहऱ्यावर केस येणे, मुरुमे आणि डोक्यावरील केस विरळ होणे अशी लक्षणे दिसतात.
केवळ सोनोग्राफीमध्ये अंडाशयांवर लहान फॉलिकल्स दिसणे म्हणजे पीसीओएस असे नाही. निदानासाठी पाळीतील अनियमितता, अँड्रोजनची वाढ किंवा त्यांची लक्षणे आणि सोनोग्राफीतील निष्कर्ष यांचा एकत्रित विचार करून इतर कारणे वगळली जातात.
इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय?
इन्सुलिन हे रक्तातील ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे हार्मोन आहे. शरीरातील पेशी इन्सुलिनला अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात.
अशा वेळी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन तयार करावे लागते. वाढलेल्या इन्सुलिनमुळे अंडाशयांमधून अँड्रोजन हार्मोन्सचे उत्पादन वाढू शकते. त्यामुळे पीसीओएसची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.
यामुळे पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये प्रीडायबेटिस आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. मात्र, पीसीओएस आहे म्हणजे प्रत्येक महिलेला मधुमेह होणारच असे नाही. आनुवंशिकता, इन्सुलिन रेझिस्टन्स, वजन आणि जीवनशैली यांचाही या धोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे नियमित रक्तशर्करा तपासणी महत्त्वाची आहे.
वजनवाढ आणि फॅटी लिव्हर
पीसीओएस असलेल्या काही महिलांमध्ये विशेषतः पोटाभोवती चरबी जमा होण्याचे प्रमाण वाढू शकते. मात्र, सामान्य वजन असलेल्या महिलांनाही इन्सुलिन रेझिस्टन्स असू शकतो.
इन्सुलिन रेझिस्टन्स आणि रक्तातील चरबीचे असंतुलन यांमुळे फॅटी लिव्हर म्हणजेच यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्याचा धोका वाढू शकतो. काही महिलांमध्ये पुढे यकृताला सूज आणि नुकसान होण्याची शक्यताही असते. म्हणूनच वजनाबरोबरच रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल आणि यकृताच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रजननक्षमता आणि मानसिक आरोग्य
पीसीओएसमध्ये बीजांडाचे नियमित उत्सर्जन होत नसल्यामुळे गर्भधारणेस अडचण येऊ शकते. मात्र, पीसीओएस म्हणजे वंध्यत्व नव्हे. योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे अनेक महिलांना नैसर्गिकरीत्या किंवा वैद्यकीय मदतीने गर्भधारणा होऊ शकते. गर्भावस्थेत मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकत असल्याने वैद्यकीय देखरेख आवश्यक असते.
याशिवाय, वजनवाढ, चेहऱ्यावरील केस, मुरुमे आणि गर्भधारणेबद्दलची चिंता यांचा आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. काही महिलांना चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्याही जाणवतात. त्यामुळे मानसिक आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे.
उपचार आणि जीवनशैलीतील बदल
पीसीओएस पूर्णपणे एका औषधाने बरा होणारा विकार नाही; मात्र योग्य उपचारांनी त्याची लक्षणे नियंत्रित ठेवता येतात आणि भविष्यातील आरोग्यविषयक धोके कमी करता येतात.
संतुलित आहार, नियमित चालणे, एरोबिक व्यायाम आणि स्नायू बळकट करणारे व्यायाम यांचा दिनचर्येत समावेश करावा. आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम आणि दोन दिवस स्नायू बळकट करणारे व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा. वजन जास्त असल्यास योग्य मार्गदर्शनाखाली वजन नियंत्रित करणे फायदेशीर ठरते. पाळी नियमित करण्यासाठी, इन्सुलिन रेझिस्टन्स नियंत्रित करण्यासाठी किंवा गर्भधारणेस मदत करण्यासाठी डॉक्टर आवश्यकतेनुसार औषधे सुचवू शकतात.
शेवटी एवढेच की, पीसीओएसकडे केवळ पाळीच्या अनियमिततेची समस्या म्हणून पाहू नका. हा हार्मोनल, चयापचयविषयक, प्रजनन आणि मानसिक आरोग्याशी जोडलेला विकार आहे. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर निदान आणि उपचार घेणे महत्त्वाचे आहे. योग्य माहिती, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या मदतीने महिला निरोगी आणि सक्रिय आयुष्य जगू शकतात. स्वतःच्या शरीरातील बदल समजून घेणे आणि वेळेवर काळजी घेणे, हीच पीसीओएसविरुद्धची पहिली पायरी आहे.



