नेहमीप्रमाणे याही वर्षी दिवाळी दणदणत आली. दणदणली आणि गेलीसुद्धा, पुढच्या वर्षी परत दणदणत यायला. आता वेध लागले ते तुळशीविवाहाचे. यावर्षी मडगावात विशेषतः दीपोत्सव अतिशय सुंदररीत्या साजरा झाला. सुंदर रोषणाई, पीपल्स पाथचे उद्घाटन, विविधरंगी कार्यक्रम यांमुळे दिवाळी विशेष गाजली. ते हायवेच्या दुतर्फा लावलेले कंदील, रात्री केलेली रोषणाई खरंच अफलातून! "रसिक गोयकार" ही गोव्याची ओळख पुन्हा एकदा दृढ झाली. असो!
मूलतः गोव्यात दीपोत्सव अगदी पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. नवीन कपडे, रंगरंगोटी हे आलेच. पण ते पहाटेचे अभ्यंगस्नान, उटणे लावून केलेले स्नान, ती कडक थंडी (जी आता फक्त थंडी या शब्दापुरतीच अस्तित्वात आहे), करिट फोडणे, मग पोहे अगदी पाच प्रकारचे आणि मग फराळ. अगदी पूर्ण पारंपरिक! अर्थात, यात फटाके असायचेच. पण मर्यादित स्वरूपात. त्यापेक्षा रांगोळ्या, घरसजावट, विशेषतः घरगुती कंदील यांना जास्त महत्त्व. संध्याकाळ झाली की प्रत्येक घर त्याने उजळून निघायचे.
आमच्या गावातसुद्धा अशाच प्रकारे दिवाळी साजरी होत असे. नुकताच पीक हंगाम संपल्यामुळे बळीराजाकडे चार पैसे खुळखुळत पँटच्या खिशात. त्यामुळे दिवाळी तशी जोरात! पण तरीसुद्धा गोव्यात दीपावलीपेक्षा गणपतीला जास्त महत्त्व, हे निर्विवादपणे मानायला हवे. असो!
तर अशी दीपावली साजरी करणारी मी लग्न करून मुंबईच्या झगमगाटात आले. आमची चाळसिस्टीम मुंबईत, अगदी टिपिकल मध्यमवर्गीय वस्ती. जणूकाही पु. ल. देशपांडे यांनी आमचीच चाळ पाहून "बटाट्याची चाळ" लिहिली असे म्हणावे, इतकी! विविध प्रदेशांतील लोक, भाषा वेगळी, चालीरीती वेगळ्या; पण एका छताखाली एकत्र आले आणि एकत्रच झाले. त्यात दीपावलीच्या सणाला नाही आनंदाचा तोटा, असे म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक नोकरदाराचा बोनस झालेला. मग काय विचारता, दिवाळी अगदी जोरात साजरी व्हायची.
आमच्या चाळीत गोव्याप्रमाणे घरात कंदील बनवायच्या फंदात पडत नसत. नाक्यानाक्यावर कंदील विकणारे आपापले स्टॉल लावीत. प्रत्येकाच्या खोलीसमोर एकाच रंगाचे कंदील, ही आमच्या चाळीची खासियत होती. शक्यतो ते भगव्या रंगाचेच असत. फक्त दोन चाळींच्या मधील सार्वजनिक मोठ्ठा कंदील मात्र खास चाळीच्या गच्चीवर बनवला जात असे. आणि त्याकरिता नुकतीच मिसरूड फुटलेली आणि कॉलेजला सुट्टी पडलेली मुले पुढाकार घेत. शाळा तर सुट्टीवरच असत. त्यामुळे दिवसभर पोरांचा किलबिलाट हा असायचाच.
अशा पोरा-टोरांना गुंतवायला ठिकठिकाणी किल्ले स्पर्धा असायच्या. दीपावली आणि शिवकालीन किल्ले यांचा नक्की संबंध काय, हे मला आजपर्यंत कळले नाही. पण ज्याने कोणी ही कल्पना काढली, त्याला शिरसाष्टांग नमस्कार! आणि हा प्रकार अखिल भारतात फक्त महाराष्ट्रातच दिसतो, तोसुद्धा जास्त करून मुंबई आणि परिसरातच.
आता वळते फराळाकडे. मुळात आमचा परिवार मूळचा गोमंतकीय, त्यामुळे खाण्यापिण्याची चंगळ अगदी! मग त्यात फराळ म्हणजे बघायलाच नको. लाडू, करंज्या, चकल्या... नुसता घमघमाट सुटलेला असे प्रत्येक चाळीत. पुरुष मंडळी खिशात पैसे खुळखुळण्यात मग्न, मुले किल्ले, कंदील बनवण्यात, तर गृहिणी सगळ्या फराळात मग्न, असा दिवाळीच्या आधीचा थाट!
प्रत्यक्षात दिवाळीच्या दिवशी अगदी पहाटे, साडेतीन-चारलाच चाळीला जाग येई आणि त्यासाठी मोती साबणवाल्या आजोबांचीही गरज नसे. मस्त गुलाबी थंडी, त्यात उटणे लावून अभ्यंगस्नान, गरमागरम पोहे आणि खुसखुशीत फराळ... वाह! खरं सांगू, दिवाळी साजरी करावी ती कोकणपट्टीकरांनीच. मग खरी सुरुवात दिवाळी दणदणण्याची. कान बंद पडायचे अगदी. वेगवेगळ्या प्रकारचे फटाके, रात्री नरीमन पॉइंटला, चौपाटीला आतषबाजी बघण्यासारखी असायची. लक्ष्मीपूजन म्हणजे फटाक्यांचा कहर नुसता!
एकमेकांच्या घरी फराळ देणे ही प्रथा मुंबईतच पाहिली मी. चाळीत येणारे सफाई कामगार, गुरखा, पोस्टमन, सर्वांना दिवाळीच्या भेटीचे वाटप व्हायचे. एरवी महिन्याच्या शेवटी फाटके खिसे तपासणारा मध्यमवर्गीय त्या वेळी मात्र दानशूर कर्ण होतो, अगदी कर्ण!
दिवाळीचे सर्व दिवस गोडधोड खाल्ल्यावर मग यायची ती भाऊबीज. त्या दिवशी मात्र बऱ्याच घरांत मटणाचा बेत असायचा. अर्थात, काही घरांतच. आणि त्यात आम्हीही आलोच. त्या दिवशी आमच्या घरातून पारेख बापूंना गपचूप एक वाटी मटणाची जायचीच. असो!
एक फार छान प्रकार पाहिला आम्ही. आमच्या भागातले काही समाजसेवक घराघरांतून जास्त केलेला फराळ गोळा करीत आणि तो व काही जुने कपडे गरीब, पोरक्या मुलांना वाटत. काय आनंद दिसे हो त्यांच्या चेहऱ्यांवर! खरी दिवाळी साजरी झाली असे वाटे.
खरंच, गणेशोत्सव, दिवाळी यांसारखे सण हे नुसते सण नाहीत हो, ते सर्व समाजघटकांनी एकत्र येण्याचे कारण आहे. सर्वांनी खुश, समाधानी राहा, एकजुटीने राहा, तरच तुमच्या जीवनातला अंधकार नाहीसा होईल आणि तुमचं जीवन लखलखत्या ज्योतीने, तेजाने उजळून निघेल. हाच तर दीपावलीचा संदेश आहे...



